श्रीविष्णु पुराण
अंश-५ (भाग-10)
कृष्णाचा सोळा हजार शंभर कन्यांशी विवाह
उषा-अनिरूद्ध आख्यान आणि श्रीकृष्ण व बाणासुर यांचे युद्ध!
पराशर पुढे म्हणाले – “इंद्राने केलेली स्तुती ऐकून कृष्ण हसत बोलला की हे जगत्स्वामी! तू देवांचा राजा आहेस तर आम्ही मार्च मानव आहोत. तरी तूच आम्हाला क्षमा कर. हा पारिजातक वृक्ष नंदनवनातच योग्य आहेम्हणून तू तो घेऊन जा. मी सत्यभामेच्या शब्दाचा मान ठेवावा म्हणून तो घेतला होता.
आणखी एक गोष्ट म्हणजे तुझे वज्र देतो तेसुद्धा घेऊन जा. त्यावर मालकी हक्क तुझाच आहे. तेव्हा इंद्र म्हणाला की देवा- ‘मी मनुष्य आहे’ असे म्हणून मला भुलवू नको, मला फक्त तुझे सगुण साकार रूप तेवढेच दिसते पण त्याच्यामागचे तुझे तत्त्वरूप मी जाणत नाही.
तू खरोखर जो कुणी आहेस ते तुलाच ठाऊक! पण मला एवढे माहिती आहे की, तू लोकरक्षक आहेस. तेव्हा हा पारिजातक तू द्वारकेत ने. तुझा अवतार जेव्हा संपेल तेव्हा हा तिथे रहाणार नाही. आता हे प्रभो! माझ्या अपराधांना पोटात घाल. मग ‘तथास्तु’ असे म्हणून कृष्ण द्वारकेत गेला..
तिथे नागरिकांच्या स्वागताचा स्वीकार करून त्याने तो पारिजातक सत्यभामेच्या महालाच्या अंगणात लावला. त्या वृक्षाचा एक चमत्कार असा होता की, यादवांनी त्याच्याजवळ जाऊन स्वतःला पाहिले तेव्हा त्यांना असे दिसले की ते साधारण जीव नसून दैवी अंशाने युक्त आहेत.
नंतर कृष्णाने नरकासुराची आणलेली हत्ती, घोडे आदि संपत्ती यादवांना वाटून दिली. नरकासुराच्या कैदेतील सर्व कन्या स्वत:साठी ठेवल्या.
मग एका शुभमुहूर्तावर त्याने त्यांच्याशी विवाह केला. तो एकाच वेळी अनेक देह धारण करून प्रत्येक जागी बोहल्यावर उभा होता. त्यामुळे प्रत्येकीला वाटले की, कृष्णाने फक्त माझ्याशीच विवाह केला आहे. त्याचप्रमाणे तो रात्री त्या प्रत्येकीच्या घरी असे “
उषा-अनिरूद्ध आख्यान
कृष्णापासून त्याच्या प्रत्येक पत्नीला पुष्कळ मुलेबाळे झाली. पैकी रुक्मिणीपुत्र प्रद्युम्न याच्याविषयी मघाशीच सांगून झाले आहे.
इतर राण्यापैकी सत्यभामेचे भानू व भौमेरिक हे दोघे पुत्र होते. रोहिणीचे दीप्तिमान्, ताम्रपक्ष, जांबवतीचा सांब हे पुत्र होते. तसेच नाम्नजितीचे भद्रविन्द वगैरे आणि मित्रबिन्देचा संग्रामजित असे होते. माद्रीचा वृक, लक्ष्मणेचा गात्रवान व कालिंदीचा श्रुत वगैरे पुत्र जन्मले.
यांच्याखेरीज अन्य स्त्रियांपासून अठ्ठयाऐंशी हजार आठशे पुत्र झाले.
या सर्व पुत्रांमध्ये रुक्मिणीचा प्रद्युम्न हा थोरला होता. त्याचा पुत्र अनिरुद्ध व त्याचा पुत्र वज्र होय. अनिरुद्ध युद्धात कधीही हार जात नसे. त्याचे लग्न बळीराजाची नात आणि बाणासुराची मुलगी उषा हिच्याशी झाले होते. त्यावेळी कृष्ण आणि शंकर या दोघांत लढाई झाली व कृष्णाने बाणासुराचे एकहजार हात छाटून टाकले होते.
