नाशिक – जयाभाऊ, भाषा भवन उभाराल तेव्हा उभारा, अगोदर साहित्य संमेलनाचा हिशेब या अशी मागणी संमेलनाचे स्वागत समिती सदस्य श्रीकांत देणी यांनी पत्रकान्वये केली आहे. दि. ३,४ आणि ५ डिसेंबर २०२१ रोजी ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी म्हणजे भुजबळ नॉलेज सिटीच्या आवारात संपन्न झाले. हे संमेलन पार पडून २ महिने झाले आहेत तरी अद्याप या संमेलनाचे आयोजक लोकहितवादी मंडळाने हिशेब जाहिर केलेले नाहीत अथवा धर्मादाय आयुक्तांकडे देखील सादर केलेले नाहीत. त्यामुळे पहिले हिशेब तयार करून ते सनदी लेखापालांकडून तपासून साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीची बैठक तातडीने बोलावून समितीसमोर मंजुरीसाठी सादर करावेत असे आवाहन श्रीकांत बेणी यांनी या पत्रकात केले आहे.
अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलनाच्या अक्षरयात्रा जून २०२१ च्या नियतकालिकामध्ये अध्यक्षीय मनोगत प्रसिध्द करुन लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगांवकर यांच्या कार्यपध्दतीविषयी आक्षेप घेणारा मजकूर प्रसिध्द केला होता. संमेलनाकरीता किमान १ हजार स्वागत समितीचे सदस्य बनवून त्यामार्फत जमणाऱ्या निधीतून साध्या पध्दतीने संमेलन पार पाडावे आणि त्या संमेलनात राजकीय नव्हे तर साहित्यिक चर्चा घडवून आणून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आयोजक लोकहितवादी मंडळाने खरोखर स्वागत समितीचे किती सदस्य बनविले होते या प्रश्नाचे उत्तर हिशेब पुढे आल्याशिवाय मिळू शकणार नाही. या संमेलनाकरीता महाराष्ट्र शासनाने दरवर्षीप्रमाणे ५० लाख रुपयांचे अनुदान अ. भा. मराठी साहित्य महामंडळाला दिले होते. परंतु त्याचबरोबर संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या प्रभावामुळे संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच आमदार निधीतून कोटयावधीचा निधी संमेलनासाठी प्राप्त झाल्याची चर्चा आहे. या व्यतिरिक्त जिल्हा नियोजन मंडळ, नाशिक महानगरपालिका, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक जिल्ह्यातील सहकारी बँका आदींच्या माध्यमातून देखील लाखो रुपयांचा निधी संमेलनासाठी जमल्याची चर्चा आहे. तसेच शहरातील अनेक नामांकित बिल्डर्स, औद्योगिक वसाहतीतील कारखाने यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर निधी गोळा करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या व्यतिरिक्त स्वागत समिती शुल्क, पुस्तक प्रदर्शन स्टॉल, साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे प्रतिनिधी शुल्क या माध्यमातूनही मोठा निधी जमलेला आहे. हा एकूण जमलेला कोट्यावधी रुपयांचा निधी नेमका कोणकोणत्या कारणांसाठी खर्च झाला हे जाणून घेण्याचा अधिकार हा शहरातील सामान्य नागरीकांना आहे. कारण शासनाने दिलेला हा निधी नागरीकांनी दिलेल्या करातूनच दिलेला आहे असे बेणी यांनी पत्रकात नमुद केले आहे.
संमेलनाच्या मांडवावर, जेवणावळीवर, करमणुकीच्या कार्यक्रमांवर आणि मुख्यतः मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रांवर प्रत्यक्ष किती खर्च झाला याचा तपशील आयोजक लोकहितवादी मंडळाने दिला पाहिजे. कोणतेही शासकीय पाठबळ नसतांना १५ वे विद्रोही साहित्य संमेलन काही लाखांमध्ये पार पडले आणि आयोजकांनी त्याचे हिशेब देखील जाहिर केले. मग या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणा दिमतीला असतांना आणि भुजबळ नॉलेज सिटी सारखी प्रभावी शिक्षण संस्था पाठीशी असतांना लोकहितवादी मंडळाकडून हिशेब जाहिर करण्यात विलंब कां ? असा प्रश्न या पत्रकात विचारण्यात आला आहे.
