नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे अग्रणी मार्गदर्शक आणि मानवाच्या सर्वांगीण उत्थानाचे तत्त्वज्ञान विश्वाला देणारे महायोगी श्रीअरविंद ह्यांचा 150 वा जयंती उत्सव आज, भारताच्या स्वातंत्र्यदिनी पॉंडिचेरी जवळील ‘ऑरोविल’ नगरीत आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
पंधरा ऑगस्ट हा श्रीअरविंद ह्यांचा जन्मदिन आहे. देश- विदेशातील त्यांचे भक्त, चाहते आणि अभ्यासकांनी वर्षभर विविध उपक्रम आयोजित केले होते. त्यांची सांगता आज होत आहे. मुख्य कार्यक्रम दुपारी १ ते ३ यावेळी होणार असून त्याचे थेट राष्ट्रीय प्रसारण करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी याचवेळी मार्गदर्शन करणार असून त्यांचा विषय “श्रीअरविंद ह्यांची पाच स्वप्नं” असा आहे.
भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात श्रीअरविंद ह्यांनी ही पांच स्वप्नं देशासमोर ठेवली होती. देशातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना मार्गदर्शक ठरलेल्या या संदेशाचे त्यावेळी आकाशवाणी केंद्रावरून प्रसारण करण्यात आले होते. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देशातील १५० शाळा, १५० विद्यापीठे आणि १५० कारागृहात करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य संग्रामात ऐतिहासिक ठरलेल्या कारागृहांची यासाठी निवड करण्यात आली आहे.
ShreeArvind Janmotsav Ceremony PM Modi