शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्रीविष्णु पुराण… कसे होतात ‘नैमित्तिक’, ‘प्राकृतिक’ आणि ‘आत्यंतिक’ प्रलय?

सप्टेंबर 12, 2023 | 5:15 am
in इतर
0
bhagwan vishnu

श्रीविष्णु पुराण
अंश-६ ( भाग-२)
कसे होतात ‘नैमित्तिक’,
‘प्राकृतिक’ आणि ‘आत्यंतिक प्रलय’?

पराशर म्हणाले की, मैत्रेय महाराज! मी तुम्हाला कलीचे रहस्य सांगितले. आता प्रलय कोणकोणते असतात तेही सांगतो.”
“प्रलय तीन प्रकारचे आहेत. नैमित्तिक, प्राकृतिक आणि आत्यंतिक अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यापैकी जो कल्पान्तकाळी बाह्य प्रलय होतो तो नैमित्तिक होय, जो मोक्ष नावाचा प्रलय आहे तो आत्यंतिक, आणि जो दोन पराधांच्या मध्ये होतो तो प्राकृतिक प्रलय असतो.”

vijay golesar
विजय गोळेसर मो. ९४२२७६५२२७

मैत्रेयांनी प्रश्न केला की परार्ध म्हणजे केवढी संख्या ते कृपया सांगावे,
पराशर बोलले की, “अठरा आकडी संख्येएवढी वर्षे झाली की परार्ध होतो. त्याच्या दुप्पटी एवढी वर्षे उलटली म्हणजे प्राकृत प्रलय होतो, हे संपूर्ण जग त्या वेळी अव्यक्तामध्ये विरून जाते.
एका मात्रेचे अक्षर उच्चारण्यास जेवढा काळ लागतो तेवढे एक निमिष असते. पंधरा निमिषांएवढा काळ म्हणजे ‘काष्ठा’ होय, तीस काष्ठांची एक कला, पंधरा कला मिळून एक नाडी होते. दोन नाड्यांएवढा एक मुहूर्त असतो व तीस मुहूर्त मिळून एक दिवस व रात्र होते. तीस दिवसांचा एक महिना आणि बारा महिन्यांचे एक वर्ष होते. त्यावेळी देवांचा एक दिवस व एक रात्र पुरी होते. पृथ्वीवरील मानवाच्या तीनशेसाठ वर्षांएवढे देवांचे एक वर्ष असते.
अशा बारा हजार दिव्य वर्षांची एक युगांची चौकडी होते आणि एक हजार चौकड्या म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. यालाच एक कल्प म्हटले जाते. तेवढ्या कालावधीत चौदा मनू होऊन जातात नंतर ब्रह्मदेवाचा नैमित्तिक प्रलय होतो. त्यावेळी फार भयंकर परिस्थिती होते.

असा असतो नैमित्तिक प्रलय!
नैमित्तिक प्रलय घडण्यापूर्वी शंभर वर्षांपर्यंत पाऊस पडतच नाही आणि सर्वसाधारण प्राणी नष्ट होतात नंतर रुद्ररूपी परमात्मा विष्णू जगाचा घास घेण्यासाठी तयार होतो. तो तेव्हा सूर्यात प्रवेश करतो आणि पृथ्वीवरील व आतील पाणी शोषून घेऊन सर्वत्र कोरडे ठणठणीत करतो.
त्यानंतर सात सूर्य एकाच वेळी प्रगट होतात व तीव्र उष्णता निर्माण करून सर्व त्रिभुवन जाळून भस्मसात करतात, तेव्हा केवळ पृथ्वीचा तुकडा फक्त उरतो; मग शेषाच्या मुखातून विषारी आगीचे लोळ निघतात व सात पाताळांसहित पृथ्वी जाळून टाकतात. त्याचवेळी भुवर्लोक आणि स्वर्गलोक जळून खाक होतात. ती आग सैरावैरा वेगाने धावत असते.
तेव्हा भुवर्लोकातील व स्वर्गातील महात्मागण त्रासून महार्लोकांत जातात, परंतु ती आग तिथपर्यंत पोहोचल्यामुळे ते जनलोकांत निघून जातात. त्यानंतर महाविष्णू मोठमोठे अतिप्रचंड असे संवर्तक नावाचे ढग उत्पन्न करतो, ते मेघ निळे, जांभळे, लाल, शेंदरी, धुरकट, पांढरे, काळे अशा वेगवेगळ्या रंगांचे व वेगवेगळ्या आकाराचे असतात. त्यावेळी विजांचा कडकडाट चालूच असतो,
आणि अचानक पावासाची सुरुवात होते. तो पाऊस प्रलयकाळचा अग्नी समूळ नष्ट करून टाकतो. तरीही न थांबता तो पाऊस सर्व त्रैलोक्य जलमय करून टाकतो. ते ढग शंभर वर्षेपर्यंत जलवर्षाव करतीच असतात.
जिकडे पहावे तिकडे प्रचंड प्रमाणात फक्त पाणी तेवढे असते. असा हा नैमित्तिक प्रलय असतो.”