त्याचे असे झाले –
एकदा बाणासुराच्या उषा नावाच्या मुलीने पार्वती व शंकर यांची कामक्रीडा पाहिली. ती पाहून तिलाही तशी क्रीडा करण्याची इच्छा झाली. ती ओळखून पार्वतीने तिला तिला सांगितले की, तिची पतीसोबत ती इच्छा योग्यवेळी पूर्ण होईल. तरी सध्या तिने उतावळेपणा करू नये.
तेव्हा तिने विचारले की, तिचा पती कोण असेल?
त्यावर पार्वती म्हणाली की, “वैशाख महिन्यातील शुद्ध द्वादशीच्या रात्री तुला स्वप्नात जो भोग देईल तोच तुझा पती होईल,” नंतर त्याप्रमाणे त्याच तिथीला तसेच घडले व ती त्याच्यावर भाळली.
सकाळी जाग आल्यावर तिला रात्रीच्या स्वप्नाची आठवण झाली व तिने मैत्रिणीपाशी आपले मन मोकळे केले. ती मैत्रीण बाणासुराच्या कुंभांड नावाच्या मंत्र्याची मुलगी असून तिचे नाव चित्रलेखा होते. तेव्हा तिने असे सांगितले की, स्वप्नात झालेल्या दर्शनावरून संपूर्ण माहिती काढणे फार अवघड काम आहे. तरीसुद्धा ती उषेसाठी होईल तेवढा प्रयत्न जरूर करील.
मग काही दिवसांनी चित्रलेखा परत आली व सोबत अनेक देव, गंधर्व, यक्ष, मानव वगैरेंची चित्रे आणली. ती पाहताना बलराम व कृष्ण यांची चित्रे पाहून ती लाजून मान खाली घालून बसून राहिली नंतर जेव्हा तिने प्रद्युम्नपुत्र अनिरुद्धाचे चित्र पाहिले तेव्हा ती जणू हर्षवायू झाल्याप्रमाणे आनंदीत झाली व म्हणाली –
“अगं! हाच तो! हाच तर स्वप्नात येऊन गेला.”
मग चित्रलेखेने तिला सांगितले की, तो कृष्णाचा नातू असून त्याचे नाव अनिरुद्ध आहे. तो त्रिभुवनात सर्वात देखणा असून तुझा पती म्हणून तो देवीने निश्चित केला आहे. “अगं तुझे भाग्य फार थोर आहे.
परंतु द्वारकेत प्रवेश करणे काही सोपे नव्हे. तरीही मी काहीतरी युक्ती लढवून त्याला इथे आणीन व तुझी त्याच्याशी भेट घडवीन पण तू मात्र ही गोष्ट मनातच गुप्त ठेव म्हणजे झाले.’
एवढे आश्वासन देऊन चित्रलेखा निघून गेली.
श्रीकृष्ण व बाणासुर यांचे युद्ध
बाणासुराला एक हजार हात होते पण त्याची युद्ध करण्याची खुमखुमी काही शांत होत नव्हती. तेव्हा त्याने शंकराला विचारले असता शंकर म्हणाला की, जेव्हा त्याचा मोराचे चिन्ह असलेला ध्वज मोडून पडेल तेव्हा लढण्याची संधी मिळेल; मग बाणासुर समाधानाने घरी गेला.
काही काळानंतर कारण नसताना अचानकपणे त्याचा ध्वज तुटून पडला. ते पाहून तो खूष झाला. त्याचवेळा चित्रलेखेने योग सामध्यनि अनिरुद्धाला द्वारकेतून उचलून उषेपाशी तिच्या महालात आणून सोडला आणि ती निघून गेली.
अनिरुद्ध व उषा यांच्या चाललेल्या प्रणयक्रीडा गुप्तपणे पाहून पहारेकऱ्यांनी ते वृत्त बाणासुराला सांगितले. लागलीच बाणासुराने अनिरुद्धाला धरून आणण्यासाठी शस्त्रधारी सेवक पाठविले परंतु अनिरुद्धाने एक लोखंडी दंडुका घेऊन त्यांना ठार मारले.
ती गोष्ट समजली तेव्हा स्वत: बाणासुर एका रथात बसून आला व युद्ध करू लागला. सर्व शक्ती पणाला लावूनही अनिरुद्ध काही आटोपेना. तेव्हा बाणाने मंत्र्यांचा सल्ला घेतला व राक्षसी मायेचा प्रयोग करून त्याने अनिरुद्धाला नागपाशात जखडून टाकला.
