नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात आज सापळा यशस्वी केला आहे. त्यात ४ लाचखोर सापडले आहेत. श्रीरामपूर येथे दोन एजंटसह पाटबंधारे विभागाचा कालवा निरीक्षक तर चोपडा पोलिस स्टेशनमधील सहाय्यक फौजदार यांनी लाच मागितली होती. याप्रकरणी चौघांवर एसीबीने कारवाई केली आहे.
शेतीला पाणी देण्यासाठी मागितली लाच
पाटबंधारे विभागामार्फत देण्यात येणारे पाणी चालू राहू देण्यासाठी एकूण ८५ हजार रुपये लाचेची मागणी करुन ४० हजार रुपये लाच स्विकारतांना कालवा निरीक्षक व दोन खासगी इसम एसबीच्या जाळ्यात अडकले आहे. या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंध विभागाने कालवा निरीक्षक अंकुश सुभाष कडलग, खासगी इसम अनिस सुलेमान शेख, संजय भगवान करडे यांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेबाबत एसबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे सुनेचे नावे महाराष्ट्र शेती विकास महामंडळ यांचे मालकीचे हरेगाव मळा येथील गट नंबर ३ मधील ३१९ एकर शेती आहे. दहा वर्षाच्या करार पद्धतीने ही शेती कसण्यास घेतलेली आहे. तक्रारदार यांनी सदर क्षेत्रापैकी सध्या ६० एकर ऊस लागवड केली होती. सदर शेतीस पाटबंधारे विभागाचे आवर्तनाद्वारे पाणी मिळते. त्यास दर तीन महिन्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी पट्टी भरावी लागते. तक्रारदार यांना माहे जानेवारी २०२३ ते मार्च २०२३ या कालावधीत रुपये २६ हजार २८० रुपये पाणीपट्टी आली होती. सदरची पाणीपट्टी तक्रारदार हे शेती महामंडळाचे हरेगाव येथील कार्यालयात भरतात. महामंडळातर्फे सदर पाणीपट्टी पाटबंधारे विभागास वर्ग केली जाते. तक्रारदार यांचे ६० एकर उसाचे क्षेत्र आहे पैकी ३५ एकर क्षेत्रासाठी शेतात असलेल्या विहीर व बोअरद्वारे सिंचन करतात. उर्वरित २५ एकर साठी पाटबंधारे विभागाकडून कालव्याचे पाणी घेतात.
लाचखोर कालवा निरीक्षक अंकुश कडलग याने तक्रारदार यांना त्यांचे शेती सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्याचे सांगितले. तसेच, पाटबंधारे विभागामार्फत देण्यात येणारे पाणी अविरत चालू राहू देण्यासाठी एकूण ८५ हजार रुपये लाच द्यावी लागेल अशी मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. त्यानुसार ७ जुन रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाचखोर कडलग याने खासगी एजंट अनिस शेख याच्या मार्फत तक्रारदाराकडे पंचा समक्ष ८५ हजार लाचेची मागणी करून तडजोडी अंती ४० हजार लाचेची मागणी केली. फोनवरील संभाषणाद्वारे दुजोरा दिला. आज, २५ ऑगस्ट रोजी शेख याने तक्रारदार यांचे कडून पंचा समक्ष ४० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारून सदर रक्कम खासगी एजंट संजय करडे याचेकडे हस्तांतरित केली. याप्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, जि.अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
चोपड्याचा लाचखोर सहायक फौजदार
पंधरा हजार रुपयाची लाच घेतांना चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा लाचखोर सहाय्यक फौजदार शिवाजी ढगु बाविस्कर हा एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. गांजा प्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी अगोदर ३० हजार व मोटार सायकल सोडण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी लाचखोर बाविस्करने केली. नंतर तडजोडअंती १५ हजार रुपये स्विकारण्याची पंचासमक्ष तयारी दर्शविली. अखेर १५ हजार रुपये चोपडा शहरात स्वतः स्विकारतांना लातखोर बाविस्करला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याच्याविरुध्द चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
या घटनेबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे चुलत भाऊ व त्याच्या मित्र यांना २३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लासूर गावाजवळ पोलीसांनी पकडले. रस्त्यावर मोटार सायकलवर ते जात होते. तुमच्या जवळ गांजा आहे. तुम्ही स्टेशनला चला असे सांगितले. जर गांजाची केस व मोटार सायकल सोडवायची असेल तर ७५ हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील असे सांगितले. तडजोडी अंती तक्रारदार यांचे नातेवाईकाकडुन पहाटे ४ वाजता ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर मोटार सायकल त्यांनी ठेवून घेतली जर तुम्हाला मोटार सायकल सोडवायची असेल तर तुम्हाला आणखी २० हजार रुपये द्यावे लागतीत असे सांगितले. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी लाचखोर बाविस्करने गांजाची केस न करण्यासाठी व मोटार सायकल सोडण्यासाठी ३० हजार रुपयाची मागणी केली. तडजोडअंती १५ हजार रुपये स्विकारण्याची पंचासमक्ष तयारी दर्शविली. त्याप्रमाणे लाचखोर बाविस्करने उर्वरीत १५ हजार रुपये २५ ऑगस्ट रोजी चोपडा शहरात स्वतः स्विकारले. त्यामुळे एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
Shrirampur Chopda ACB Trap Bribe Corruption
Jalgaon Anti Corruption Ahmednagar Irrigation Police