श्रीकृष्ण जन्माष्टमी
विशेष लेखमाला
जगदगुरू श्रीकृष्ण
जिथे शिकले
ते संकुल आहे अतिशय प्रसन्न
भगवान श्रीकृष्णाला जगद्गुरु म्हणतात. विश्वाला जगण्याचे तत्वज्ञान शिकाविनार्या श्रीकृष्णाला सगळे जग सदैव वंदन करते. कृष्णमवन्दे जगद्गुरुम असे ज्याला साधू, संत ,महात्मे आणि साक्षात देवही म्हणतात त्या श्रीकृष्णाचे शिक्षण सांदीपनी ॠषींच्या आश्रमात झाले.
जन्माष्टमी निमित्त आज आपण संदीपनी ॠषींच्या आश्रमाची माहिती करुन घेणार आहोत. मध्य प्रदेशातील उजैन येथे असलेला सांदीपनी ॠषींचा आश्रम द्वापर युगात धर्म, अध्यात्म आणि वैदिक ज्ञान देणारे सगळ्या जगातले श्रेष्ठ केंद्र होते. महर्षि संदीपनी यांची ही तपोभूमी द्वापरयुगात वेद, पुराण, शास्त्र, धर्म आणि नैतिक शिक्षण देणारे देशातले प्रमुख केंद्र म्हणून मान्यता पावले होते. ब्रह्मपुराण, अग्निपुराण , महाभारत आणि श्रीमदभागवत यासारख्या जगद्मान्य ग्रंथांत देखील सांदीपनी ॠषींच्या आश्रमाचा उल्लेख सापडतो.
सांदीपनी गुरुंचे गुरु!
धर्म, अध्यात्म आणि मोक्षदायिनी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उजैन नगरीतील सांदीपनी ॠषींचा आश्रम विश्व प्रसिद्ध होण्याचे दुसरे एक कारण म्हणजे भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि त्यांचे बालमित्र सुदामा यांनी याच आश्रमात राहून सांदीपनी ॠषींकडून वेदांचे आणि शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले. त्यामुळच आजही सांदीपनी ॠषींच्या आश्रमाला श्रीकृष्णाची विध्यास्थळी किंवा श्रीकृष्णाचे शिक्षण केंद्र म्हनुनच ओळखले जाते. पौराणिक कालागणनेनुसार आजपासून सुमारे ५५०० वर्षांपूर्वी द्वापरयुगात उजैन मध्ये असलेल्या सांदीपनी ॠषींच्या याच आश्रमात शिक्षण घेण्यासाठी भगवान श्रीकृष्ण येथे आले होते.
श्रीकृष्णाच्या पौराणिक चरित्रा नुसार कंसाचा वध केल्या नंतर श्रीकृष्णाने मथुरेचे राज्य त्याचे नाना राजा उग्रसेन यांच्या हवाली केले. त्यानंतर श्रीकृष्णाचे वडिल वासुदेव आणि माता देवकी यांनी बलराम आणि श्रीकृष्ण यांना यज्ञोपवित संस्कार करण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी उजैन येथील संदीपनी ॠषींच्या आश्रमात पाठविले होते. यानंतर याच आश्रमात राहून बलराम आणि श्रीकृष्ण यांनी चौसष्ठ कला शिकले तसेच वेद आणि पुराण यांचे सखोल ज्ञान संपादन केले.
विद्यार्थी दशेतील भगवान श्रीकृष्ण!
आश्रमातील मुख्य स्थान जेथे गुरु संदीपनी बसत असत तेथे हल्ली मंदिराच्या आकाराची एक खोली बनविण्यात आलेली आहे. या खोलीत गुरु शिष्य परंपरा विविध मुर्तींच्या रुपांत दाखाविण्यात आलेली आहे. या मुर्तींमध्येच गुरु संदीपनी ॠषीं आणि त्यांच्या पादुका यांचे दर्शन होते. या ठिकाणी बसूनच बलराम, श्रीकृष्ण आणि सुदामा यांनी विद्यार्जन केले. आज याच ठिकाणी लिहिणे व वाचन करणारे बलराम,श्रीकृष्ण, सुदामा आणि त्यांचे गुरु संदीपनी ॠषीं यांच्या प्रतिमा पहायला मिळतात. सांदीपनी ॠषींच्या आश्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे केवळ येथेच बलराम, श्रीकृष्ण आणि सुदामा यांना विद्यार्थी रुपांत पहायला मिळते. या स्थाना शिवाय इतर कुठेही बलराम, भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा हे विद्यार्थी दशेत पहायला मिळत नाहीत.गुरुकुलाच्या भिंतीवर श्रीकृष्ण,बलराम आणि सुदामा आपले गुरुदेव संदीपनी यांच्या सह विविध चित्रांत दाखविले आहेत. यांत श्रीकृष्णाच्या अनेक लीला अतिशय सुदंर प्रकारे दाखविलेल्या आहेत.
महर्षि संदीपनी स्मृती ग्रंथालय
उजैनच्या या आश्रमात अतिशय समृद्ध असे महर्षि संदीपनी स्मृती ग्रंथालय आहे. जेथे महर्षि संदीपनी भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांच्या विषयीचे अनेक ग्रंथ तसेच वेद,पुराने व असंख्य धार्मिक आणि पौराणिक ग्रंथ पहायला मिळतात. हे ग्रंथालय अधिक समृद्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यात प्राचीन तम शिक्षण प्रणाली आणि आधुनिक शिक्षण प्रणाली यांच्या बाबत सविस्तर समजाविन्याच्या योजना आहेत. येथे असतांना भगवान श्रीकृष्ण कोणत्या ६४ कला शिकला आणि त्याने या आश्रमात कशा प्रकारे शिक्षण घेतले यावर ही प्रकाश टाकण्यात येईल.
श्रीकृष्ण निर्मित गोमती कुंड
या आश्रमातील गोमती कुंड हे श्रद्धाळू भाविकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आकर्षण केंद्र आहे. श्रीकृष्णाने आवाहन केल्यामुळे हे गोमती कुंड तयार झाले असे म्हणतात. महर्षि संदीपनी यांना पवित्र तीर्थांचे स्नान करण्यासाठी दूर जाव लागु नये यासाठी श्रीकृष्णाने हे कुंड निर्माण केले होते. त्याच प्रमाणे शिक्षण पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णाने संदीपनी ॠषींना सागराने गिळलेल्या संदीपनी ॠषींच्या पुत्राला पुन्हा आणून त्यांना ही जगावेगळी गुरुदक्षिणा दिली होती अशी कथा आहे.
Shrikrishna Janmashtami Special Krishna Sandipani Aashram by Vijay Golesar
Ujjain