इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – २०२१ मध्ये आलेल्या ‘शेरशाह’ या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये आपला जलवा दाखवला. या चित्रपटात दिसलेली ऑनस्क्रीन जोडी म्हणजेच अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे दोघेही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. गेले अनेक महिने ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. बॉलीवूडमधील इतर लग्नांप्रमाणे हा लग्नसोहळा देखील शाही थाटात होणार आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते फार उत्सुक आहेत. तूर्तास तरी त्यांच्या विवाह स्थळाचे इन्साईड व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
बॉलीवूडमध्ये सगळेच लग्न सोहळे शाही थाटात होत असतात. विशेषतः डेस्टिनेशन वेडिंगचे सध्या फॅड आहे. त्याप्रमाणे सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीय नुकतेच जैसलमेरला रवाना झाले आहेत. आजपासूनच त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. आता त्यांच्या लग्नाची तयारी कशी सुरू आहे हे दाखवणारे काही व्हिडीओ समोर आले आहेत.
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये सर्वत्र झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना राजस्थानी नृत्याचा आनंद घेता यावा यासाठी राजस्थानी नृत्य करणारे नर्तकही बोलवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या संगीत सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी गुलाबी रंगाची थीम ठरवण्यात आल्याचं व्हिडीओत दिसत आहे. संगीत कार्यक्रमासाठी गुलाबी रंगाच्या कापडाने सगळीकडे डेकोरेशन केलं जाईल. त्याचप्रमाणे मोठी मोठी झुंबरही लावण्यात येणार आहेत.
सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात रंगणार आहे यात शंका नाही. या लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे. या विवाह सोहळ्याला त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराबरोबरच बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्सना सुद्धा आमंत्रित केलं गेलं आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, वरुण धवन यांबरोबरच अनेक आघाडीचे कलाकार यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावतील असा अंदाज आहे.
Siddhartha Malhotra Kiara Advani Wedding Ceremony Video