श्रीविष्णु पुराण
अंश-५ (कृष्णकथा भाग–11)
पौंड्रक व द्विविध वानराचा वध
काशी दहन…
सांबाचा विवाह!
मैत्रेयांनी विनंती केली की, कृष्णाने देवांचे गर्वहरण केले त्याविषयीच्या अजून काही कथा सांगाव्यात.
तेव्हा पराशर म्हणाले “हे मुनिवर! कृष्णाने एकदा काशी नगरीच जाळली होती ती गोष्ट ऐका. पौंड्रकाच्या वंशातील वासुदेव परमेश्वर नावाचा एक राजा पूर्वी होऊन गेला. तो स्वत:ला वासुदेव परेमश्वर म्हणवून घेत असे आणि तशीच वेशभूषा करीत असे.
एकदा त्याने कृष्णाला निरोप पाठविला की, त्याने वासुदेव हे नाव सोडून द्यावे. त्याचप्रमाणे चक्र वगैरे इतर आभूषणेसुद्धा सोडावीत. तसेच जर जिवंत रहावे असे वाटत असेल तर मुकाट्याने शरण यावे.
कृष्ण तो निरोप ऐकून हसला व दूताला म्हणाला की, “जा आणि पौड्काला सांग की, मी सर्व चिन्हे धारण करून येत आहे. तसेच चक्रही सोडून देईन पण ते त्याच्यावर असेल. मी उद्याच येत आहे.
दुसऱ्या दिवशी कृष्ण जेव्हा तिथे जाऊन पोचला तेव्हा पौंड्रक व काशीचा राजा आपापल्या सैन्यासह युद्धासाठी तयारच होते; मग युद्धाला आरंभ झाला आणि कृष्णाने काही क्षणातच दोघांची सेना गारद केली; मग तो पौड्काला म्हणाला की, तुझ्या निरोपाप्रमाणे मी आलो आहे. कृष्णाने चक्र सोडून त्याचे मस्तक छाटून टाकले. रथाचा विध्वंस केला. गरुडाने त्याचा ध्वज तोडून टाकला.
असे पाहिल्यावर मित्राचा कैवार घेऊन काशीचा राजा कृष्णावर चाल करून आला. त्याप्रसंगी श्रीकृष्णाने एकाच बाणाने त्याचे मस्तक उडविले व ते काशीमध्ये जाऊन पडले. युद्ध समाप्त करून कृष्ण द्वारकेत गेला व तिथे पुन्हा सुखात राहिला. परंतु तेवढ्याने ते वैर संपले नाही!
काशिराजाच्या पुत्राने पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या हेतूने पुरोहिताच्या साहाय्याने अनुष्ठान करून शंकराला प्रसन्न करून घेतला. शंकराने वर मागण्यास सुचविले तेव्हा त्याने कृष्णाला मारील अशी कृत्या हवी असा वर मागितला. शंकर ‘तथास्तु’ असे म्हणाला; मग त्या पुत्राने दक्षिणाग्नीची आराधना केली असता हवन कुंडातून एक ज्वलंत अग्नीस्वरूपिणी कृत्या बाहेर पडली व कृष्णाच्या नाशासाठी द्वारकेच्या दिशेने झेपावली.
त्यावेळी कृष्ण फासे घेऊन द्यूत खेळत होता. त्याने ती कृत्या निघाल्याचे जाणले आणि तिच्यावर सुदर्शन चक्र फेकले. त्या चक्राच्या तेजाने घाबरून जाऊन ती कृत्या मागे फिरली व काशीत गेली. चक्रसुद्धा तिचा पाठलाग करीत काशीत घुसले.
त्या चक्राचा प्रतिकार करावा म्हणून सर्व सेना व शिवगण धावले परंतु त्या चक्राने सैनिकांसह काशीची जाळून राखरांगोळी करून टाकली. काही म्हणता काही उरले नाही. एवढे झाल्यावर ते चक्र पुन्हा कृष्णापाशी गेले.
सांबाचा विवाह
मैत्रेयांनी पराशरांना विचारले की, त्यांना आता बलरामाने केलेली काही
अलौकिक कृत्ये सांगावी. तेव्हा ते म्हणाले – “ऐका!”
एकदा असे झाले की, जांबवतीचा पुत्र सांब याने स्वयंवर प्रसंगी घुसून दुर्योधनाच्या मुलीला पळवून नेली. तेव्हा महावीर कर्ण, दुर्योधन, भीष्म, द्रोणाचार्य वगैरे वीरांनी धावून युद्ध केले व त्याला बंदिवान केला.
मग कृष्णासहित यादव युद्ध करण्यासाठी तयार झाले. तेव्हा दारूच्या नशेत असलेला बलराम म्हणाला की, “युद्ध करण्याची काही गरज नाही. मी सांगितले की, कौरव सांबाला सोडून देतील. तेव्हा मी एकटाच जातो.” असे बोलून तो हस्तिनापुरी गेला.
तिथे तो नगरात न जाता बाहेर एका बगीच्यात बसून राहिला. ती वार्ता कळताच दुर्योधन व इतर सर्व प्रतिष्ठित लोक तिथे गेले व त्यांनी बलरामाचा पूजेसह आदर सत्कार केला. तो स्वीकारून त्याने त्यांना म्हटले की, राजा उग्रसेनाचा निरोप घेऊन मी आलो आहे की तुम्ही ताबडतोब सांबाला मुकाट्याने मुक्त करा.
