नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (CDS) परीक्षेत शुभम जगताप याने देशात ४९ वा क्रमांक मिळविला आहे. तो लवकरच डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी येथे प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहे. या यशाबद्दल मनमाड व नाशिक परिसरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (CDS) ही परीक्षा पदवीनंतर संरक्षण दलात रूजू होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून तरुणांना लष्कराच्या तिन्ही दलांत अधिकारी होण्यासाठीची संधी मिळते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांना ‘एसएसबी’ मुलाखतीसाठी बोलवले जाते. या मुलाखतीत विविध प्रकारच्या चाचण्यांनंतर त्यांची वैद्यकीय चाचणी होते. त्यानंतर मूळ प्रवेश परीक्षा, मुलाखत व वैद्यकीय चाचणी, या तिन्ही गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम राष्ट्रीय गुणवत्ता श्रेणी (रँकिंग) ठरते व अंतिम प्रशिक्षणासाठी निवड होते.
संरक्षण दलात अधिकारी होण्यासाठी प्रवेश परीक्षा ही अत्यंत अवघड मानली जाते. मात्र शुभम सीडीएस परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. यावर्षी देशभरातून जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यापैकी साडेचार हजार विद्यार्थी लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले. यापैकी १४२ विद्यार्थांची अंतिम निवड झाली. शुभमचे प्राथमिक शिक्षण सैनिक स्कूल सातारा येथे झाले आहे. त्याला हॉर्स रायडिंग, शूटिंग, स्विमिंग, तबला यांची आवड आहे. शुभमचे वडील मनोज गणपतराव जगताप निवृत्त रेल्वेचालक आणि वकील असून, आई वर्षा मनोज जगताप या मनमाड येथे शिक्षिका आहेत.
परिश्रमांमुळे मिळाले यश
शुभम आपल्या यशाबद्दल म्हणाला की, ‘इतर कोणी आपल्यावर विश्वास ठेवण्याआधी, आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. स्वतःवरील दृढ विश्वास, परिश्रम आणि समर्पण यामुळे ध्येय साध्य होते,’ असे मत व्यक्त करत भारतीय सैन्य दल अधिकारी होण्याचे आपले स्वप्न असल्याचे शुभम म्हणाला.