श्रीविष्णु पुराण
अंश-६ (भाग-३)
केशिध्वज व खाण्डिक्य यांची कहाणी!
पराशरांचे कथन पुढे चालू झाले. “परमात्म्याचा साक्षात्कार स्वाध्याय आणि संयम यांच्यामुळे होतो. या दोघांनाही ब्रह्म असेच म्हणतात. स्वाध्यायाच्याद्वारे योग साधावा म्हणजे परमात्मा प्रगट होतो, ही डोळ्यांनी बघायची गोष्ट नव्हे.”
त्यावर मैत्रेयांनी योगाविषयी उत्सुकता आहे असे सांगून तो विषय स्पष्ट करण्यासाठी विनंती केली.
तेव्हा पराशर म्हणाले की, “पूर्वकाली केशिध्वजाने खाण्डिक्याला जो उपदेश केला तोच मी सांगणार आहे.”
मैत्रेयांनी केशिध्वज व खाण्डिक्य यांचा पूर्वेतिहास विचारल्यावरून पराशर सांगू लागले –
पूर्वी कोणे एके काळी धर्मध्वज जनक नावाचा एक राजा होऊन गेला, त्याचे अमितध्वज आणि कृतध्वज असे दोन मुलगे होते. त्यांपैकी कृतध्वज हा धार्मिक प्रवृत्तीचा होता. त्याचा मुलगा केशिध्वज नावाचा होता. अमितध्वज याचा पुत्र ‘खाण्डिक्य’ हा पुढे राजा झाला, तो प्रवृत्तीमार्गी असून कर्ममार्गी होता पण त्या दोघांत नेहमी चुरस असे.
पुढे असे झाले की, केशिध्वजाने खाण्डिक्य याला पदच्युत करून सत्ता घेतली. तेव्हा आपले पुरोहित आणि सेवक व काही सामानसुमान घेऊन खाण्डिक्य दूरवर वनात चालता झाला. केशिध्वज ज्ञानमार्गी असूनसुद्धा मृत्यूवर विजय मिळावा म्हणून यज्ञयाग व अनुष्ठाने करीत असे.
एकदा असे झाले की, केशिध्वजाचा यज्ञ चालला असताना यज्ञासाठी दूध देणाऱ्या गायीला चरत असताना सिंहाने हल्ला करून मारली. ते वृत्त कळले तेव्हा राजाने याज्ञिकांना विचारले की, मी गाईला पुरेसे संरक्षण देऊ शकलो नाही. तरी याला प्रायश्चित्त कोणते घ्यावे?
तेव्हा पुरोहितांनी सांगितले की, त्याबाबतीत त्यांना ज्ञान नसल्यामुळे राजाने महात्मा कशेरू याला विचारावे. जेव्हा राजाने कशेरूला विचारले तेव्हा त्यानेही आपली असमर्थता सांगून भृगुपुत्र शौनकापाशी जाण्यास सुचविले.
शौनक म्हणाला की, सांप्रतकाळी या भूमंडलावर हे ज्ञान असणारा कुणीही नाही. फक्त एका व्यक्तिला ते ज्ञान आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ज्याचा तू पराभव केलास तो तुझा वैरी खाण्डिक्य, ही आहे.
तेव्हा राजा म्हणाला “तर मग ते ज्ञान मिळावे म्हणून मी लगेच खाण्डिक्यापाशी जातो.
जर त्याने प्रायश्चित्ताचा विधी सांगितला तर माझा यज्ञ पूर्ण होईल, उलटपक्षी जर त्याने माझा वध केला तर मी ज्ञानोपासकांच्या गतीला जाईन.”
असे सांगून तो रथात बसून जिथे खाण्डिक्य होता तिथे गेला. त्याला येताना खाण्डिक्याने दुरून पाहिले. तेव्हा धनुष्यबाण सज्ज करून तो म्हणाला की, “तू इथेसुद्धा आम्हाला मारण्यासाठी आला आहेस काय? पण आज मात्र मी तुला जिवंत परत जाऊ देणार नाही. कारण तू माझा वैरी आहेस.”