तेव्हा कौरवांना मोठा संताप आला. ते म्हणाले – “हे बलराम! काय बोलता आहां तुम्ही? अहो कुरुकुळातील वीरांना यादव वंशीय आज्ञा कसे करू शकतात ? प्रत्यक्ष उग्रसेनाने जरी येऊन आज्ञा केली तरी ती आम्हाला मंजूर नाही. आम्ही सांबाला सोडणार नाही म्हणजे नाही. मग तुम्हाला जे करावयाचे असेल ते करा.
अहो! हे यादव म्हणजे आमचे एकेकाळचे सेवक! आणि आज तेच आम्हाला आज्ञा करू लागले आहेत. असो. यात चूक मुळात आमचीच आहे; कारण आम्हीच प्रेमाच्या पोटी तुमच्याशी बरोबरीच्या नात्याने बागलो. वास्तविक आजही आम्ही जी तुमची पूजा केली तीसुद्धा प्रेमपोटीच बरे का? नाहीतर तुमची पूजा आम्ही केलीच नसती.”
असे बोलून ते वेगाने परतून निघून गेले.
तेव्हा रागाच्या भरात बलरामाने एक सणसणीत लाथ जमिनीवर मारली. त्यामुळे जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या, बलराम मोठ्याने गर्जना करून व लालबुंद डोळे वटारून म्हणाला की, “हे मूर्ख कौरव एवढे माजले आहेत काय? उग्रेसन महाराजांची अवज्ञा खुशाल करत आहेत.
उग्रसेन महाराजांच्या दरबारात इंद्रसुद्धा बसण्यास धजावत नसतो. अशा त्यांचा हे कौरव राजपदाच्या गर्वाने उपमर्द करतात. तर मी आज एकटाच या सर्व कुरुवंशीयांना ठार मारून सांबाला त्याच्या पत्नीसहित द्वारकेत घेऊनच जाईन, नाहीतर हे हस्तिनापूरच उपटून गंगेत बुडवितो.’
असे बोलून त्याने हस्तिनापुराच्या एका दिशेकडून आपल्या नांगराचा फाळ जमिनीत रोवला आणि जोर लावून तो उपटू लागला. संपूर्ण हस्तिनापुरात जणू काही भूकंप झाल्याप्रमाणे अवस्था पहाताच सर्व कौरव हात जोडून बलरामास शांत होण्यासाठी विनवू लागले. ते सांबाला व त्याच्या पत्नीला घेऊन आले व त्यांना बलरामाच्या स्वाधीन केले.
मग बलरामाचा राग ओसरला आणि सांब, त्याची वधू व कौरवांनी दिलेले नजराणे घेऊन तसेच त्यांना क्षमा करून तो द्वारकेस निघून गेला.”
द्विविध वानराच वध
पराशरांनी पुढे सांगण्यास आरंभ केला. ते म्हणाले –
“बलरामाचा पराक्रम अजोड होता. देवांचा वैरी जो नरकासुर त्याचा एक वानर मित्र होता. त्याचे नाव होते ‘द्विविद’. तो फार पराक्रमी असून नरकासुराचा कृष्णाने वध केल्यामुळे तो देवांचा वैरी बनला होता. त्या वेळेपासून मित्राचा बदला घेण्यासाठी तो यज्ञयागांचा विध्वंस करीत असे. साधूसंत, महात्मे व मानवांना तो नष्ट करू लागला.
त्याच्या तडाख्यातून नगरे, देश, गावे, नागरिक, गुरेढोरे यापैकी कुणीच वाचत नसत. पर्वत उपटून ते समुद्रात टाकणे, शेतीभातीचा नाश करणे असे त्याचे उपद्व्याप सतत चाललेले असत.
एके समयी बलराम स्त्रियांसह एका उद्यानात मदिरा पीत बसला होता. नाचगाणी चालली होती. अशावेळी तो बानर तिथे आला आणि बलरामाची शस्त्रे उचलून घेऊन त्याला वाकुल्या दाखवू लागला.
स्त्रियांची चेष्टा करू लागला आणि दारूचे हंडे व इतर सामान फेकू लागला. तेव्हा रागावून बलरामाने त्याला दम दिला, तरीसुद्धा तो बलरामाचीच चेष्टा करू लागला.
तेव्हा रागावलेल्या बलरामाने मुसळ उचलून हातात घेतले. बानराने सुद्धा एक भला मोठा पहाड उपटून फेकून दिला पण बलरामाने मुसळाने पहाडाचे तुकडे करून टाकले; मग त्या वानराने रागारागाने उडी मारून बलरामाच्या छातीवर मुष्टिप्रहार केला.
मग मात्र बलरामाने सर्व शक्ती एकवटून त्या वानराच्या माथ्यावर असा एकच ठोसा मारला की, त्या एकाच फटक्यात तो मरून पडला. त्याच्या प्रचंड ओझ्याने तो डोंगरसुद्धा खचला.
ते अचाट कृत्य पाहून इंद्रासह सर्व देवगण तिथे आले आणि बलरामाला प्रणाम करून त्याची प्रशंसा करीत स्वर्गात गेले.
पराशर पुढे सांगू लागले मैत्रेय मुनिवर! शेषावतार बलरामाचे असे कित्येक अद्भुत पराक्रम आहेत की ते मोजणेही शक्य होणार नाही.” “श्रीकृष्ण आणि बलराम या उभयतांनी मिळून अनेक जुलुमी राजे व दैत्य यांचा वध करून पृथ्वीचा भार हलका केला.
श्रीविष्णु पुराण अंश-५ (कृष्णकथा भाग-11) क्रमश:
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल- ९४२२७६५२२७
Shree Vishnu Puran Vanar Vadh Kashi Dahan by Vijay Golesar
Samba Marriage