मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कधी राजकीय विधानांमुळे, कधी वेशभूषेमुळे तर कधी गाण्यांमुळे सतत सोशल मिडियावर चर्चेत राहतात. अलीकडेच त्यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासोबतचे छायाचित्र सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टवर सध्या कमंटे्सचा पाऊस पडत आहे.
आशा भोसले यांना महाराष्ट्र सरकारने अलीकडेच महाराष्ट्र भूषण प्रदान केला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशाताईंनी ‘घरचा पुरस्कार असल्यामुळे तो भारतरत्नासारखा आहे’ अशी भावना व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी हा पुरस्कार सोहळा मुंबईत पार पडला. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी आशाताईंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
या भेटीची छायाचित्रे अमृता फडणवीस यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहेत. यावेळी आशाताईंसोबत संगीत या विषयावर बरीच चर्चा झाल्याचे त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे. अमृता या बँकिंग क्षेत्रात असून त्या गायकदेखील आहेत. त्यांची काही गाणी सातत्याने चर्चेत असतात. शिवाय विविध कार्यक्रमांमध्ये त्यांना गाण्याचाही आग्रह केला जातो. त्यामुळे आशाताईंची प्रत्यक्ष भेट आणि चर्चा स्वाभाविक आहे. पण आशाताईंच्या आणि अमृता फडणवीस यांच्या चाहत्यांना खरी उत्सुकता आहे ती या दोघींमध्ये झालेल्या चर्चेची.
ताई म्हणाल्या…
आशाताईंसोबत संगीत या विषयावर चर्चा झाली. त्यात त्यांनी गाण्याचा सातत्याने सराव करण्याचा सल्ला दिल्याचे अमृता फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. याशिवाय व्हॉईस मॉड्युलेशनबद्दलही आशाताईंनी मार्गदर्शन केल्याचे अमृता यांनी म्हटले आहे. आता या पोस्टवर कमेंट्सचा चांगलाच पाऊस पडत आहे.
Singer Amruta Fadnavis Meet Asha Bhosale