इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – सिध्दार्थ जाधव हा मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता. आपल्या कामाने त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सध्या सिध्दार्थ ‘आता होऊ दे धिंगाणा’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे. आज जरी सिध्दार्थचे हे यश दिसत असले तरी येथवर पोहोचण्यासाठी त्याने चांगलाच संघर्ष केला आहे. त्याच्याच जोरावर आज तो हे यश अनुभवत आहे.
अलीकडेच त्याने आपल्या आणि वडिलांच्या संघर्षाबद्दल सांगितले होते. ‘आता होऊ दे धिंगाणा’, या कार्यक्रमाच्या सेटवर सिध्दार्थने मनमोकळेपणाने आपला स्ट्रगल सर्वांसमोर उघड केला. त्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून या कार्यक्रमात सहभागी कलाकारांनी त्याला सरप्राईज देत सिध्दार्थच्या कुटुंबियांना सेटवर बोलावले होते. त्यावेळी तो सांगत होता. प्लाझा सिनेमागृहासमोर माझे घर आहे. पण त्याच ‘प्लाझा’समोर बाहेर रस्त्यावर माझे वडील पेपर टाकून झोपायचे अशी आठवण सांगताना त्याला अश्रू अनावर झाले. त्यामुळेच या घराचे मोल माझ्यासाठी अधिक आहे, असे सिध्दार्थ सांगतो. अशा कष्टातून आम्हाला एक चांगला माणूस म्हणून घडवणाऱ्या वडिलांचा मला खूप अभिमान आहे, असेही तो म्हणाला.
सिध्दार्थच्या कुटुंबियांना तसेच त्याच्या चाहत्यांना अभिमान वाटेल अशी एक गोष्ट नुकतीच घडली आहे. एका ब्रॅण्डने सिध्दार्थच्या कपड्यांचं कलेक्शन लॉन्च केलं आहे. स्वतः सिध्दार्थने याबद्दल एक पोस्ट टाकली आहे. ही पोस्ट त्याच्या चाहत्यांमध्ये भलतीच लोकप्रिय होते आहे. सिध्दार्थ लिहितो, माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट. तसं तर नवीन कपडे घालायला मला लहानपणापासून आवडायचं. पण मनात आलं की नवीन कपडे अशी चैन नव्हती तेव्हा. सणासुदीला नवीन कपडे मिळत असत. कॉलेजमध्ये असताना तर अनेकदा मी मित्रांचे कपडे घातले आहेत. सिध्दार्थच्या वाढदिवसानिमित्त @claiworld ने silver o leaf या ब्रॅण्डसोबत सिध्दार्थ जाधव कलेक्शन मार्केटमध्ये आणले आहे. यापेक्षा वेगळं गिफ्ट काय असू शकतं ? असा प्रश्नही सिध्दार्थने विचारला आहे. सिध्दार्थची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत असून चाहते त्यावर भरभरून कमेंट करत आहेत. आम्हाला तुझा अभिमान वाटतो, अशा कमेंट्स अनेक चाहत्यांनी दिल्या आहेत.