इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘अल्ला के बंदे’ या गाण्यामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळवलेला पहाडी आवाजाचा गायक म्हणजे कैलाश खेर. फार प्रसिद्धीझोतात नसलेला मात्र एखादेच गाणे गाऊन चर्चेत येणारा हा गायक. ‘अल्लाह के बंदे…’ असो वा ‘शिवतांडवस्त्रोत्र’ कैलाश खेर यांनी जवळपास सगळ्याच प्रकारची गाणी गायली. आपल्या समकालीन गायकांपेक्षा वेगळी सुफियाना शैली आणि दमदार आवाजाने लाखो हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर ४९ वर्षांचे झाले आहेत. कैलाश खेर यांनी आतापर्यंत ७००हून अधिक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्यांच्या गाण्यात भारतीय लोकगीते आणि सुफी संगीताची झलक पाहायला मिळते.
संघर्षपूर्ण जीवन
आजघडीला ते प्रसिद्ध गायक आहेत. मात्र, इथपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. कैलाश खेर यांनी सुरुवातीला अत्यंत गरिबीत दिवस घालवले. आयुष्यात एक वेळ अशी आली की, त्यांनी स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. कैलाश यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात झाला. त्यांना संगीताचा वारसा कुटुंबाकडूनच मिळाला. त्यांचे वडील पंडित मेहरसिंह खेर हे पुजारी होते आणि घरातील कार्यक्रमात ते अनेकदा पारंपारिक लोकगीते म्हणत असत.
कैलाश यांनी वडिलांकडून संगीताचे धडे गिरवले. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी कैलाश यांनी गुरूच्या शोधात घर सोडले. कैलाश खेर यांना शास्त्रीय आणि लोकसंगीताचा अभ्यास करायचा होता. त्यांनी दिल्लीतील एका संगीत वर्गात प्रवेश घेतला. संध्याकाळच्या शिफ्टमध्ये ते मुलांना संगीत शिकवत. संगीत भारती, गांधर्व महाविद्यालय यांसारख्या संस्थांमधून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. पुढे हळूहळू ते या क्षेत्रात स्थिरावू लागले. दरम्यान, १९९९मध्ये कैलाश खेर यांनी हस्तकलेशी संबंधित व्यवसाय सुरू केला. पण अचानक व्यवसायात त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांचा संपूर्ण व्यवसायच बुडाला. या धक्क्यामुळे कैलाश यांनी एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.