इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूड गायक मिका सिंग आपल्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. परंतु या वेळी तो कोणत्याही गाण्यामुळे नव्हे, तर लग्नामुळे चर्चेत आला आहे. मिका सिंग लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अफेअरच्या अटकळींमुळे तो नेहमी चर्चेत राहिला आहे. चाहत खन्नापासून ते आकांक्षा पुरीपर्यंत अनेक तरुणींशी मिकाचे नाव जोडले गेले आहे. मात्र तरीही त्याने प्रेमसंबंधांबाबत कधीही खुलासा केला नाही.
मिका सिंग याने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो लग्नाविषयी बोलला आहे. स्टार भारतच्या “स्वयंवर मिका दी वोटी” या रियालिटी शोमध्ये मिका सिंग आपल्या सहचारिणीचा शोध घेताना दिसेल. स्वयंवरदरम्यान तो स्वतःसाठी योग्य मुलीचा शोध घेताना दिसून येणार आहे. या शोमध्ये अनेक तरुणी स्वयंवरसाठी सहभागी होणार आहेत. या शोचे प्रमोशन मिका सिंग स्वतः करत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मिका सिंग नातेसंबंध आणि लग्नाबद्दल खुलेपणाने बोलला. तो म्हणाला, की वीस वर्षांमध्ये लग्नासाठी त्याला १०० ते १५० प्रस्ताव आले आहेत. परंतु तो कोणत्याही मुलीला मोठा भाऊ दलेर मेहंदी यांची भेट घेण्याची हिम्मत करू शकला नाही. त्यामुळे आता तो स्वयंवरमध्ये सहचारिणीचा शोध घेत आहे.
मिका सिंग मुलाखतीत सांगतो, आजपर्यंत मला दलेर पाजी यांच्याशी कोणत्याही मुलीची भेट घालून देता आली नाही. माझी इतकी हिम्मतच झाली नाही. गर्लफ्रेंडची भेट घालून देण्याचे धाडस मी करू शकलो नाही. दलेर पाजींबद्दल असलेली आदरयुक्त भीती मला असे करण्यापासून रोखते. मला अनेक वर्षांनंतर अशी ऑफर मिळाली, याबद्दल मी सुदैवी आहे. मला वाटते, की अनेक जण अशा प्रकारचा स्वयंवर करू इच्छितात. मी आधी तयार नव्हतो.
मी गेल्या वीस वर्षांत कमीत कमी १००-१५० स्थळांना नकार दिला आहे. वास्तविक त्यादरम्यान मी कामाला अधिक प्राधान्य देत होतो. अनेकांना वाटते, की मला मुलींसोबत पार्टी करणे आणि हँगआउट करणे आवडते. लग्न न करण्यामागे हे एक कारण आहे. परंतु असे कधी झाले नाही. अखेर हा प्रस्ताव आल्यानंतर दलेर पाजी म्हणाले, की करून पाहा, काय माहिती कोणीतरी चांगली मुलगी भेटेल. तसेही तू आमचे ऐकत नाही.
स्टार भारत या वाहिनीवर या शोचे प्रसारण होणार आहे. हा शो स्वयंवरवर आधारित आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्यांना आधी नोंदणी करावी लागणार आहे. शोमध्ये प्रवेश मिळविण्याची अंतिम मुदत ८ मे आहे.