इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनुराधा पौडवाल यांनी आपल्या सुमधुर गायनाने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अनुराधा पौडवाल यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला आहे. आपल्या यशस्वी कारकिर्दीत गाजलेल्या असंख्य मराठी चित्रपटांच्या गाण्यांसाठी त्यांनी आपला आवाज दिला आहे. याआधी अनुराधा पौडवाल यांनी अनेक भक्तिगीते गायली आहेत. अनेकवर्षे चित्रपटसृष्टीपासून लांब राहिलेल्या अनुराधा पौडवाल यांनी पुन्हा एकदा चित्रपट संगीतात पुनरागमन केले आहे.
‘कुलस्वामिनी’ चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १८ वर्षानंतर अनुराधा पौडवाल यांनी गाणे गायले आहे. या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी ‘जय देवी, जय देवी, जय महालक्ष्मी’ ही आरती गाण्याच्या स्वरूपात गायली आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी अर्थात देवीमातेच्या भक्तांसाठी गाण्याच्या स्वरुपातली ही आरती म्हणजे अनोखी पर्वणी म्हणावी लागेल.
१९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अभिमान’ या हिंदी चित्रपटातून अनुराधा पौडवाल यांनी आपल्या गायनाच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. प्रख्यात संगीत दिग्दर्शक एस. डी. बर्मन यांनी चित्रपटाला संगीत दिले होते. आत्तापर्यंत अनुराधा पौडवाल यांनी मराठी आणि हिंदीसोबत तमिळ, ओडिया, नेपाळी, बंगाली आणि कानडी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
‘कुलस्वामिनी’ या चित्रपटातील हे गाणं नुकतेच लाँच करण्यात आलं आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात ११ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. अल्ट्रा मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते कंपनीचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल आहेत. या गाण्याचे संगीतकार अभिजीत जोशी असून लघुपट, चित्रपटांचा अनुभव गाठीशी असलेले जोगेश्वर ढोबळे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
Singer Anuradha Paudwal Sing Marathi Song
After 18 Years Entertainment Film Movie