इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या कामामुळे त्याहीपेक्षा वादामुळे सतत चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचं ‘मूड बना लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या गाण्यावरून सुरुवातीला बऱ्याच चर्चा रंगल्या. पण नंतर मात्र काहींनी अमृता यांच्या या गाण्याचं कौतुकही केलं. नेटकऱ्यांना देखील ते चांगलंच भावलं. त्याचबरोबर महिला म्हणून ठामपणे त्या कलाविश्वात आपल्या वेगळ्या वाट चोखंदळत असल्याने त्यांचे कौतुक झाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांना पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
पती राजकारणात असले तरी अमृता फडणवीस या कुठलीही फिकीर न बाळगता आपले काम करीत असतात. त्यांच्या गाण्याबरोबरच त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलची सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते. अमृता यांची ड्रेसिंग स्टाइल अनेकांना आवडते. तर काहीजण त्यांना ट्रोलही करतात. असंच एका कार्यक्रमानिमित्त घडलं. अमृता यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी परिधान केलेला ड्रेस काही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला नाही.
अमृता यांनी या कार्यक्रमादरम्यान वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता. गुलाबी रंगाचं टीशर्ट आणि मल्टी कलर पँट असाच काहीसा त्यांचा वेष होता. त्यांच्या या ड्रेसिंग स्टाइलमुळे त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. असे कपडे परिधान करणं तुम्हाला शोभत नाही, फॅशन करायची तर नीट फॅशन करा, फॅशनच्या नावाखाली काहीही वेशभूषा करू नका. ड्रेस थोडा चांगला परिधान करायला हवा होता अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. यावर बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी कमेंट केली आहे. त्यांनी या फोटोवर टाळी वाजवतानाचे इमोजी शेअर करत कमेंट केली. तर काहींनी अमृता यांच्या या नव्या लूकचं कौतुकही केलं.
Singer Amruta Fadnavis Troll in Social Media