विशेष प्रतिनिधी, मुंबई
हिंदी चित्रपट क्षेत्रातील केवळ अभिनेते, अभिनेत्री लोकप्रिय होत नाहीत, तर त्यांना आवाज देणारे गायक, गायिकाही रसिकांच्या मनावर राज्य करतात. असेच एक गायक म्हणजे मुकेश. राज कपूर यांचा आवाज हीच त्यांची ओळख. मुकेश आपल्याकडेच नाही तर परदेशातही लोकप्रिय होते. त्यांची ही गाण्याची आवड त्यांनी आयुष्यभर जपली. इतकी की आवडते गाणे सादर करतानाच त्यांचे निधन झाले.
२२ जुलै १९२३ रोजी मुकेश यांचा जन्म झाला. मुकेशचंद्र माथूर असे त्यांचे संपूर्ण नाव. त्यांचे वडील जोरावर चंद्र माथूर हे व्यवसायाने इंजीनिअर होते. मुकेश यांना १० बहीण – भाऊ आणि त्यातील मुकेश हे सहाव्या क्रमांकाचे. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. ते नेहमीच आपल्या वर्गमित्रांना गाणी ऐकवत असत. यामुळेच दहावी नंतर त्यांनी शिक्षण सोडले आणि पीडब्ल्यूडीमध्ये नोकरी करू लागले. खरं तर त्यांना नेहमीच चित्रपटात काम करायचं होतं.
एकदा मुकेश यांनी आपले नातेवाईक मोतीलाल यांच्या बहिणीच्या लग्नात गाणं सादर करत होते. मोतीलाल यांना मुकेश यांचा आवाज इतका आवडला की, ते त्यांना घेऊन मुंबईला गेले. मुंबईत त्यांना गाण्याचे प्रशिक्षण देण्याची सोय केली. १९४१ मध्ये आलेल्या ‘निर्दोष’ चित्रपटात त्यांनी अभिनय केला आणि यातील सगळी गाणी देखील त्यांनीच गायली. याशिवायही त्यांनी आणखी एक, दोन चित्रपटात कामे केली.
चित्रपट क्षेत्रातील त्यांचा सुरुवातीचा प्रवास फार कठीण होता. पण एक दिवस के.एल. सहगल यांनी त्यांचा आवाज ऐकला आणि त्यांना तो फारच आवडला. त्यांचे गाणे ऐकून सहगल मंत्रमुग्ध झाले. आणि त्यांनी मुकेश यांना गाण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी राज कपूर यांच्यासाठी पार्श्वगायन करण्यास सुरुवात केली.
राज कपूर आणि मुकेश यांची चांगली मैत्री होती. ते दोघे एक दोघांच्या मदतीसाठी तयार होते. १९५९ मध्ये ‘अनाडी’ चित्रपटाने राज कपूर यांना पहिला फिल्मफेअर ऍवॉर्ड मिळवून दिला. पण, याच चित्रपटाने मुकेश यांनाही बेस्ट प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर ऍवॉर्ड मिळवून दिला, हे अनेकांना माहीत नसेल. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले पुरूष गायक आहेत.
आपल्या ४० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्या काळातील सुपरस्टार्ससाठी तेच पार्श्वगायन करत असत. लोकांवर त्यांच्या आवाजाची प्रचंड जादू होती. एका आजारी मुलीने मुकेश यांचे गाणे ऐकायची इच्छा व्यक्त केली होती. डॉक्टरकडून हे कळल्यावर मुकेश लगेचच त्या मुलीला भेटायला गेले आणि गाणे ऐकवले. त्यांनी सगळ्याप्रकारची गाणी गायली. पण त्यातही करुणामय गाण्यांसाठी त्यांना जास्त पसंती दिली गेली.
२७ ऑगस्ट १९७६ रोजी अमेरिकेत त्यांचा एक स्टेज शो सुरू होता. ‘इक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएगा प्यारे तेरे बोल’, हे गाणे म्हणत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. राज कपूर यांना जेव्हा ही बातमी कळली, तेव्हा त्यांच्या तोंडून आवाजही फुटला नाही. मुकेश यांच्या निधनामुळे माझा आवाज आणि आत्मा दोन्ही निघून गेल्याची प्रतिक्रिया नंतर त्यांनी दिली होती.