इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरमधील व्हिटस हॅाटेल प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जातो. संजय शिरसाट यांनीच एका जाहीर कार्यक्रमात याची कबुली दिली. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही नोटीस पाठवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान संजय शिरसाट यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाची नोटीस आल्याचे सांगत गौप्यस्फोट केला. दरम्यान या नोटीसवरुन गदारोळ झाल्यानंतर शिरसाट यांनी आपले वाक्य मागे घेतले.
संजय शिरसाट म्हणाले की, आयकर विभाग हा प्रत्येकाची तपासणी करत असतो. मला नोटीस आली आहे. श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस आली आहे. आणखी कोणाल नोटीस येत असेल, त्यामुळे आम्ही आयकर विभागाला उत्तर द्यायला बांधील आहोत. मला ९ तारखेला उत्तर द्यायला सांगितले होते. मी त्यांच्याकडे वेळ मागून घेतली. असे त्यांनी सांगितले. दरम्यान एकनाथ शिंदे हे अधिवेशन चालु असतांना अचानक दिल्लीला गेल्यामुळे या नोटीसचा आता संबध जोडला जात आहे.
उच्चस्तरीय समितीकडून चौकशी
या अगोदर विधान परिषदेत विट्स हॉटेल संबंधित वादग्रस्त निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. वेदांत म्हणजेच विटस हॅाटेलच्या लिलावरुन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. संजय शिरसाट यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरमधील विटस हॅाटेलच्या लिलाव प्रक्रियेत बाजारभावानुसार किंमत ११० कोटी रुपये असतांना केवळ ६७ कोटी रुपयांत हॅाटेल विकत घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिरसाट यानी टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याचे जाहीर केले होते. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मुख्यमंत्री .फडणवीस यांनी चौकशी करण्याचे मान्य केले.