साहित्य संमेलन स्वागत समितीच्या शुल्कातून साध्याच पध्दतीने पार पाडावे अशी भूमिका मांडणारे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले पाटील आणि महामंडळाचे पदाधिकारी, सदस्य यांनी प्रत्यक्षात हॉटेल एक्सप्रेस इन या उंची हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून चांगलाच पाहुणचार घेतला अशी चर्चा आहे. या त्यांच्या पाहुणचारावर करदात्यांच्या पैशातून नेमका किती खर्च झाला हे देखील समजणे आवश्यक आहे. चांगल्या पाहुणचारामुळेच साहित्य संमेलनात लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगांवकर यांनी यातलेल्या गोंधळाबद्दल ठाले पाटलांनी मौन बाळगले कां ? असा प्रश्न देखील या पत्रकात विचारण्यात आला आहे.संमेलनाचा हिशेब देण्याऐवजी जयप्रकाश जातेगांवकर हे नाशिकमध्ये लोकहितवादी मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा भवन उभारण्याचे गाजर नाशिककरांना दाखवित आहेत. शासनाचे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे या कामासाठी स्वतःच सक्षम असतांना दुष्कृत्यांमुळे राका कॉलनीतील कार्यालय देखील यालवून बसलेल्या आणि एखादे चार ओळींचे पत्र जरी टाईप करायचे असले तरी सार्वजनिक वाचनालयाची मदत घ्यावी लागणाऱ्या लोकहितवादी मंडळाची या प्रचंड कामासाठी आवश्यकता काय ? असा प्रश्न बेणी यांनी पत्रकात विचारला आहे.
१८१ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या आणि मराठी भाषेच्या संवर्धसाठी अखंडपणे विविध उपक्रम वर्षानुवर्षे राबविणाऱ्या सार्वजनिक वाचनालय, नाशिक या सांस्कृतिक क्षेत्रातील मातृ संस्थेने सन २०१९ मध्ये साहित्य संमेलनाचे निमंत्रण अ. भा. मराठी साहित्य महामंडळाला दिले होते. या निमंत्रणानुसार महामंडळाच्या प्रतिनिधींनी नाशिकमध्ये येवून स्थळ पाहणी देखील केली होती. परंतु त्यावर्षी संमेलन उस्मानाबादला दिले गेले. वाचनालयाच्या प्रतिनिधींनी उस्मानाबादला जावून सन २०२० मधील संमेलनासाठी पुनःश्च महामंडळाकडे विनंती केली. त्यानुसार माहे मार्च २०२० मध्ये महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले पाटील यांनी वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून संमेलन आयोजनाबाबत विचारणा केली. परंतु त्याच दरम्यान वाचनालयाचा सन २०१७ ते २०२२ या काळातील निवडणुकीचा फेरफार अर्ज मा. धर्मादाय उपआयुक्त यांनी फेटाळला असल्याने आणि त्या संदर्भातील अपिल प्रलंबित असल्याने वाचनालयापुढे कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सावानाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार संमेलनाचे आयोजन वाचनालयाचे तत्कालीन कार्याध्यक्ष तथा लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगांवकर यांनी लोकहितवादी मंडळाच्या माध्यमातून करावे, त्यासाठी वाचनालयाचे २ कार्यकारी मंडळाचे सभासद लोकहितवादी मंडळाने त्यांच्या कार्यकारिणीमध्ये घ्यावेत आणि संमेलन यशस्वी करण्यासाठी सावानाच्या कार्यकारी मंडळाने यथाशक्ती मदत करावी असे ठरविण्यात आले होते. त्यानुसार सावानाचे प्रा. