अधिक मास विशेष लेखमाला
श्री विष्णु पुराण (भाग 3)
कहाणी समुद्र-मंथनाची!
दुर्वास ॠषींच्या शापा मुळे देवराज इन्द्राचे सर्व वैभव आणि बळ लयाला गेले. ती संधी साधून दानव व दैत्य यांनी त्याच्यावर आक्रमण केले. त्या घनघोर लढाईत इंद्र हरला. त्यानंतर देव आणि दानव यांच्यात वारंवार अनेक युद्धे झाली . त्यामध्ये देवांचा पुनःपुन्हा पराभव होत होता.
हताश झालेले देव भगवान विष्णूंकडे विजय प्राप्तीसाठी उपाय विचारायला गेले. भगवंत म्हणाले, ‘तुम्ही वेळ न दडवता अमृत मिळवण्याचा प्रयत्न करा. अमृत प्यायल्याने प्राणीदेखील अमर होतात. तुम्ही तर देव आहात! तुम्ही अमृत प्राशन केल्यावर अमर व्हाल आणि मग असुरांशी युद्धात जिंकाल.’
देवांनी विचारले, ‘हे कमलनयना! आम्ही अमृत मिळवण्यासाठी काय करावे ?’ भगवंतांनी सांगितले, ‘आधी क्षीरसागरामध्ये विविध प्रकारची वनौषधी टाका. मग मंदाराचलाची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून, आळस झटकून समुद्राचे मंथन करा. हे काम तुम्हाला एकट्याने जमण्यासारखे नाही. तुम्हाला असुरांची मदत घ्यावी लागेल. एखादे मोठे कार्य करायचे असेल, तर शत्रूशी देखील सख्य करावे लागते. काम झाल्यानंतर साप जसा उंदराला गिळून टाकतो, तसे शत्रूला गिळून टाका. देवांनो, तुम्ही असुरांकडे जाऊन त्यांची मदत मागा, त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करा. या कामात दैत्यांना श्रम पडतील आणि तुम्हाला अमृत मिळेल, अशा प्रकारे युक्तीने वागा.
मंथन करताना समुद्रातून विष आले, तर घाबरू नका. आकर्षक वस्तू आल्या, तर त्यांचा लोभ धरू नका. एखादी वस्तू मिळाली नाही, तर चिडू नका. तुम्हाला केवळ अमृत मिळवायचे आहे, हे लक्षात ठेवा. मंथन करताना नित्य माझे स्मरण करा, मी तुमच्या पाठीशी आहेच.’
विष्णूंची आज्ञा घेऊन, इंद्रादी देव निःशस्त्र होऊन दैत्यराज बळीकडे गेले. बुद्धिमान इंद्राने, भगवंतांनी शिकविले होते, तसे मधुर शब्दांत बळीला सांगितले. दैत्य राजाला समुद्रमंथनाचा प्रस्ताव मान्य झाला. तेथे बसलेल्या शंबर, अरिष्टनेमी व इतर असुरांनाही आवडला. देव- असुरांनी आपासांत समेट केला आणि मंथनाच्या तयारीला लागले.
त्यानंतर त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून मंदाराचल उखडला आणि समुद्राकडे घेउन गेले. समुद्रमंथनातून मिळणाऱ्या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल, असे नागराज वासुकीला वचन देऊन, त्याची मदत घेतली. वासुकीला दोराप्रमाणे मंदाराचलाला गुंडाळून, देवांनी त्याच्या मुखाची बाजू धरली. दैत्यांना शेपटाची बाजू धरणे मान्य झाले नाही. ते म्हणाले, ‘शेपूट नागाचे अपवित्र अंग आहे. आम्ही ते धरणार नाही.’ मग (आधीच मनात ठरवल्याप्रमाणे) देवांनी मुखाची बाजू सोडली आणि शेपटीची बाजू धरली.
सगळे देव शेपटीच्या बाजूला आणि दानव मुखाच्या बाजूला आपापले स्थान निश्चित करून उभे राहिले. त्या पर्वताला खाली आधार नसल्याने, मंदाराचल समुद्रात बुडू लागला. ते पाहून सगळे उदास झाले. मनात भगवंताचे स्मरण चालू असल्याने, विष्णू तिथे आले. त्यांनी देवांना सांगितले, ‘कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात केली असता विघ्नसंतोषी लोक अडथळे आणतात. हा तसाच प्रकार आहे; पण तुम्ही प्रयत्न सोडू नका आणि निराश होऊ नका.’ विष्णूने विशाल कूर्मरूप धारण केले आणि समुद्रात प्रवेश केला. जंबूद्वीपाप्रमाणे एक लाख योजने विस्तार असलेल्या आपल्या पाठीवर त्यांनी मंदाराचलाला धारण केले.
समुद्रमंथन यशस्वी करण्यासाठी भगवंतांनी दैत्यांमध्ये आसुरी शक्तीच्या रूपात, देवतांमध्ये उत्साहाच्या रूपात आणि वासुकीमध्ये निद्रारूपात प्रवेश केला. इकडे पर्वताच्या वर दुसऱ्या पर्वतासारखे उभे राहून भगवानांनी त्याला दाबून धरले आणि खालून कच्छपाच्या रूपाने आधार दिला. आपापले बाहू सरसावून देव आणि दैत्य मंदाराचल घुसळू लागले. त्या घुसळणीने समुद्रात प्रलयकारी लाटा उसळू लागल्या. नागराज वासुकीच्या हजारो मुखांतून आग बाहेर पडू लागली. तिच्या धुराने पौलोम, कालेय, इल्वल इत्यादी असुर निस्तेज झाले; पण देवांकडून हट्टाने मुखाची बाजू मागून घेतली असल्याने, त्यांना काही बोलता येईना.नंतर बासुकीच्या मुखाकडचे टोक दैत्यांनी धरले आणि शेपटीकडे देवांनी धरून प्रचंड बेगाने क्षीरसागर घुसळू लागले. घुसळते वेळी त्या सागरांतून चौदा रत्ने उसळून बाहेर आली.
