श्रीविष्णु पुराण
अंश-६ ( भाग-५)
|| श्रीविष्णु पुराण उपसंहार ||
आज श्रीविष्णु पुराण या ग्रंथाचा समारोप होत आहे. ‘इंडिया दर्पण’ने या वर्षी अधिक मासा निमित्त सलग ६१ दिवस श्रीविष्णु पुराण कथासार सादर केला.
पराशर म्हणाले – “मैत्रेय मुनी! मी तुम्हाला हा शेवटचा आत्यंतिक प्रलय वर्णन केला आहे. तोच खरा मोक्ष आहे. वैष्णव पुराण सांगून संपले आहे. ते सर्व पापनाशक व सर्वश्रेष्ठ आहे. अजून काही जर विचारायचे असेल तर विचारा.” त्यावर मैत्रेय बोलले – “भगवान! मी विचारले ते सर्व तुम्ही सांगितले आहे. आता विचारण्यासारखे काही उरले नाही. माझ्या सर्व शंका दूर झाल्या व विश्वाची उत्पत्ती, स्थिती तसाच विलय यांचे ज्ञान झाले. सर्व चराचर हे विष्णूमय आहे असे एकवार चित्तात ठसले की, मग आणखी जाणण्यासारखे काही उरत नाही. मी आज कृतार्थ झालो.” पराशर पुढे सांगू लागले “मी जे हे विष्णुपुराण सांगितले हे ऐकल्याने सर्व पापांची निवृत्ती होते.
त्यात सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय, तसेच वेगवेगळे मानव वंश, मन्वंतरे यांचे वर्णन आहे. आणखी देव, दैत्य, गंधर्व, नाग, राक्षस, यक्ष, विद्याधर, सिद्ध व अप्सरा यांचे वर्णन आहे. शिवाय मुनी, चातुर्वर्ण्य व्यवस्था, महापुरुषांच्या लीला, तीर्थक्षेत्रे, नद्या, सागर, पर्वत, बुद्धिमान पुरुषांची चरित्रे, धर्म व वेद यांचे स्पष्टीकरण केलेले आहे. श्रीहरिचे गुणगान तर ठिकठिकाणी सापडेल, हे प्रचंड विश्व म्हणजे त्या हरीच्या सामर्थ्यापुढे एका धुलिकणाप्रमाणे आहे. अहो! याचे श्रवण केल्याने अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते. त्या पुण्याला कोणतीच तुलना नाही.
ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पक्षातील द्वादशीच्या दिवशी यमुनेत स्नान करून व उपवास करून पितरांसाठी पिंडदान करण्याचे जे फळ आहे ते या पुराणाच्या श्रवणामुळे मिळते. आज श्रीविष्णु पुराण या ग्रंथाचा समारोप होत आहे. इंडिया दर्पणने या वर्षी अधिक मासा निमित्त सलग ६१ दिवस श्रीविष्णु पुराण कथासार सादर केला. श्रीविष्णु पुराणाविषयी विद्वान् संशोधक काय म्हणतात तसेच विश्वकोशात या महान ग्रंथा विषयी म्हटले आहे- श्रीविष्णु पुराणाविषयी विद्वान् संशोधक काय म्हणतात विष्णु पुराण हे अठरा महापुराणांपैकी एक आहे, हिंदू धर्माच्या प्राचीन आणि मध्ययुगीन ग्रंथांचा एक प्रकार आहे. वैष्णव साहित्यातील हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे.
विष्णु पुराणातील हस्तलिखिते आधुनिक युगात अनेक आवृत्त्यांमध्ये टिकून आहेत. इतर कोणत्याही प्रमुख पुराणांपेक्षा, विष्णु पुराणात त्याची सामग्री पंचलक्षण स्वरूपात सादर केली जाते – सर्ग (विश्वविज्ञान), प्रतिसर्ग (विश्वविज्ञान), वामश (देव, ऋषी आणि राजांची वंशावली), मन्वंतर (वैश्विक चक्र), आणि वामसानुचरितम (विविध राजांच्या काळात) मजकुराच्या काही हस्तलिखितांमध्ये इतर प्रमुख पुराणांमध्ये आढळणारे महात्म्य आणि तीर्थयात्रेवरील सहल मार्गदर्शक या सारख्या विभागांचा समावेश न केल्यामुळे उल्लेखनीय आहेत,परंतु काही आवृत्त्यांमध्ये मंदिरांवरील अध्याय आणि पवित्र तीर्थक्षेत्रांच्या प्रवास मार्गदर्शकांचा समावेश आहे.
