मुंबई – बॉलीवूडमध्ये अभिनेता असो, गायक असो की संगीतकार यांच्या विषयी रसिकांमध्ये खूपच क्रेज असते. तसेच अशा सेलिब्रिटींविषयी अनेक अफवा देखील पसरलेल्या दिसून येतात. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी नुकताच सोशल मीडियावर पसरलेल्या बनावट अफवांचे बळी ठरले आहेत.
काही दिवसांपासून सोशल मिडिया व इंटरनेटवर अशा अफवा पसरल्या जात होत्या की, इंडस्ट्रीतील आयकॉनिक गायक बप्पी लाहिरी यांनी आपला आवाज गमावला आहे. या बातमीने त्यांच्या चाहत्यांना तसेच अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला. मात्र त्याच वेळी आता बप्पी लाहिरी यांनी स्वतः या खोट्या अफवांना उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर या अफवांना खोटे ठरवत हृदयद्रावक असे निवेदन जारी केले आहे.
बप्पी लाहिरी यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये, लिहिले आहे की, ‘ माझ्या आरोग्याबद्दल काही माध्यमांमध्ये पसरवलेल्या खोट्या बातम्यांबद्दल जाणून मला वाईट वाटले, या लोकांनी माझे हृदय तोडले. परंतु चाहते आणि हितचिंतकांच्या आशीर्वादाने मी पूर्णपणे ठीक आहे!!
बप्पी लाहिरी यांची ही पोस्ट व्हायरल होताच अनेक लोक या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत. विशेषत: बप्पीदाचे चाहते संताप व्यक्त करत आहेत, याशिवाय अनेक सेलिब्रिटींनीही राग व्यक्त केला आहे. बप्पी लाहिरींच्या या पोस्टवर टिप्पणी करताना गायक शान म्हणाला की, ‘हे खरोखर वाईट असून चुकीची माहिती आहे, आम्ही बप्पीदाच्या आरोग्याची कामना केली आहे. तसेच अशा बनावट बातम्या पसरवू नका असे आवाहन शान याने केले आहे.