त्यात कामधेनू, सुरा, अमृत, अप्सरा, चंद्र, विष, धन्वंतरी, लक्ष्मी, कौस्तुभमणी , पारिजातक, ऐरावत नावाचा हत्ती, उच्चैःश्रवा घोडा, शारंग धनुष्य, पांचजन्य शंख ही होती. त्यांपैकी हत्ती, अप्सरा, कल्पतरू (पारिजात) ही इंद्राने घेतली. घोडा सूर्यानी, शंख, धनुष्य, लक्ष्मी व कौस्तुभमणी विष्णूने घेतला. अप्सरा स्वर्गात गेल्या. विष्णूने मोहिनीरूप घेऊन व दैत्यांना फसवून अमृत देवांना दिले. चंद्र शंकराने घेतला. सुरा (मदिरा) आणि धन्वंतरी ही दोन रत्ने उरली. त्यांतून सुरा दैत्यांच्या वाट्याला आली. तेव्हापासून आजपर्यंत देव व दैत्य यांच्यामध्ये वैर चालू आहे. असो.
त्यानंतर इंद्राने स्वर्गावर ताबा मिळविला; मग त्याने सतरा श्लोकांनी लक्ष्मीची स्तुती केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या लक्ष्मीने इंद्राला इच्छित वर दिला व त्रैलोक्य सोडून जाणार नाही असे वचन दिले.
ही लक्ष्मी पूर्वी भृगु ऋषींपासून त्यांच्या ख्याता या पत्नीला झालेली मुलगी होय. ही लक्ष्मी नित्य विष्णूबरोबर अभिन्नपणे असते. विष्णूच्या प्रत्येक वेळच्या अवतारात तीसुद्धा अवतरित होते. विष्णूप्रमाणेच देह धारण करते.
मैत्रेय मुनिराज! हे आख्यान आणि इंद्रविरचित लक्ष्मीस्तोत्र यांचा पाठ ज्या घरामध्ये होत असतो तिथे दारिद्य कधीच प्रवेश करीत नाही.”
भृगु ॠषींचा वंशाचा विस्तार
मैत्रेय मुनींनी पुन्हा प्रश्न केला की, भृगुऋषी व इतरांच्या वंशाची वाढ कशी होत गेली त्याचे वर्णन ऐकवावे.
पराशर म्हणाले – “ठीक आहे. ऐका तर मग.”
भृगुंची पत्नी ख्यातीला लक्ष्मी (विष्णूची पत्नी) ही कन्या आणि धाता व विधाता असे दोन पुत्र झाले. महात्मा मेरू याची कन्या आयति ही धात्याची व नियति ही विधात्याची पत्नी झाली. त्यांना अनुक्रमे प्राण व मृकंडु हे दोन पुत्र झाले. मृकण्डूचे मार्कण्डेय व वेदशिरा हे दोन मुलगे होते. प्राणाला पुतिमान आणि त्याचा पुत्र राजवान हा होता. राजवानापासून पुढे वंश वाढत गेला.
मरीचि व त्याची पत्नी संभूति यांचा पौर्णमास हा पुत्र होय, त्याचे बिरजा व पर्वत असे दोन मुलगे झाले. अंगिरा ऋषीची पत्नी स्मृति हिला चार मुली झाल्या. त्यांची नावे सिनीवाली, कुहू, राका व अनुमति अशी आहेत. अत्रिची पत्नी अनसूया हिला चंद्र, दुर्वास व दत्त असे तीन मुलगे झाले. पुलस्तीची पत्नी प्रीति हिच्या पोटी दत्तोली जन्मला, तो पूर्वीचा स्वायंभुव मन्वंतरातील अगस्त्य होय.
प्रजापती पुलह याच्या पत्नीने क्षमेने कर्दम, उर्वरीयान व सहिष्णु या तीन पुत्रांना जन्म दिला. ऋतु व सन्तति या उभयतांना अंगुष्ठ मात्र देहाचे साठ हजार बालखिल्य वगैरे ऋषी पुत्र झाले. वसिष्ठमुनी व ऊर्जा यांना रज, गोत्र, ऊर्ध्वबाहू, सवन, अनघ, सुतपा व शुक्र असे सात मुलगे झाले.
ब्रह्मदेवाचा सर्वात थोरला मुलगा जो अग्निदेव त्याची पत्नी स्वाहा हिला पावक, पवमान आणि शुचि असे तीन मुलगे झाले. यांना प्रत्येकी १५- १५ पुत्र झाले. असे हे पंचेचाळीस भाऊ, आजोबा अग्नि व त्यांचे तीन पुत्र सर्व मिळून ४९ अग्नी आहेत.
आता ब्रहदेवकृत अनग्निक, अग्निष्यात्ता आणि साग्निक, बर्हिषद बगैरे पितरदेवतांपासून स्वधा हिला मेना व धारिणी अशा दोन मुली झाल्या. त्या ज्ञानी व योगिनी आहेत.असा हा वंशविस्तार जो श्रद्धा व भक्तियुक्त मनाने स्मरण करील तो कधीही निर्वंशी रहाणार नाही.
(श्रीविष्णुपुराण क्रमश:)
सादरकर्ते : विजय गोळेसर (मोबा.९४२२७६५२२७)