1840 मध्ये एच.एच.विल्सन यांनी अनुवादित केलेले आणि प्रकाशित केलेले सर्वात जुने पुराण म्हणूनही हा मजकूर उल्लेखनीय आहे, त्यानंतर उपलब्ध हस्तलिखितांवर आधारित, पुराण काय असावेत याविषयीचे अनुमान आणि त्या काळातील परिस्थिती व परिसर दर्शविते. विष्णु पुराण हे लहान पौराणिक ग्रंथांपैकी एक आहे, ज्यात सुमारे 7,000 श्लोक आहेत. हे प्रामुख्याने हिंदू देव विष्णू आणि कृष्णासारख्या त्याच्या अवतारांभोवती केंद्रित आहे, परंतु ब्रह्मा आणि शिव यांची स्तुती करते आणि ते विष्णूवर अवलंबून असल्याचे प्रतिपादन करते. विल्सन सांगतात की, पुराण हे सर्वधर्मीय आहे आणि त्यातील कल्पना, इतर पुराणांप्रमाणेच, वैदिक विश्वास आणि कल्पनांवर आधारित आहेत. सध्याच्या मजकुरात सहा अंश (भाग) आणि १२६ अध्याय यांचा समावेश आहे. पहिल्या भागात 22 प्रकरणे, दुसऱ्या भागात 16 प्रकरणे, तिसऱ्या भागात 18 प्रकरणे आणि चौथ्या भागात 24 प्रकरणे आहेत. पाचवा आणि सहावा भाग मजकूराचा सर्वात लांब आणि सर्वात लहान भाग आहे, ज्यात अनुक्रमे 38 आणि 8 अध्याय आहेत.
मूळ विष्णु पुराणात 23,000 श्लोक आहेत, परंतु हयात असलेल्या हस्तलिखितांमध्ये यापैकी फक्त एक तृतीयांश म्हणजे सुमारे 7,000 श्लोक आहेत असा दावा मजकूर परंपरेने केला आहे. मजकूर मेट्रिक श्लोक किंवा श्लोकांमध्ये बनलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक श्लोकात 32 अक्षरे आहेत, त्यापैकी 16 अक्षरे प्राचीन साहित्यिक मानकांनुसार मुक्त शैली असू शकतात. विष्णू पुराण हा एक अपवाद आहे कारण त्यात ते विष्णू पूजाशी संबंधित पंचलक्षाना स्वरूपात सादर करते- सर्ग(कॉसमोगोनी), प्रतिसर्ग (कॉस्मोलॉजी), वंश (देवता, ऋषी आणि राजे),मानवांतर (कॉस्मिक सायकल्स) आणि वंशानुचरितम् (विविध राजांच्या काळातील कथा) . हे एक दुर्मिळ पुराण आहे, असे डिमीट आणि व्हॅन बुटेनेन म्हणतात! असे आहे विष्णु पुराण सर्वच्या सर्व पुराणे व इतर शास्त्रे ही महर्षी कृष्णद्वैपायन व्यास यांनी कथन केली. तथापि या विष्णुपुराणाची संहिता महर्षी पराशरांनी मुनी मैत्रेय यांना पुनश्च कथन केली म्हणून याला ‘पराशरसंहिता’ असेही म्हटले जाते. तरीही पुराणांची रचना केव्हा आणि कसकशी होत गेली याविषयी निश्चित असे काही ठरविता येत नाही.
जुन्या वैदिक वाङ्मयातून पुराण हा शब्द इतिहास अशा अर्थाने आलेला आहे. गौतमशास्त्रामध्ये पुराणांना धर्मशास्त्रीय ग्रंथ असे म्हटले आहे. महाभारत व पुराणात पुराणांची मुख्य अशी पाच लक्षणे सांगितली आहेत. ती अशी – १) सर्ग अर्थात सृष्टीची निर्मिती, २) प्रतिसर्ग अर्थात प्रत्येक प्रलयानंतरची पुननिर्मिती, ३) वंश अर्थात घराण्यांच्या परंपरा, ४) मन्वंतर म्हणजे मनू व त्यांचा विस्तार आणि ५) वंशानुचरित म्हणजे राजांची चरित्रे. पण आज उपलब्ध असलेल्या संहितांमध्ये वरील अनुक्रम पाळला गेल्याचे दिसत नाही. विष्णुपुराण मात्र वरील पाच लक्षणांशी बर्याच प्रमाणात मिळते जुळते आहे शिवाय पद्मपुराणात पुराणांचे जे सात्त्विक, राजस व तामस असे वर्गीकरण केले आहे, त्यानुसार हे पुराण ‘सात्त्विक’ असे ठरविले आहे. या पुराणाचे सहा अंश म्हणजे खंड असून एकूण १३४ अध्याय आहेत. यांतील पहिल्या अंशात सृष्टीची, देवांची आणि राक्षसांची उत्पत्ती कथन केली आहे शिवाय समुद्राचे मंथन केल्याची कथा आहे. दुसऱ्या भूलोक, पाताळलोक व स्वर्गलोक यांची माहिती आहे.
