इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पालघर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापण्यात आले आहे. या मतदार संघात माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे वनगा हे प्रचंड नाराज झाले. त्यानंतर त्यांनी परवा रात्रीपासून घर सोडले. ते कोठे गायब झाले याचा शोध घेतला जात होता. पण, मंगळवारी मध्यरात्री तीन वाजता घरी आले. त्यांनी पत्नीशी चर्चा केली आणि ते पुन्हा आपल्या नातेवाईकांकडे विश्रांतीसाठी गेले अशी माहिती त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी दिली.
त्यानंतर वनगा यांचे कार्यकर्ते निर्धास्त झाले होते. पण, आता त्यांचे कुटंबही गायब झाले. आमदार वनगा हे ३६ तासांनी परत आल्यामुळे सर्वांना हायसे वाटले होते. पण, आता कुटुंब गायब झाल्यामुळे सर्वांना धक्का बसला. त्यांच्या घराचे कुलूप बंद असून घरी कोणीही नाही. त्यांच्या घरासमोर मात्र मोठा पोलिस बंदोबस्त पहायला मिळत आहे. मात्र त्यांचे कुटुंबिय कुठे गेले हा प्रश्न आता उपस्थितीत होत आहे.
संयमाचा बांध फुटला होता
सोमवारी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या संयमाचा बांध फुटला होता. त्यांनी माझी फसवणूक झाल्याचे म्हटले. उध्दव ठाकरे हे देवमाणूस होते. मी घातकी माणसासोबत गेलो माझा घात झाला असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून आमदार वनगा यांना विधान परिषदेत संधी देण्याचे आश्वासन त्यांच्या पत्नीला देण्यात आले होते.