टाळून अंमली पदार्थांचे सेवन वाचवू तरुण पिढीचे जीवन
अंमली पदार्थांची विक्री करताना टोळीला अटक, रेल्वे फूटपाथवर चालतो अंमली पदार्थांचा धंदा, तरूणांना अंमली पदार्थांचा विळखा, अंमली पदार्थांच्या सेवनाने दोघांचा मृत्यू, विमानतळावर तीन कोटींचे ड्रग्ज सापडले, दोघांना अटक अशा आशयाच्या बातम्या आपण रोज प्रसारमाध्यमांमध्ये वाचतो, ऐकतो. आजची बहुसंख्य तरूण पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. पालकांना तरूणांना यापासून रोखण्याची समस्या सतावत आहे. यासाठी शासनही बऱ्याच उपाययोजना, कायदे करत आहे.
याचाच एक भाग म्हणून शासनाने अशा पदार्थांवर बंदी घातलेली आहे. तरीही अंमली पदार्थाचे सेवन युवा पिढी प्रामुख्याने करत आहे. या अंमली पदार्थांच्या विळख्यातून सुटका व्हावी, निर्व्यसनी सक्षम पिढी घडावी यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. अंमली पदार्थाचे दुष्परिणामांची व्हावी तसेच व्यसनाधीनतेला प्रतिबंधात्मक उपाययोजनेची जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
अंमली पदार्थांच्या विळख्यात सहजपणे फसतात ते तरूण. एकदा का अंमली पदार्थांची चटक लागली की ती सवय बनायला वेळ लागत नाही. अंमली पदार्थांचा प्रसार रोखला नाहीतर आपली अख्खी एक पिढी उध्वस्त होऊ शकते. कोणत्याही दुष्परिणामांची आणि मृत्यूची फिकर विसरायला लावणाऱ्या अंमली पदार्थांचे सेवन सतत केल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त आहेत.
दरवर्षी 26 जून हा दिवस जगभरात अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन व्हावे हा या दिनामागचा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्राने सन 1987 पासून अंमली पदार्थ हा विषय महत्त्वाचा मानला आहे. भारतात नार्कोटिक ड्रग्ज ॲण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट 1985 (एनडीपीएस) हा अंमली पदार्थ विरोधी कायदा आहे. मालव्दीप सरकारने संयुक्त राष्ट्रांना मादक पदार्थांच्या संबंधित संमेलनासाठी अनुमोदन दिले आणि पहिले अंमली पदार्थावर आधारित संमेलन 1961 साली झाले. दुसरे संमेलन 1971 मध्ये अवैध सायकोट्रापिक पदार्थ यावर झाले. गैरकानुनी धंद्याच्या विरोधात 1988 मध्ये तिसरे संमेलन झाले. या कायद्यांतर्गत अंमली वस्तू किंवा औषधांचे उत्पादन, वितरण, सेवन, विक्री, वाहतूक, साठा, वापर, आयात-निर्यातर यावर देशात बंदी आहे. प्रत्येक व्यक्ती, मुले-मुली यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक व विशेष सहाय्य विभाग विविध उपक्रम राबवित आहे.
अंमली पदार्थ सेवनाची कारणे
ज्या पदार्थाच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा किंवा धुंदी येते त्यांना अंमली पदार्थ म्हणतात. अफूपासून मोर्फिन, हेरॉइन आदी नशेले पदार्थ तयार केले जातात. कोकेन, भांग, गांजा, चरस यांचा मादक पदार्थांमध्ये समावेश होतो. तरूणाईला अंमली पदार्थांच्या नशेचे आकर्षण वाटण्याचे पहिले कारण म्हणजे त्यांचा वयोगट. तारूण्य काळामध्ये काही तरी थ्रिलर करावं अशी इच्छा खूप प्रबळ बनलेली असते. लोकांमध्ये आपलं आकर्षण वाटावं यासाठी अनेक तरूण थ्रिलर गोष्टी करताना दिसतात. अशा थ्रिलिंगची प्रचंड क्रेझ असणाऱ्या वयात शरीरामध्ये एखादा अंमली पदार्थ गेल्यास आपण जगापेक्षा कुणीतरी वेगळे आहोत अशी भावना या तरूणांमध्ये निर्माण होते. भारतात अंमली पदार्थाच्या विळख्यात 14 ते 22 वयोगटातील तब्बल 40 टक्के तरूण आहेत.
अंमली पदार्थाचे दुष्परिणाम
दारू, सिगारेट, मावा, गुटखा, तंबाखू याचे दुष्परिणाम जगजाहीर आहेतच. ड्रग्ज व इतर व्यसनांचे परिणाम आणखी गंभीर आहेत. अंमली पदार्थांचे सेवन केल्याने शरीराची अन्नग्रहण करण्याची इच्छाच नाहीशी होते, मानसिक आजार जडतात, नजर कमी होते, स्मृतिभ्रंश, मधुमेह जडतो, मेंदूच्या कार्यावर व लैंगिक जीवनावरही परिणाम होतो.
उपाय
समाजातून अंमली पदार्थांच्या पुरवठ्याला प्रतिबंध घातला पाहिजे. त्यासाठी नार्कोटिक ड्रग्ज ॲण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट यासारख्या अंमली पदार्थ विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी. यावरती औषधे आहेत मात्र व्यसन हे न सांगता किंवा लपवून दिलेल्या औषधाने सुटत नाही. याचे कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे व्यसन वेगळे असू शकते. व्यसन सोडायचे असेल तर तज्ज्ञांच्या मदतीने, योग्य औषधोपचार, वेळोवेळी समुपदेशन, भावनिक संतुलन यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय (सिव्हील हॉस्पीटल), सांगली या ठिकाणी उपलब्ध आहे. व्यसनमुक्तीसाठी भोंदू बाबा, मांत्रिकाकडे जाण्यापेक्षा व्यसनमुक्ती केंद्रात गेले पाहिजे. प्रसार माध्यमे विशेषत: कर मनोरंजन क्षेत्राने व्यसनाचं स्तुतीकरण, गौरवीकरण, जाहिरात व्यापक समाजहिताच्या दृष्टीकोनातून कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपली युवा पिढी व आपली जवळची माणसे या अंमली पदार्थाच्या विळख्यापासून दूर रहावीत यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिकाने शासनास सहकार्य तर केलेचे पाहिजे आणि जनजागृतीसाठी प्रत्येकाने आपला सहभाग देणे ही काळाची गरज आहे.
-डॉ. माणिकराव शिवाजी सूर्यवंशी (सायकोलॉजिस्ट, सिव्हील हॉस्पीटल, सांगली)
Side Effects of the Drugs Human Health Detail Information International Day against Drug Abuse and Illicit Trafficking