तिकडे द्वारकेमध्ये अचानक अनिरुद्ध नाहीसा झाल्यामुळे मोठी खळबळ माजली होती व शोध-तपास चालू होता. तेव्हा नारदांनी जाऊन सांगितले की, त्याला बाणासुराने कैद केला आहे. नारदांनी सर्व प्रकार कथन केला. तेव्हा यादवांना जी शंका होती की, देवांनी अनिरुद्धाला पळवून नेला असावा, ती दूर झाली.
लगेच कृष्ण, बलराम आणि प्रद्युम्न असे तिघेही गरुडावर बसून बाणासुराच्या राजधानीपाशी जाऊन पोहोचले. तेव्हा रक्षणासाठी असलेल्या शिवगणांनी प्रतिकार करताच त्यांना मारून ते राजधानीपाशी गेले.
त्यावेळी बाणासुराचे रक्षण करणाऱ्या माहेश्वर नावाच्या ज्वराने त्यांच्यावर हल्ला केला व त्या तिघांना त्याने गलितगात्र केले; मग कृष्णाच्या शरीरातील वैष्णव ज्वराने माहेश्वर ज्वराला हुसकावून लावला. माहेश्वर ज्वर निर्बल झाला तेव्हा ब्रह्मदेवाने विनंती केल्यावरून कृष्णाने क्षमा करून त्याला सोडून दिला.
मग कृष्णाने पंचाग्नी जिंकून घेतले आणि दानव सैन्याचा संहार मांडला. तेव्हा बाणासुराच्या बाजूने लढण्यासाठी स्वतः शंकर व कार्तिकेय येऊन दाखल झाले. तेव्हा श्रीकृष्ण आणि शंकर यांच्यात घनघोर युद्धाला आरंभ झाला. त्या दोघांनी परस्परांवर जी तीव्र अत्रे फेकली त्यांच्यामुळे सर्व लोक जळू लागले. देवांना तर असे वाटले की, प्रलयाचा आरंभ झाला की काय? तेव्हा कृष्णाने एका अशा अस्त्राचा मारा केला की, भगवान शिव जागच्या जागी जांभया देत झोपी गेले.
ते दृश्य पहाताच सर्व दैत्य आणि शिवगण पळत सुटले. त्याचवेळी गरुड, प्रद्युम्न व श्रीकृष्ण या तिघांनी एकत्रित हल्ला केला व कार्तिकस्वामीला पळवून लावला.
असा प्रकार पाहून बाणासुर बैलांच्या रथात बसून युद्धासाठी जातीने तिथे आला. तेव्हा त्याचे बलरामाशी युद्ध चालू झाले. त्यांत बाणासुराचे सैन्य मागे हटले. बाणासुराने पाहिले की, कृष्ण व बलराम दोघेही मिळून लढत आहेत. तेव्हा त्याने धनुष्य सरसावले व तो विजेच्या वेगाने बाण सोडू लागला.
त्या घनघोर युद्धात बाणासुराने मोठ्या निकराने कृष्णाचे सर्व बाण तोडून टाकले असे पाहून कृष्णाने हजारो सूर्यांसारखे लखलखीत सुदर्शन चक्र हाती घेतले. त्या समयी सर्व दैत्यांची मंत्रमयी कुलस्वामिनी कृष्णाच्या समोर पूर्ण नग्नावस्थेत प्रगट झाली. तेव्हा त्याने डोळे झाकून घेतले आणि चक्र सोडून दिले.
त्या चक्राने गरगर फिरत जाऊन दैत्यांची शस्त्रे आणि बाणासुराचे ९९८ हात तोडून टाकले असे पाहून व कृष्ण बाणासुराला मारणारच हे ओळखून मताच्या कैवाराने शंकर पासून गेला. त्याने कृष्णाची स्तुती केली आणि बाणाला मारू नकोस असे विपविले
कृष्णाने चक्र खाली ठेवले व तो म्हणाला,असे असेल तर ठीक आहे. भी तुमचा मान ठेवण्यासाठी याला सोडून देतो. अहो! खरोखर तुमच्यात व माझ्यात भेद नाहीच,
त्यानंतर दोन्ही पक्षांत समेट झाला. अनिरुद्धाला नागपाशातून मुक्त केला; मग बलराम, प्रयुम्न, नातू व नातसुनेला घेऊन कृष्ण द्वारकेत गेले.
श्रीविष्णु पुराण अंश-५ (कृष्णकथा भाग-10) क्रमश:
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल- ९४२२७६५२२७
Shree Vishnu Puran Krishna Marriage Banasur War by Vijay Golesar