तिसऱ्या अंशात मनू व मन्वंतरे यांची माहिती आहे. चौथ्या अंशात सूर्यवंशीय राजांच्या वंशावळी आणि इतिहास दिला आहे.पाचवा अंश संपूर्ण श्रीकृष्णचरित्राने भरला आहे. सहाव्या अंशात कलियुगाचे भाकीत आहे. या सर्वच्या सर्व पुराणांच्या अवलोकनातून सृष्टीच्या रचनेचा क्रम, प्रलयांचे वर्णन, भरतखंड व त्यांतील लोकांची जीवनपद्धती, सनातन धर्म, आचारविचार, भौगोलिक रचना, संस्कार, पंथ व उपपंथ व त्यांचे तत्त्वज्ञान यांची माहिती मिळते. प्रत्येक पुराणात त्या त्या पुराणाच्या आधारभूत अशा प्रमुख देवतेचे महत्त्व सांगितलेले असते. तसेच याही पुराणात विष्णूचे गुणवर्णन केलेले आहे. त्याचे मूळ सत्तेशी असलेले एकरूपत्व वारंवार कथन केले आहे. श्रीविष्णु पुराणाचा प्रवास! आता या पुराणाचा प्रवास ऐका! अगदी प्रथम हे पुराण ब्रह्मदेवाने ऋभूला ऐकवले होते. त्याने प्रियव्रताला ऐकवले. प्रियव्रताने भागुरिला, त्याना स्तंभमित्राला, त्याने दधीचिला, त्याने सारस्वताला, त्याने भृगुला, त्याने पुरुकुत्साला, त्याने नर्मदेला, तिने धृतराष्ट्र व पूरण या दोन नागांना ऐकवले. त्यांनी हे पुराण नागांचा राजा बासुकी याला ऐकवले. त्याने वत्साला, त्याने अश्वतराला, त्याने कंबलनागाला, त्याने एलापुत्राला ऐकवले. ते तिथून म्हणजे पाताळांतून बेदशिरा ऋषींना मिळाले. त्यांनी ते प्रमतीला दिले.
प्रमतीने ते पुराण जातुकर्ण याला दिले आणि जातुकर्णाच्या द्वारे अनके पुण्यात्म्यांना प्राप्त झाले. मलासुद्धा हे विष्णुपुराण सारस्वताकडून मिळाले आणि पुलस्तीच्या कृपेने ते कायमचे स्मरणात राहिले आहे. आता पुढे मी तुला ऐकवलेले हे पवित्र पुराण तुसुद्धा कलियुगाच्या अंती महान शिनिक याला देणार आहेस. असे हे रहस्यमय व पचित्र पुराण जर भक्तिपूर्वक कुणी ऐकेल तर तो पापमुक्त होईल. जो रोज ऐकेल त्याला सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचे फळ मिळेल. या पुराणाचे दहा अध्याय जरी ऐकले तरी कपिला गाय दान दिल्याचे पुण्य लाभते. या पुराणात ज्या परमपुरुष विष्णूंचे वर्णन केले आहे तो परमपवित्र, सनातन, अधिकारी असा असून एकदा का तो चित्तात प्रकट झाला की, मग आणखी काही मिळवायचे उरत नाही. अशा भाग्यवान भक्ताचे कधी पतन होत नाही.
स्वर्गसुद्धा त्याला तुच्छ वाटतो. ब्रह्मपद नकोसे वाटते. अशा या प्रभूला भी वंदन करतो. त्याने सर्वांवर कृपा करावी, पराशर मुनीविरचित श्रीविष्णुपुराणाचा सहावा अंश संपूर्ण. सर्व सामान्य वाचकांना वेद, पुराणं आदि प्राचीन ग्रंथ वाचण्यास वेळ नसतो आणि इच्छा असली तरी जुनी पुराणे सहजगत्या उपलब्ध होतातच असे नाही. वाचकांना श्रीविष्णु पुराणाचा परिचय व्हावा यासाठी अधिकमासा निमित्त ही लेखमाला सादर केली. मराठीत अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असावा. वाचकानी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!
|| श्रीविष्णवार्पण अस्तु || श्रीकृष्णार्पणम अस्तु ||
श्रीविष्णु पुराण अंश-६ ( भाग-५) समाप्त
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर मोबाईल-९४२२७६५२२७
Shree Vishnu Puran Upsanhar End Vijay Golesar