श्रीविष्णु पुराण अंश-५ (भाग-६)
कृष्णाची मथुरेतील अद्भुत कृत्ये!
वैदिक साहित्यात म्हणजेच वेद आणि पुराणात दोन चरित्रे लोकप्रिय आणि विश्व प्रसिद्ध आहेत. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची! श्रीविष्णु पुराणात रामायणाचा कथासार आपण थोडक्यात पहिला. श्रीविष्णु पुराणातील संपूर्ण ५ वा अंश श्रीकृष्ण चरित्राला वाहिला आहे. आज आपण श्रीविष्णु पुराणातील श्रीकृष्ण चरित्र भाग – ६ पाहणार आहोत.
बलराम व कृष्ण नगरीची मौज पहात राजमार्गावरून चालू लागले. वाटेत त्यांना कपड्यांचे बोचके घेऊन जाणारा कुणी एक धोबी दिसला. ते पुढे एका माळ्याच्या घरी गेले.
तिथे गेल्यावर त्यांनी माळ्याकडे फुले मागितली. तेव्हा माळ्याने त्यांचा आदरसत्कार केला आणि सुगंधी फुलांचे हार व गजरे अर्पण केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या कृष्णाने त्याला वर दिला
पुढे जात असताना त्यांच्या दृष्टीस एक कुबड असलेली खी दिसली. कृष्णाने तिला थांबवून विचारले की, तिच्या हातात असलेले शृंगार साधनांचे पात्र ती कुणासाठी नेते आहे. त्यावेळी कृष्णाची एखाद्या कामुक पुरुषासारखी नजर तिच्यावर रोखलेली होती, तेव्हा तिने लाजतच सांगितले की,
“आपण इथे नवीन दिसता. माझे नाव अनेकवक्रा असून सर्व नागरिक मला ओळखतात. मी कंसाची दासी असून त्याला सौंदर्य प्रसाधने बनवून देते. माझ्यावर त्याची फार कृपा आहे.”
तेव्हा कृष्णाने विचारले “ही प्रसाधने खरोखरीच उत्तम दर्जाची असून राजालाच योग्य आहेत. पण आमच्या योग्य अशी जर प्रसाधने असली तर आम्हाला दे.”
तेव्हा तिने आदरपूर्वक त्याला चंदनाचे उटणे, गंध वगैरे वस्तू दिल्या. तेव्हा त्यांनी ते लावले. नंतर कृष्णाने दोन बोटांनी तिची हनुवटी उचलून व पावलांवर पाय ठेवून एक हलकासा हिसका दिला. त्यामुळे तिचे कुबड त्या क्षणी नष्ट होऊन व सर्व शरीर सरळ होऊन ती अत्यंत स्वरूपवान दिसू लागली.
मग तिने कृष्णाचा हात धरला आणि विनंती केली त्याने तिच्या घरी येऊन तिचे आदरातिथ्य व सेवा यांचा स्वीकार करावा.
त्यावर बलरामाकडे नजर टाकून कृष्णाने तिला उत्तर दिले की, “मी पुढे एक वेळ खातरीने तुझ्या घरी येईन व तुझा पाहुणचार घेईन.”
नंतर हसत तिचा निरोप घेऊन तो बलरामासह यज्ञमंडपापाशी गेला. तिथल्या पहारेकऱ्यांना विचारून त्याने यज्ञासाठी ठेवलेले धनुष्य उचलले व त्याची दोरी चढवून ते ताणू लागला. तेव्हा ते भलेथोरले धनुष्य काडकन मोडले व त्यावेळी एवढा कडकडाट झाला की, संपूर्ण मथुरेत तो ऐकू गेला.
तो प्रकार पाहून पहारेकऱ्यांनी त्याच्यावर एकदम हल्ला चढविला. काही क्षणातच त्यांना ठार करून ते दोघे भाऊ तिथून बाहेर पडले. तद्नंतर सर्व प्रकार जाणून कंसाने चाणूर आणि मुष्टिक यांना बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले की, “माझ्या जिवाचा घात करण्यासाठी गवळ्याची दोन पोरं आली आहेत. तुम्ही उद्या त्यांच्याशी कुस्ती करा आणि मारून टाका. एवढे केलेत की, मी तुम्हाला जे हवे असेल ते सर्व देईन.