केशिध्वजाने उत्तर दिले की, तो काही धार्मिक शंकांचे उत्तर मिळावे यासाठी आला असून खाण्डिक्याने ती शंका निवारण करावी अगर त्याचा जीव घ्यावा.
तेव्हा खाण्डिक्याने एका बाजूला जाऊन आपल्या सर्व लोकांबरोबर विचारविनिमय केला. सर्वांचे मत असेच पडले की, शत्रू आयता हाती सापडला असताना त्याला मारून राज्य पुन्हा हाती घ्यावे पण तो सल्ला काही त्याला पसंत पडला नाही म्हणून त्याने केशिध्वजाला जवळ बोलावला आणि त्याला शंका विचारली.
केशिध्वजाने गायीच्या हत्येची सर्व हकीकत सांगून प्रायश्चित्त विचारले. मग खाण्डिक्याने त्याला तो सर्व विधी समजावून सांगितला. नंतर राज हाही खाण्डिक्याची आज्ञा घेऊन परतून गेला आणि यज्ञ पूर्ण केला.
नंतर राजाला अचानक स्मरण झाले की, सर्व काही ठीक पार पडलेखरे! पण ज्याच्यामुळे यज्ञ पार पडला त्या खाण्डिक्याला गुरुदक्षिणा देण्याची राहूनच गेली; मग तो पुन्हा रथात बसून अरण्यात जाऊन खाण्डिक्याला भेटला आणि गुरुदक्षिणा मागून घेण्यासाठी विनंती केली.
तेव्हा खाण्डिक्याने आपल्या सहकाऱ्यांना त्यांचे मत विचारले असता, ते म्हणाले की, याचे राज्यच गुरुदक्षिणा म्हणून मागून घ्यावे. विनासायास राज्य मिळवण्याची ही उत्तम संधी दाराशी चालून आली असताना ती सोडून देऊ नये.
त्यावर खाण्डिक्य बोलला की, व्यावहारिक दृष्टीने पाहता त्यांनी योग्य सल्ला दिला आहे परंतु आत्महिताचा त्यात विचार केलेला नाही.
मग तो केशिध्वजाकडे वळून बोलला की, “जर तू मला खरोखरच इच्छित गुरुदक्षिणा देणार असलास तर एवढेच कर. तू परमार्थातील मोठा अधिकारी आहेस म्हणून मला असा काहीतरी उपाय सांग की, जो केल्याने दुःख व क्लेशांची संपूर्ण शांती होईल.”
तेव्हा केशिध्वजाने बोलण्यास आरंभ केला.”हे पहा! क्षत्रियांना राज्याहून जास्त प्रिय काहीही नसते. मग तू माझे राज्यच का बरे मागितले नाहीस?”
खाण्डिक्याने उत्तर दिले – “केशिध्वजा! ते कारणही तुला सांगतो, अरे राज्याची हाव मूर्खाला असते. क्षत्रियांचा धर्म म्हणजे प्रजेचे संरक्षण व पालन करणे आणि राज्याचे जे विरोधी असतील त्यांचा धर्मयुद्धात वध करणे हा आहे.
मी दुर्बळ असल्यामुळे तू माझे राज्य जिंकून घेतलेस पण त्यामुळे मी दोषी ठरत नाही. जरी राजाचे कर्तव्य हे अविद्या असले तरी जाणूनबुजून ते सोडले तर तो दोष ठरतो. एवढ्याचसाठी मी राज्य मागितले नाही; कारण मला कर्मचक्रात पुन्हा गुंतावयाचे नाही.”
असे खाण्डिक्याचे उत्तर ऐकून केशिध्वजाने त्याचे अभिनंदन केले. तो म्हणाला “मी जो राज्यकारभार करतो आणि अनेकानेक यज्ञ करतो त्याचे कारण एवढेच आहे की, मला अविद्या म्हणजेच प्रवृत्तीमार्गाने मृत्यूला जिंकावयाचे आहे. तू मात्र विवेकसंपन्न बनला आहेस म्हणून धन्य आहेस. आता अविद्येचे स्वरूप तुला स्पष्ट करून सांगतो.
श्रीविष्णु पुराण अंश-६ भाग-३( क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७
Shree Vishnu Puran Keshidhwaj Khandikya by Vijay Golesar