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर यांचा लोकहितवादी मंडळाच्या कार्यकारी मंडळामध्ये. समावेश झाला आणि पुढे संमेलनाचे कामकाज सुरु झाले. संमेलन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजरोडवरील प्रांगणात घेण्याचे आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद प्राचार्य एम. एस. गोसावी यांचेकडे देण्याचे देखील सन २०१९ मध्येच ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात लोकहितवादी मंडळाकडे सावानाने संमेलनाची सूत्र सोपविल्यानंतर जयप्रकाश जातेगांवकर यांचा एककल्ली कारभार सुरु झाला आणि त्यातून संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी स्वागत समितीच्या सदस्यांची बैठक होण्याअगोदरच पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांची निवड जाहिर करण्यात आली. कोरोनाचा कहर वाढल्याने माहे मे २०२० मध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आवारात होणारे हे संमेलन पुढे ढकलण्याची वेळ संयोजकांवर आली. अखेर डिसेंबरचा मुहूर्त ठरविण्यात आला तेव्हा गोखले एज्युकेशन सोसायटीने क्षुल्लक कारण देवून अंग काढून घेतले आणि अखेर संमेलन भुजबळ नॉलेजसिटीच्या आवारात संपन्न झाले. परंतु हा बदल होण्यामागे संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद हे देखील कारण होते. जयप्रकाश जातेगांवकर यांच्या एककल्ली कारभाराचा सर्वांनाच जाच होवू लागल्याने अखेर संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना.छगन भुजबळ आणि हेमंत टकले यांनी पुढाकार घेवून विश्वास ठाकूर यांना संमेलन आयोजनात लक्ष घालण्यास सांगून ठाकूर यांच्यामार्फत विविध समित्यांची निर्मिती करून त्यामध्ये विविध घटकातील कार्यकर्त्यांना सहभागी करून घेवून संमेलन यशस्वीपणे पार पाडले. परंतु याच कार्यकर्त्यांना साधे प्रमाणपत्र देखील याचना करून मिळवावे लागले अशी खंत या पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे.
मराठी भाषा भवन उभारण्याचा प्रस्ताव शासकीय स्तरावर अनेक वर्षांपासून विचाराधीन आहे. संमेलनात या संदर्भात ठराव देखील करण्यात आला आहे. परंतु हा प्रस्ताव केवळ लोकहितवादी मंडळामुळे झाला असा दावा चुकीचा आहे. खरे तर असे भाषा भवन उभारण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ही शासकीय संस्था सक्षम आहे. मुक्त विद्यापीठाला याकामी एखाया धर्मादाय संस्थेची मदतीचा आवश्यकता असल्यास १८१ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालय, नाशिक या मातृसंस्थेचीच मदत घेणे योग्य राहिल. त्यामुळे सावानाचे कार्याध्यक्ष पद भूषविणाऱ्या संजय करंजकर आणि प्रमुख सचिव पद भूषविणाऱ्याजयप्रकाश जातेगांवकर यांनी याकामी सावानाच्या ऐवजी लोकहितवादी मंडळाचे घोडे दामटणे हा एक प्रकारे मातृ संस्थेशी केलेला द्रोह आहे असेही बेणी यांनी पत्रकात नमुद केले आहे.
लोकहितवादी मंडळाने या संदर्भात शासनाला सादर केलेल्या प्रस्तावामध्ये मराठी भाषा भवनाचे कार्यकारी अध्यक्ष व सचिव हे लोकहितवादी मंडळ या संस्थेचे अध्यक्ष व सचिव असतील असे नमूद केले आहे. म्हणजे या भाषा भवनाचे कार्यकारी अध्यक्ष हे ठेकेदार जयप्रकाश जातेगांवकर राहातील असे या प्रस्तावावरून आढळून येते. नाशिकमध्ये रमेश वरखेडे, रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, प्रा. एकनाथ पगार, गो.तु. पाटील, प्रा. दिलीप फडके, प्रा. अनंत येवलेकर, प्रा. वृंदा भार्गव, प्रकाश होळकर यांच्यासारखे अनेक ज्येष्ठ मराठी भाषा तज्ज्ञ उपलब्ध असतांना त्यांनी जातेगांवकरसारख्या ठेकेदाराच्या अध्यक्षतेखाली काम करावे कां ? असा प्रश्न बेणी यांनी पत्रकात विचारला आहे. भाषा भवन उभाराल तेव्हा उभारा, पहिले संमेलनाचे हिशेब जाहिर करा अशी मागणी या पत्रकात शेवटी करण्यात आली आहे.