पराशर पुढे म्हणाले “जेव्हा पाणी सप्तर्षींचा लोक व्यापून टाकते तेव्हा हे त्रिभुवन म्हणजे महासागर बनते नंतर विष्णूच्या मुखातून वायू निघतो आणि तो ढगांना उडवून लावून शंभर वर्षांपर्यंत वाहत असतो; मग सिद्धलोकांनी स्तवन केलेला विष्णु जो सर्वभूते व चराचर सृष्टीचा आदिकारण आहे तो त्या वायूला पिऊन घेतो आणि आपल्या योगनिद्रेच्या आधीन होतो व आत्मचिंतन करीत त्या पाण्यावर शेषाच्या शय्येवर झोपून जातो.”
या प्रलयाचे कारण अर्थात निमित्त श्रीहरिची झोप हे असते म्हणून त्याला ‘नैमित्तिक प्रलय’ असे म्हटले जाते. जेव्हा विष्णू जागा असून पूर्ण भानावर असतो तेव्हा हा संसार चालत रहातो. विष्णू झोपी गेला की संसार त्याच्यात सामानून जातो. ही रात्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसाएवढी म्हणजे एक हजार युगचौकड्याएवढी असते.
तेवढा काळ गेला की, विष्णूला जाग येते आणि तो क्रमाक्रमाने सृष्टीची रचना करतो.

प्राकृत प्रलय कसा असतो?
आता प्राकृत प्रलय कसा असतो ते सांगतो.
जेव्हा अनावृष्टी होऊन पाताळासह सर्व लोक नष्ट होऊन जातात तेव्हा ईश्वराच्या योजनेनुसार महत्तत्वापासून पृथ्वीतत्त्वापर्यंत सर्व विकार निर्बल होतात; मग पृथ्वीतत्त्व जलतत्त्वात सामावून जाते. त्यावेळी पृथ्वी शिक्षक रहात नाही. मग सर्वत्र पाणीच पाणी होते; नंतर अझी संपूर्ण पाणी शोषून घेतो व सर्वत्र अग्नीचे साम्राज्य पसरते.
असे झाल्यानंतर वायू अग्नीचे सर्व तेज शोषून घेतो व तेव्हा अग्नी विझून शांत होतो; मग वायू सर्वत्र सैरावैरा धावत सुटतो. त्याचा वेग तेव्हा अति प्रचंड असतो. एवढे झाले की, तो वायू आकाशात विलीन होतो.
तेव्हा रूप, रस, स्पर्श व गंध नसलेली एक मोठी पोकळी तेवढी उरते. ती निराकार व शब्दयुक्त असते नंतर त्या आकाशाचा लय आदिभूतात होतो. आदिभूतात पंचभूतांसह सर्वच तत्त्वे सामावल्यामुळे फक्त अहंकार (मीपणाची जाणीव) तेवढा उरतो, तो तामस असतो.
पुढे त्या आदिभूताला सत्त्वप्रधान महत्तत्व गिळून टाकते, तेव्हा सर्व आवरणे व सीमा नाहीशा होतात नंतर असे घडते की, सर्वांसह त्या महत्तत्वाला मूळ प्रकृती आपल्यात सामावून घेते.
तिन्ही गुणांची जी साम्यस्थिती तीच मूळ प्रकृती होय, तिला ‘प्रधान प्रकृती’ असेही दुसरे एक नाव आहे. तिच या विश्वाचे मूळ कारण आहे. व्यक्त व अव्यक्त आणि सर्वस्वरूपिणी अशी ती आहे. म्हणून सर्व आकार शेवटी निराकारात विरून जातात.

