मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेशी बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार यांच्याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार नक्की का नाराज झाले यासंदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे शिंदे यांनी अखेर मोठे पाऊल उचलले आहे. ते नेमके काय हे आता आपण जाणून घेणार आहोत.
शिंदे यांच्या नाराजी आणि असंतोषाला मुख्य कारण हे महाविकास आघाडीचा घटक पक्ष काँग्रेस हे पक्ष आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने पवईच्या एका हॉटेलमध्ये सेनेच्या सर्व आमदारांना ठेवले होते. काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याच्या भूमिकेवरून एकनाथ शिंदे यांचे मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याशी वाद झाले होते. हा वाद कडाक्याच्या भांडणापर्यंत गेला होता. तेथूनच शिंदेंच्या मनात आग धुमसत होती.
काँग्रेस पक्षासाठी अतिरिक्त मते वापरण्यावरून त्यांच्यात वाद झाल्याचे एका सूत्राने सांगितले. काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्यास शिंदे हे विरोध करत होते. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना आवश्यक असलेली मते मिळाली, मात्र दुसरे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्याआधी विधान परिषद निवडणुकीसाठी मतांचा वापर करण्यावर चर्चा सुरू होती. त्यात मतभेद झाले होते. शिवसेना आमदारांच्या मतांचा वापर करून काँग्रेस उमेदवारांना आमदार म्हणून निवडून देण्याच्या विरोधात शिंदे होते. शिंदे आणि ठाकरे व राऊत यांच्यात जोरदार वादावादी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत जे काही सुरू आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सूत्राने सांगितले. इतकेच नव्हे तर याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही स्पष्ट शब्दात सांगितले होते. काँग्रेसकडे केवळ एकाच उमेदवारासाठी आवश्यक मते होती. मात्र, त्यांनी दोन उमेदवार उभे केले. ही बाब अयोग्य असल्याचा मुद्दा शिंदे यांनी ठासून सांगितला.
राज्यसभा निवडणुकीत सेना उमेदवार संजय पवार यांचा झालेला पराभव सुद्धा अपमानजनक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी योग्य सहकार्य केले नसल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. मात्र, त्याकडे ठाकरे व राऊत यांनी दुर्लक्ष केले. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत हंडोरे हे पहिले उमेदवार होते. ते निवडणूक जिंकेतील असे सर्वांना वाटत होते. मात्र दुसरे उमेदवार भाई जगताप विजयी झाले आणि हंडोरे यांचा पराभव झाला. त्यानंतर मोठ्या राजकीय नाट्याला सुरुवात झाली आहे. आता शिंदे हे जवळपास ४० समर्थक आमदारांसह आसाममध्ये गेल्याचे दिसून येत आहे.
shvsena minister eknath shinde rebelled aditya thakre sanjay raut congress