इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘आमचं जमलंय’ हे जाहीर करून मुग्धा आणि प्रथमेशने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे. दर दोन दिवसांआड त्यांचीच काही न काही चर्चा सोशल मीडियात दिसते. आपल्या लाडक्या लिटिल चॅम्प्सना एकत्र पाहून चाहते देखील खुश आहेत. त्यांच्याबद्दल नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते देखील उत्सुक आहेत. नुकतीच या दोघांनी आपापली शिक्षणं सांगितली आहेत. त्यांचे शिक्षण पाहून हे तर ऑलराऊंडर आहेत, अशीच काहीशी चाहत्यांची भावना झाली आहे. हे दोघं पुढच्या ६- ८ महिन्यात लग्न करणार असल्याची शक्यता आहे.
प्रश्न तुमचे, उत्तरं आमची
मुग्धा आणि प्रथमेशने त्यांचं नातं उघड केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली. प्रथमेश आणि मुग्धाने यावर तोडगा काढत चाहत्यांसाठी एक खास प्रश्न – उत्तरांचं सेशन आयोजित केलं. त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिली. याच सेशनमध्ये या दोघांनी त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी सांगितली.
प्रथमेशने मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्य आणि इतिहास या विषयांमध्ये पदवी मिळवली आहे. त्यानंतर त्याने पुण्याच्या भारती विद्यापीठातून संगीतात पदव्युत्तर शिक्षण घेत मास्टर्स केले आहे. तर दुसरीकडे, मुग्धाने रुपारेल कॉलेजमधून सायन्सची पदवी मिळवली आणि तिने देखील मुंबई विद्यापीठातून संगीतशास्त्रात मास्टर्स केलं आहे. गेल्याच महिन्यात मुग्धाच्या या मास्टर्स डिग्रीचा निकाल लागला आणि त्यात तिला सुवर्णपदकही मिळालं.