हिंदू धर्मातील प्रमुख पारंपारिक उत्सव म्हणजे भगवान श्रीराम नवमी अर्थात श्रीराम जन्मोत्सव होय. दरवर्षी चैत्र शुक्ल नवमी या दिवशी श्रीराम नवमी साजरी केली जाते. यंदा २१ एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सव होणार आहे.
भगवान श्रीविष्णूचा सातवा अवतार भगवान श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हटले जाते. श्रीराम नवमी उत्सव संपूर्ण जगभर विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी सप्ताहभर आधी त्याची सुरुवात होत असते.
अशी करावी पूजा
दुपारी १२ वाजता अभिजीत मुहूर्तावर श्रीराम जन्माची पूजा करावी. प्रथम कलश स्थापना करून श्रीराम यांच्या मूर्तीचे षोडशोपचारे पूजन करावे. मूर्तीस अष्टगंध लावावे. फूल माला अर्पण करावी. रांगोळ्या व फुलांची आरास करावी. नंदादीप लावावा. श्रीराम चरित मानस तसेच श्री रामरक्षा त्याचप्रमाणे श्री राम नाम पठण करावे. श्रीरामाची आरती करावी. खिरीसह असलेल्या पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा. दरवाजाला आंब्याची पाने व फुलांचे तोरण तसेच भगवे ध्वज बांधावे. जय जय श्रीराम असा जय जय कार करावा. यासोबतच सुंठवड्याचा प्रसाद वाटप करावा. या दिवशी दिवसभर उपवास करण्याचा प्रघात आहे.
कोरोना संकटात अशी साजरी करा रामनवमी
– अनेक भाविक रामनवमीला रामजन्माच्या वेळी श्रीरामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. यंदा अनेक ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण बंदी असल्याने धार्मिक स्थळे बंद आहेत. असे निर्बंध असलेल्या ठिकाणी मंदिरांमध्ये जाता येणे शक्य नाही. त्यामुळे रामनवमीनिमित्त घरीच श्रीरामाची भावपूर्ण आराधना करावी.
– नामजप ही कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधना आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप अधिकाधिक आणि भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. घरातील सदस्य घरीच नामजप, तसेच रामरक्षापठण करू शकतात.
– काही ठिकाणी घरी रामजन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा असते. अशा वेळी माध्यान्हकाळी रामाची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी.
– पूजेसाठी रामाची मूर्ती किंवा प्रतिमा (चित्र) उपलब्ध नसेल, तर रामाचे मुखपृष्ठावर चित्र असलेला एखादा ग्रंथ किंवा नामपट्टी पूजेत ठेवू शकतो. तेही शक्य नसेल, तर पाटावर रांगोळीने ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नाममंत्र लिहून त्याची पूजा करावी.
– शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, असा अध्यात्मातील सिद्धांत आहे. त्यानुसार श्रीरामाच्या मूर्तीमध्ये जे तत्त्व असते, तेच शब्दामध्ये म्हणजे श्रीरामाच्या नामजपामध्येही असते.
– पूजेसाठी आवश्यक साहित्य मिळण्यास अडचण असेल, तर उपलब्ध पूजासाहित्यामध्ये श्रीरामाची भावपूर्ण पूजा करून रामजन्म करावा. जे पूजासाहित्य उपलब्ध नसेल, त्याऐवजी अक्षता समर्पित कराव्यात. सुंठवड्याचा नैवेद्य दाखवणे शक्य नसेल, तर अन्य गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!