मुंबई – बालिका वधुमधून आपल्या अभिनयाची छाप टाकून नंतर हिंदी मालिकेत प्रसिध्द झालेल्या अभिनेता सिध्दार्थ शुक्ला यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. हृद्य विकाराचा झटका आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. सिध्दार्थ ४० वर्षाचा होता. बिग बाँसच्या तेराव्या सिझनचा तो विजेता ठरल्यानंतर तो आणखी प्रकाशझोतात आला. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून तो चांगला प्रसिध्द झाला होता. हिंदी चित्रपटात तो फारसा झळकला नाही. पण, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केली होती. २००८ मध्ये बाबुल का आंगन छूटे ना या छोट्या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावरील करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर जाने पहचनाने से अजनबी, सीआयडी, बालिका वधू, लव यू जिंदगीमध्ये त्याने काम केले. पण, त्याला खरी ओळख व प्रसिध्दी मिळाली ती बालिका वधू मधून ही मालिका प्रचंड लोकप्रिय होती. त्यात सिध्दार्थचे कामही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. या मालिकेनंतर मात्र त्याने मागे वळून बघितले नाही.