श्रीविष्णु पुराण अंश-५ (भाग-७)
उग्रसेनाचा राज्याभिषेक व कृष्णाचा विद्याभ्यास
आपल्या अद्भुत लीलांमुळे वसुदेव व देवकीसह लोक संभ्रमात पडले असे पाहून कृष्णाने आपली माया सर्वांवर पसरली; मग तो आई-वडिलांना म्हणाला “मी आपल्या दर्शनासाठी कधीपासून तळमळत होतो. ती माझी इच्छा आज पुरी झाली.”
नंतर त्याने माता-पित्यासह सर्व थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले. प्रतिष्ठित नागरिकांचा योग्य प्रकारे सन्मान केला; नंतर कंसाची आई व पत्नी यांचे सांत्वन केले; मग उग्रसेनाला कारागृहातून आणविला. सर्व मृतांचे अंत्यविधी पार पाडले. उग्रसेनाचा राज्याभिषेक केला.
तो म्हणाला- “हे राजन्! आम्हांला योग्य अशी सेवा सांगा, ययातीच्या शापामुळे आमचा वंश राज्याचा अधिकारी होऊ शकत नाही.”
मग कृष्णाने वायूदेवाचे आवाहन केले व त्याला सांगितले की, इंद्राकडे जाऊन असा निरोप द्यावा की, त्याने सुधर्मा नावाची सभा उग्रसेनाच्या हवाली करावी. तो निरोप मिळताच इंद्राने सुधर्मा नावाची सभा वायूदेवाच्या हाती धाडून दिली. नंतर स्वत: पूर्ण आत्मज्ञानी व शक्तिसंपन्न असतानाही परंपरेचे पालन व्हावे यासाठी ते अवंती नगरात रहात असलेले पूर्वीचे काशीवासी ऋषी यांना शरण गेले व त्यांचे शिष्यत्व पत्करून गुरूसेवा करीत तिथेच विद्याभ्यास करीत राहिले.
कृष्ण व राम यांची ग्रहणशक्ती एवढी तीव्र होती की, संपूर्ण धनुर्वेद त्यांनी फक्त ६४ दिवसांत आत्मसात केला, तेव्हा सांदिपनीना त्याच्या अवतारित्वाची खातरी पटली; मग पुढे १४ विद्या आणि चौसष्ट कला एकेका दिवसांत पूर्ण केल्या. विद्याभ्यास पूर्ण झाला तेव्हा गुरूदक्षिणा काय देऊ? असे कृष्णाने विचारले असता मुनी म्हणाले की, त्यांचा एकुलता एक मुलगा बारा वर्षांपूर्वी समुद्रात बुडाला होता. तो परत आणून द्यावा.
तेव्हा कृष्णाने समुद्राच्या काठी जाऊन तो मुलगा मागितला असता समुद्राने प्रकट होऊन व नमस्कार करून सांगितले की, तो मुलगापाण्यातच रहाणाऱ्या पंचजन नावाच्या दैत्याने नेलेला आहे.
मग कृष्णाने सागरात उडी ठोकली आणि दैत्याचा वध केला व त्याच्या अस्थिचा शंख काढून घेतला. तो शंखध्वनी जेव्हा फुंकला जातो, तेव्हा त्या आवाजाने दैत्य निर्वीर्य होतात आणि देव बलवान होतात.
पुढे शंख घेउन कृष्ण यमाच्या संयमती नगरात गेला आणि त्या बालकाचा जीव परत आणून व त्याला देह्युक्त करुन गुरुला अर्पण केला.
एवढे कृत्य करुन तो मथुरेत परतला.
जरासंधाचा पराभव
मगध देशीचा राजा जरासंघ हा कंसाचा सासरा होता. त्याच्या अस्ति व प्राप्ति नावाच्या दोन मुली कंसाला दिल्या होत्या, कंसाच्या वधाचे वृत्त ऐकल्यावर चवताळलेला महाबली जरासंघ तेवीस अक्षौहिणी एवढे प्रचंड सैन्य घेऊन मथुरेवर चाल करून आला व त्याने संपूर्ण मथुरेला वेढा घातला.
तेव्हा राम व कृष्ण हे दोघे जण यादव सैन्यासह बाहेर पडले. त्यांचे सैन्यबळ अगदी तुटपुंजे होते. म्हणून दोघांनी आपली दिव्यशस्त्रे व अस्त्रे यांना आवाहन केले. क्षणार्धात कृष्णाच्या हाती त्याचे सारंग नावाचे धनुष्य व बाण तशीच कौमोदकी गदा आली.
बलरामाच्या हाती नांगर व सुनंद नावाचे मुसळ प्रगट झाले: मग मोठे युद्ध झाले व जरासंधाचा पराभव करून दोघेजण मथुरेत परतले. काही काळाने जरासंध पुन्हा भरपूर सैन्य घेऊन चालून आला. याही वेळेस त्याला पराभूत होऊन जावे लागले. असा प्रकार एकदर अठरा वेळा झाला. कृष्णापाशी अतिप्रचंड अशी दैवी शक्ती असूनही तो मानवाप्रमाणे युद्ध करीत होता.
द्वारकेची निर्मिती व कालयवनाचा अंत
एकदा असे घडले की, गार्ग्यमुनींना त्यांच्याच मेहुण्याने भरसमेत नपुंसक म्हणून हिणवले. त्या वेळेस सर्व यादव सभासद कुत्सितपणे हसले. तेव्हा गार्ग्य तिथून उठून चालते झाले.