तुम्ही नियमानुसार कुस्ती खेळा अगर दंगलबाजी करा परंतु त्यांचा पुरता निःपात करा.” मग कंसाने माहुताला बोलावून आणला व आज्ञा दिली की, कुस्तीच्या मैदानाच्या दारावर कुवलयापीड हत्ती घेऊन त्याने यावे आणि त्या दोन भावांच्या अंगावर हत्ती घालून त्यांना मारून टाकावे.
एवढी सर्व व्यवस्था करून मग तो दुसऱ्या दिवशी उजाडण्याची वाट पाहू लागला.
दुसऱ्या दिवशी कुस्तीच्या मैदानात सकाळपासूनच नागरिकांच्या झुंडी येऊ लागल्या. युद्धाचा निर्णय देणारे पंच, स्वतः कंस व त्याचा परिवार, सामान्य नागरिक, स्त्रिया, नगरवधू, नन्द वगैरे पाहुणे, वसुदेवासहित राजपरिवार व शेवटचे पुत्रमुख एकदा पाहून घ्यावे अशा आशेने आलेली देवकी वगैरे सर्वांसाठी खास आसनांची व्यवस्था केली होती.
योग्य वेळी वाद्यांच्या गजरात जोरजोराने शड्डू ठोकीत चाणूर व मुष्टिक हे येऊन दाखल झाले. दुसरीकडून कृष्ण व बलराम यांनी मैदानात हसत हसत प्रवेश केला. तेवढ्यात माहूताने चिथावल्यामुळे कुवलयापीड हत्ती वेगाने त्या दोघांच्या अंगावर धावला. ते दृश्य पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा राहिला.
बलराम कृष्णाला म्हणाला “अरे! याला मुद्दाम आपल्यावर सोडला आहे. तेव्हा याला मारलाच पाहिजे.” त्यावेळी कृष्णाने मोठ्याने गर्जना केली आणि पर्वताप्रमाणे प्रचंड अशा हत्तीची सोंड पकडली व एखादी गोफण फिरवावी तसा गरागरा फिरवला; मग त्याचा डावा दात काढला आणि माहूतावर प्रहार केला. त्यामुळे माहूताच्या डोक्याचे तुकडे तुकडे झाले.
बलरामाने हत्तीचा उजवा गुळा खेचून काढला व आजूबाजूच्या माहूतांना ठार मारले नंतर एक उंच उडी मारून त्याने हत्तीच्या गंडस्थळावर आपली डावी लाथ एवढ्या जोराने मारली की, खा होऊन तो हत्ती मरून पडला,
तेव्हा रक्ताने न्हायलेले ते दोघे भाऊ हातांमध्ये हत्तीचे सुळे देऊन मैदानात चकरा मारू लागले, तेव्हा प्रेक्षकांमध्ये चुळबूळ सुरू झाली व ते कुजबूज करीत एकमेकांना कृष्ण व राम यांचे पराक्रम सांगू लागले, ते तर त्यांना साधारण मानव न वाटता विष्णूचे अवतार आहेत असेच भासत होते,
श्रीकृष्णाने चाणूर मल्लाला ठार केले
दुसरीकडे स्त्रियांमध्ये असाच प्रकार चालू होता. देवकी आणि वसुदेव यांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. लोकांच्यात तर अशी कुजबूज चालली होती की, या कोवळ्या पोरांची कुस्ती चाणूर व मुष्टिक असा कसलेल्या मल्लांशी ठरविली हे अन्यायकारकच आहे.
असे सर्वत्र वातावरण असताना कृष्ण व राम यांनी लंगोट कसून कुस्तीच्या हौद्यात उडी घेतली. ते जोरजोरात दंड थोपटीत मैदानात गोल गोल फेऱ्या मारू लागले. तेव्हा दुसरीकडून चाणूर व मुष्टिक या दोघांना प्रवेश केला; मग क्षणार्धात कृष्णाची चाणूराशी व बलरामाची मुष्टिकाशी कुस्ती सुरू झाली.