या सर्वांपेक्षा वेगळा असा पवित्र, अभंग, कायम व सर्वांना व्यापून असणारा कुणी एक पुरुष (आत्मा) आहे. तो परमात्म्याचा अंशच आहे. तो सर्वा पेक्षा निराळा असा सर्वाधार परब्रह्म परमात्मा ‘ईश्वर’ होय, तोच विष्णू सर्वव्यापक असून त्याचा लाभ झाला की योगी पुन्हा सृष्टीचक्रांत गुंतत नसतो.
मी जी व्यक्ताव्यक्त प्रकृती म्हणालो ती आणि पुरुष अशी दोघेही ईश्वरातच मिसळून जातात. तो विष्णू हाच सर्वांचा एकमेव आधार असून वेद त्यालाच आळवीत असतात.
वैदिक कर्मांचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार कर्ममार्ग (प्रवृतीरूप) व दुसरा सांख्यमार्ग (निवृत्तीरूप) असे ते आहेत. दोन्हींचा उद्देश एकच आहे व तो म्हणजे परमेश्वराची आराधना हाच होय, कर्ममार्गी लोक यज्ञ, होमहवने व अनुष्ठाने करून त्याचे पूजन करीत असतात,
निवृत्तीमार्ग साधक ज्ञानयोगाच्याद्वारे त्याचे पूजन करतात, जे बोलून दाखवता येते ते’, आणि ‘बोलून सांगता येत नाही ते’, असे सर्व परमेश्वरच आहे. तोच फक्त अविनाशी, व्यक्त व अव्यक्त पुरुष आहे.
या आधी मी तुम्हाला जो द्विपरार्धकाळ सांगितला तेवढा याचा एक दिवस असतो आणि त्याची रात्रसुद्धा तेवढीच असतो. खरे तर (तो नित्य जागृत असतो म्हणून) त्याच्या बाबतीत दिवस-रात्र असा मुळातच भेद नाही पण ती एक समजावून देण्याची रीत आहे एवढेच!

आत्यंतिक’ प्रलय म्हणजे काय?
पराशर म्हणतात, “आता ती तुम्हाला ‘आत्यंतिक’ प्रलय म्हणजे काय? ते सांगतो, “
“आत्यंतिक प्रलय व आंतरिक व व्यक्तिगत स्वरूपाचा असतो. जेव्हा कधी आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा तिन्ही पीडांचे ज्ञान होऊन वैराग्य उत्पन्न होते, तेव्हाच आत्यंतिक प्रलयावस्था प्राप्त होत असते.
त्यापैकी आध्यात्मिक पीडा ही शारीरिक आणि मानसिक अशा दोन स्वरूपांची असते. त्यांच्यापैकी शारीरिक पीडेचे कितीतरी प्रकार आहेत. त्यांमध्ये –
मेंदूचे रोग, कफव्याधी, ताप, बेदना, भगेंद्र, अंगावरील गळवे, मूळव्याधी, सूज उत्पन्न होणे, दमा, कंपवात, नेत्ररोग, जुलाब, कोड असे असंख्य तऱ्हेचे अंगरोग आहेत. आता मानसिक रोगांविषयी ऐका!
काम (वासना), लोभ (हाव), भय, द्वेष (वैरभावना), क्रोध (संताप), मोह (आकर्षण), विषाद (खेद), शोक (दु:ख), असूया (हेवा), अपमान, ईर्ष्या व मत्सर असे अनेकानेक मानसिक विकार आहेत. अशा या दोन्ही प्रकारच्या पीडांना ‘आध्यात्मिक ताप’ असे नाव आहे.
नंतर जे दुःख इतरांच्या संयोगाने होत असते त्याला ‘आधिभौतिक पीडा’ असे म्हणतात, त्यात जनावरापासून झालेली इजा, मानवापासून होणारा त्रास, पिशाच्च व भूते यांच्या बाधा, सर्पदंश, राक्षस व दैत्य यांचे आक्रमण, विंचू चावणे असे पुष्कळ भेद आहेत.

