इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गायक शान याचा हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलाच बोलबाला आहे. आपल्या प्रतिभेने शान याने आजचे हे स्थान निर्माण केले आहे. शान बंगाली कुटुंबातील आहे. त्याचे पूर्ण नाव शंतनू मुखर्जी असे आहे. शानने केवळ हिंदीच नव्हे तर बंगाली, मराठी, उर्दू, तेलगू, कन्नड, नेपाळी, उडिया, पंजाबी आणि मल्याळम यासह अनेक भाषांमध्ये गाणी गाऊन रसिकांची मने जिंकली आहेत.
शानचा हा संगीत प्रवास वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी सुरू झाला, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
शानला संगीताचे बाळकडू घरातूनच मिळाले. शानचे आजोबा जहर मुखर्जी हे प्रसिद्ध गीतकार होते. तर, त्याचे वडील मानस मुखर्जी संगीत दिग्दर्शक होते. घरात सुरुवातीपासूनच संगीताचे वातावरण असल्याने शानचा लहानपणापासूनच गायनाकडे कल होता. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्याने गायला सुरुवात केली. सुरुवातीला शान जाहिरातींसाठी जिंगल्स गात होता. मात्र, शान १३ वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर शानची आई या क्षेत्रात सक्रिय झाली. तर शानने वयाच्या १७व्या वर्षी त्याने पहिल्यांदा चित्रपटात गाणे गायले.
शानप्रमाणेच त्याची बहीण सागरिकाही एक प्रसिद्ध गायिका आहे. शान आणि त्याची बहीण सागरिका यांनी पहिल्यांदाच एका म्युझिक कंपनीसाठी गाणी गायली होती. त्यात काही रिमिक्स गाण्यांचाही समावेश होता. शानचा हा अल्बम भलताच हिट ठरला. पण, शानने स्वतः लिहिलेल्या ‘भूल जा’ आणि ‘तन्हा दिल’ या गाण्यांमधून त्याला खरी ओळख मिळाली. त्याची दोन्ही गाणी १९९९ मध्ये रिलीज झाली. यानंतर शानची यशस्वी कारकीर्द सुरू झाली.
शानने ‘अशोका’, ‘कल हो ना हो’, ‘फना’, ‘जब वी मेट’, ‘तारे जमीन पर’, ‘3 इडियट्स’, ‘ओम शांती ओम’, ‘हे बेबी’, ‘हमको दीवाना कर गये’, ‘सिंग इज ब्लिंग’, ‘तेरे नाम’ आणि ‘टोटल धमाल’ यासह अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. विविध भाषांमध्ये लोकप्रिय गाणी देणाऱ्या शान याने छोट्या पडद्यावर अनेक शोचे सूत्रसंचालन केले आहे. यासाठी देखील तो प्रसिद्ध आहे. ‘सारेगमप’, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’, ‘स्टार व्हॉईस ऑफ इंडिया’ आणि ‘म्युझिक का महामुकबाला’ यासह इतर अनेक शोचे सूत्रसंचालन केले आहे.
Singer Shaan Life Journey Family Responsibility
Entertainment Bollywood