ते तडक दक्षिण सागराच्या किनारी गेले आणि यादवांचा नाश करणारा पुत्र व्हावा, या हेतूने तपश्चर्या करू लागले. बारा वर्षांनंतर शंकराने त्यांना तसा वर दिला.
पुढे एका यवन राजाने त्यांची सेवा केली व ते प्रसन्न झाले. तो राजा निपुत्रिक होता म्हणून त्यांनी त्याच्या पत्नीशी शय्यासोबत केली व कृष्णवर्णाचा एक पुत्र जन्मास आला. त्याचे नाव ‘कालयवन’ ठेवले. पुढे यवनराजाने कालयवनास राज्याभिषेक केला व तो वानप्रस्थाश्रमी होऊन अरण्यात गेला.
पुढे त्या महाबलवान कालयवनाने नारदांना विचारले की, पृथ्वीवर शक्तिशाली राजे कोण कोण आहेत? तेव्हा नारद म्हणाले की, सर्वाधिक सामर्थ्य यादवांचे आहे व त्यांची बरोबरी कुणी करू शकत नाही.
ते ऐकल्यावर त्याच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली आणि हजारो हत्ती, घोडे, रथ यांच्यासह अब्जावधी म्लेच्छ सैनिक यांच्यासह मजल दरमजल पार करून मथुरेवर चालून गेला,
दुसरीकडून जरासंधाचे हल्ले चालूच होते.
तेव्हा कृष्णाने फार विचार केला व मथुरेहून राजधानी दुसरीकडे न्यावी असे ठरविले; मग त्याने समुद्राकडून बारा योजनांएवढी जमीन मागून घेतली आणि विश्वकर्म्याला सांगून द्वारका नगरी निर्माण केली, तिथे सर्व यादवांची परिवारासह व्यवस्था लावून दिली व स्वतः मथुरेत गेला.
जेव्हा कालयवनाने मथुरेला वेढा घातला तेव्हा कृष्ण निःशस्त्र होऊन वेशीबाहेर आला. कालयवनाने त्याला पाहताच त्याचा पाठलाग केला.
श्रीकृष्ण धावत धावत एका पर्वतावर चढून मोठ्या गुहेत घुसला. आत राजा मुचकुंद झोपला होता. कृष्णाने आपला शेला त्याच्या अंगावर पांघरला व स्वतः दुसरीकडे लपून राहिला. कालयवन तिथे येताच त्याला तो शेला पाहून असे वाटले की, तो कृष्णच आहे.
त्याने रागारागाने लाथ मारली तेव्हा मुचकुंद जागा झाला व क्रोधाने पाहताच कालयवन जागच्या जागी जळून भस्म झाला. त्याचे कारण असे की, पूर्वी देव आणि असुर यांच्या युद्धात मुचकुंद देवांच्या बाजूने लढला होता. अतिशय श्रम झाले असल्यामुळे त्याने देवांपाशी दीर्घ निद्रेचा वर मागितला. तेव्हा देवांनी ‘तथास्तु’ असे म्हणून सांगितले की, जो कुणी तुझी झोप मोडील तो तत्क्षणीच जळून जाईल.
असे झाल्यानंतर कृष्ण पुढे झाला. मुचकुंदाने प्रश्न केल्यावर कृष्णाने स्वत:चा परिचय सांगितला. मग मुचकुंदाला गार्ग्य मुनींची आठवण झाली आणि तो म्हणाला,
“हे परमपुरुषा! तू विष्णूचा अंश आहेस हे मी ओळखले आहे. तू जगाच्या उद्धारासाठी अवतरला आहेस पण मला तुझे तेज सहन होण्यासारखे नाही. माझ्या तेजापुढे मोठमोठे दैत्यही उभे राहू शकले नाहीत. तरीही तुझे तेज माझ्यासाठी असह्य आहे. संपूर्ण जड जगत्, पाच महाभूते, बुद्धी, मन, प्राण आणि मूळ तत्त्व तूच आहेस. अजन्मा, अविकारी, अजरामर आणि अनादि अनंत तूच आहेस. चार खाणी, चारी वाणी, सप्तलोक ही तुझीच रचना आहे.
या संसारात हजारो वेळा जन्माला येऊन व सर्व प्रकारचे भोग भोगूनही मी असमाधानीच राहिलो. स्वर्गातही मला शांती प्राप्त झाली नाही. तू जर कृपा केली नाहीस तर चिरशांती मिळणार नाही. तुला न जाणता आजवर मी सैरावैरा भटकत राहिलो.
परंतु आज मी तुला शरण आलो आहे. मला तू परमपद दे!”
मुचकुंदाची विनंती ऐकून कृष्ण म्हणाला, “हे नृपाळा! तू परम दिव्य लोकांत जाशील आणि माझ्या कृपेने अखंड ऐश्वर्य भोगशील, बन्याच काळानंतर तुला एका फार मोठ्या कुळात जन्म मिळेल तेव्हा तुला पूर्वजन्माची आठवण असेल. त्या जन्माच्या अंती माझ्या कृपेने तू मोक्षाप्रत जाशील.’
तेव्हा कृष्णाला नमस्कार करून तो गुहेतून बाहेर आला
श्रीविष्णु पुराण अंश-५ -भाग-७ (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
Shree Vishnu Puran Ugrasen Krishna Study by Vijay Golesar