बराच वेळपर्यंत ते चौघेही तऱ्हेतऱ्हेचे डावपेच करीत लढत होते. शेवटी दोघे दैत्य थकून गेले व त्यांच्या अंगचे त्राण संपुष्टात आले. तरीही राम-कृष्णाने त्यांना खेळवून शेवटी त्यांच्या तंगड्या पकडून वर उचलले व गरागरा फिरवून जोराने जमिनीवर आपटले तेव्हा ते दैत्य रक्त ओकत मरून पडले.
तो पराक्रम पाहताच इतर पहिलवान तर पळूनच गेले. राम आणि कृष्ण आनंदाने रिंगणात नाचत सुटले.
तेव्हा कंसाने रागाच्या भरात सैनिकांना आज्ञा दिली की, या दोघा भावांना बाहेर हाकलून द्या. पापी नंदाला कैद करा. कृष्णाबरोबर धुमाकूळ घालणाऱ्या गवळ्याच्या पोरांना मारून टाका आणि त्यांचे सामान हिसकावून घ्या.
श्रीकृष्णाने कंसाचे केस पकडून जमिनीवर आपटले
कंसाचे भाषण चालले असताना कृष्णाने खदखदा हसत उडी मारली व तो सिंहासनाजवळ पोहोचला; मग त्यांने कंसाला आसनावरून ओढत खाली पाडला व त्याचे केस धरून त्याच्या छातीवर गुडघे रोवून बसला. आणि त्याचा गळा दाबला. तेव्हा त्याच क्षणी त्याचा जीव गेला. त्याचे निष्प्राण कलेवराचे धूड कृष्णाने धरून फरपटत मैदानात आणले, तेव्हा कंसाचा भाऊ सुमाली धावून गेला परंतु बलरामाने एका क्षणातच सुमालीचा निकाल लावला,
तेव्हा प्रेक्षकांत मोठा हलकल्लोळ माजला, लोक तर सैरावैरा धावत सुटले. तशा त्या गदारोळातही कृष्ण व राम वसुदेव आणि देवकीपाशी गेले व त्यांच्या चरणी लोटांगण घालून हात जोडून उमे राहिले. तेव्हा त्या उभयतांना पूर्वजन्मीचे स्मरण झाले आणि वसुदेव कृष्णाला म्हणाला
“हे प्रभू! प्रसन्न हो. तू दिलेल्या आशीर्वादाची पूर्तता आज झाली आहे. तू माझ्या पोटी जन्म घेऊन आमचे कुळ पवित्र केलेस, तो सर्वात्मक आणि सर्वव्यापी परमेश्वर आहेस. देवा! याज्ञिक लोक तुलाच हविर्भाव देतात. तूच यज्ञ आणि तूच यजक आहेस. तुला आम्ही ‘पुत्रा’ अशी हाक तरी कशी मारावी ?
तुझे मूळ स्वरूप न जाणता आल्यामुळे कंसाच्या भीतीने तुला मी जन्मत:च गोकुळात पोहोचता केला. तू तिथेच एवढा मोठा झालास,त्यामुळे मला तुझे खरे रूप कधी कळलेच नाही. तू आमच्या नजरेआड खेळत वाढलास.
पण तुझी अलौकिक कृत्ये पाहून मी जाणले आहे की, तूच तो आदिपुरुष आहेस. जगाचा उद्धार करावा म्हणून व माझ्या पूर्वपुण्याईमुळे तू माझ्या पोटी अवतार घेतला आहेस.
आपल्या अद्भुत लीलांमुळे वसुदेव व देवकीसह लोक संभ्रमात पडले असे पाहून कृष्णाने आपली माया सर्वांवर पसरली; मग तो आई-वडिलांना म्हणाला “मी आपल्या दर्शनासाठी कधीपासून तळमळत होतो. ती माझी इच्छा आज पुरी झाली.”
नंतर त्याने माता-पित्यासह सर्व थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले. प्रतिष्ठित नागरिकांचा योग्य प्रकारे सन्मान केला; नंतर कंसाची आई व पत्नी यांचे सांत्वन केले; मग उग्रसेनाला कारागृहातून आणविला. सर्व मृतांचे अंत्यविधी पार पाडले. उग्रसेनाचा राज्याभिषेक केला.
श्रीविष्णु पुराण अंश-५ /भाग-६ क्रमश:
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
Shree Vishnu Puran Krishna Mathura by Vijay Golesar