विशेष प्रतिनिधी, मुंबई
आपल्या अत्यंत गोड आणि मधाळ आवाजाने सर्व रसिकांचे मन रिझवणारे गायक म्हणजे पंकज उधास. १७ मे हा त्यांचा वाढदिवस. केवळ गझल गायनच नव्हे तर सर्व प्रकारच्या गाण्यांसाठी ते ओळखले जातात.
पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमधील जैतपूर येथे झाला. तीन भावंडांमध्ये ते सगळ्यात छोटे. त्यांचे दोन्ही मोठे भाऊ निर्मल आणि मनहर हे प्रसिद्ध गायक होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ते ही या क्षेत्रात आले. खरंतर उधास परिवारात या दोघा मोठ्या भावंडांमुळेच गायकीला सुरुवात झाली. राजकोट संगीत नाट्य अकादमीमध्ये त्यांनी चार वर्षे तबल्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पंकज यांनी मास्टर नवरंग यांच्याकडून संगीतातील बारकावे शिकून घेतले.
संगीताचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये पहिला ब्रेक १९७२ मध्ये मिळाला. संगीतकार उषा खन्ना यांनी सुचवल्यामुळे त्यांना ही संधी मिळाली. हा चित्रपट काही फार चालला नाही. पण, त्यांच्या गाण्याची चांगलीच तारीफ झाली. त्यांना खरी ओळख मिळाली ती, अभिनेता संजय दत्तच्या ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है’, या गाण्याने. यानंतरही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. अनेक गझलनाही त्यांचा आवाज आहे, तसेच अनेक अल्बमही त्यांच्या नावावर आहेत.
पंकज उधास यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते पद्मश्री प्रदान करण्यात आली. त्यांना पद्मश्री कशी मिळाली, याची पण एक गोष्ट आहे. हा पुरस्कार जेव्हा त्यांना जाहीर झाला, तेव्हा त्यांना याची काहीही कल्पना नव्हती. ते सांगतात, त्यांच्या अनेक चाहत्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलास देशमुख यांचाही सहभाग होता. त्यांच्या एका कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पंकज उधास यांच्या गाण्यानंतर या दोघांचे जे काही जुजबी बोलणे झाले. त्यांनीही पंकज उधास यांना पद्मश्री मिळाली आहे की नाही, याबद्दल विचारणा केली. तेव्हा त्यांनी नाही असे सांगितले होते.
२००५ मध्ये संगीत क्षेत्रातील त्यांच्या प्रवासाला २५ वर्षे पूर्ण झाली आणि त्यानंतर ते कॅन्सर रुग्णांसाठी काम करू लागले. आणि २००६ मध्ये त्यांना पद्मश्री जाहीर झाला. त्यांच्या एका मित्राने त्यांना फोनवरून त्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तोवर त्यांना याची कल्पनाही नव्हती. कारण त्यांनी मित्राला कसल्या शुभेच्छा दिल्या, असेही विचारले. त्यावर त्यांनी पंकज उधास यांना पद्मश्री मिळाल्याची बातमी दिली. आणि उधास यांना अत्यंत आनंद झाला.