तिसरा प्रकार म्हणजे ‘आधिदैविक पीडा’ होय! जेव्हा थंडी, उकाडा, वादळे, अतिवृष्टी, अनावृष्टी, वीज कोसळणे, पूर येणे अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्ती कोसळतात तेव्हा तो ‘आधिदैविक ताप’ असे ओळखावे.
यांच्याव्यतिरिक्त अजून गर्भावस्थेतील दुःख, जन्मास येतेवेळेचे दुःख, वृद्धावस्था, अज्ञान, मरण व नरकयातना असे हजारो प्रकार आहेत. गर्भधारणा झाल्यापासून जीव अनेक रस व धातू यांनी भरलेल्या गर्भाशयात वाढतो. तिथले त्याचे परावलंबित्व व यातना या अवर्णनीय आहेत. त्याच वेळी तो जीव पूर्वजन्मातील आठवणी काढीत हताश होऊन पडलेला असतो.
जेव्हा तो जन्मास येतो तेव्हा नाना प्रकारच्या रसात लडबडलेला असतो. पाठीकडून प्रसूतीकाळचा वायू त्याला धक्के देत असतो. अशा परिस्थितीत तो कासावीस होतो आणि कसाबसा योनिमार्गाने बाहेर येतो.त्यावेळी तो जीव पूर्णपणे परावलंबी असून स्वतः काहीच करू शकत नाही की बोलू पण शकत नाही.
नंतर हळूहळू अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देत तो वाढू लागतो. त्याला स्वतःच्या अवस्थेविषयी, भूतकाळाविषयी आणि भविष्याची कसलीच जाणीव नसते. त्याला विवेकबुद्धी नसल्यामुळे बरे-वाईट, पाप-पुण्य, कर्तव्य-अकर्तव्य, धर्म-अधर्म यांतील फरक कळत नाही. तेव्हा तो अन्य प्राण्यांसारखा फक्त देहपोषण करीत रहातो. असे त्याचे आयुष्यभर चालते.
शेवटी कालक्रमानुसार केव्हातरी अंतसमय येतो.

त्याआधी शरीराची वाताहत होऊ लागते. दात पडतात, शक्ती कमी होते, देहावर सुरकुत्या पडतात, नजर मंदावते, नाक कफाने भरून जाते. हाडे व शिरा टरटरीत होतात. ताठ असलेला देह वाकतो, पचनशक्ती कमी होते, अन्न जात नाही. इंद्रिये आवरून धरता येत नाहीत.
त्याला शारीरिक हालचालींसाठी क्षणोक्षणी दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. बोलणे अस्पष्ट होते. स्मरण तर मुळीच रहात नाही. कुटुंबीय त्याची उपेक्षा करून हिडिस फिडिस करतात पण त्याच्या वासना काही कमी होत नाहीत; मम तो सतत करवादत राहतो. तेव्हा परिवारातील लोक त्याची थट्टा करतात. त्यांना याचा वीट येतो.
हे म्हातारपणातले कष्ट झाले. मरणकाळाचे कष्ट तर आणखीच असह्य असतात. इंद्रिये शिथिल पडतात. तो कधी शुद्धीत असतो तर कधी नसतो. जेव्हा तो शुद्धीत असतो तेव्हा तो आपले कुटुंबीय, द्रव्य, मालमत्ता यांचे पुढे काय होईल हाच विचार करीत असतो.
मग केव्हातरी मरणाचा क्षण येऊन ठेपतो!
त्याप्रसंगी रोग उचल खातो. त्याची नजर मंदावते. तो हातपाय झाडू लागतो. त्याच्या तोंडाला कोरड पडते. घशात कफ दाटल्यामुळे ऊर्ध्व (घरघर) लागतो. भुकेने व तहानेने तो व्याकुळ होतो पण यमाचे दूत त्याला देहातून खेचून काढतात. तेव्हा त्याला कर्मफळे भोगावीत यासाठी एक यातनादेह मिळतो.
परंतु हे सर्व एवढ्यावरच संपत नाही तर नंतर ज्या यातना भोगावयाच्या असतात, त्याही ऐका!

प्रथम यमदूत त्याला करकचून बांधतात व मारीत झोडीत यमापाशी नेतात. तो प्रवास महाभयानक असतो. त्यावेळी वाटेत तापलेली वाळू, काटेरी रस्ता, पशूंचा हल्ला होत असतो. तशाच नंतरही एकाहून एक तीव्र अशा नरकयातना उभ्या असतात. ती सर्व पापकृत्यांची फळे असून अगणित आहेत.
अहो मैत्रेय मुनी! दुःख फक्त नरकातच आहे असे समजू नका, स्वर्गातसुद्धा पुन्हा पृथ्वीवर पतन होण्याचे भय असतेच तर नरकयातना अथवा स्वर्गातील सुख भोगून संपले की, जीव पुन्हा गर्भात प्रवेश करतो. कधी तो गर्भातच मरतो, कधी जन्मतःच मरण पावतो. कधी बालपणी, तरुणपणी अगर म्हातारपणी मरतो.
तो कधीही जरी मेला तरी जिवंत असेतोवर कष्ट उपसावेच लागतात. दुःखे येतच रहातात. अशाप्रकारे निर्भेळ सुख कुठेही नसते.
त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेणे हाच आहे. तेव्हा शहाण्याने त्यासाठीच झटले पाहिजे. त्याकरता दोन मार्ग आहेत व ते म्हणजे कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग!
ज्ञानसुद्धा दोन जातींचे आहे १) सारासार विवेकांतून प्रगट झालेले आणि २) शास्त्रांतून वर्णन केलेले. अज्ञान हे घोर अंधकासारखे असून शास्त्रजन्य ज्ञान हे दिवटीप्रमाणे असते तर विवेकजन्य (उत्स्फूर्त) ज्ञान सूर्याप्रमाणे असते. या संदर्भात मनूचे म्हणणे काय आहे? ते सांगतो

ज्ञानाचे प्रकार दोन आहेत – शब्दब्रह्म व परब्रह्म ! शब्दब्रह्म पचनी पडल्यानंतर ज्ञानार्थ्याला परब्रह्माची प्राप्ती होते. अथर्ववेदामध्ये परा आणि अपरा अशा दोन विद्यांचा उल्लेख आहे. परा विद्येच्या द्वारे अविनाशी ब्रह्माची प्राप्ती होते तर अपरा ही वेदस्वरूपा आहे.
जी वस्तू निराकार, नित्यनूतन, अकल्पनीय, अजन्मा, अधिकारी, अलक्ष्य निरनयन, सर्वव्यापी, कायम, सर्व चराचरांचे आदिकारण अशी आहे तीच ब्रह्म होय. ज्ञानी लोक तिला ज्ञानचक्षूंनी पाहतात. मोक्षमार्गी साधकांनी तिचेच ध्यान करीत जावे.
वेदांनी तिला विष्णूचे अति सूक्ष्म परमपद असे म्हटले आहे. त्यालाच भगवान असेही नाव दिले आहे. तिचा अर्थात परमात्य तत्त्वाचा साक्षात्कार होणे हेच परमज्ञान आहे. कर्मकांडाचे ज्ञान हे वेगळे आहे. ते ब्रह्म बोलून दाखवता येत नाही तरीही व्यवहारात सोयीसाठी त्याला ‘भगवान’ असे म्हणतात.
तेच सर्वांचे उत्पत्तिस्थान, गुणांचे वसतिस्थान आणि संहारस्थान आहे. सर्व चराचर त्याच्या आत असून पुन्हा चराचरांत आत्म्याच्या रूपाने ते वावरत असते.
पूर्वी खाण्डिक्याने प्रश्न केल्यावर केशिध्वजाने वरील व्याख्या केली होती. सर्व भूतजाताचा आधार व भूतांना व्यापून सृष्टीचा निर्माता आणि चालविता जो कुणी आहे तोच ‘वासुदेव’ होय. तो सर्वांच्याही पलीकडचा असून मोठा विलक्षण आहे.
कणाकणाला व्यापून असणारा, स्वतःच्या मायेच्या एका अंशाने चराचराला प्रेरणा देणारा, साकार तसाच निराकार, सर्वसाक्षी व सर्वज्ञ असा तो परमेश्वर आहे. तो फक्त ज्ञानदृष्टीनेच जाणणे शक्य आहे. ती दृष्टी म्हणजेच ‘पराविद्या’ होय!

श्रीविष्णु पुराण अंश-६ ( भाग-२) क्रमश:
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल- ९४२२७६५२२७
Shree Vishnu Puran Pralay Disasters by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारत – एक दर्शन… भारतमातेची नवविधा भक्ती…

Next Post

जन्माष्टमी विशेष… पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ… श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली स्वर्गनगरी!

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
DegEr 6V4AAdlqe

जन्माष्टमी विशेष... पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ... श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली स्वर्गनगरी!

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011