श्रीविष्णु पुराण
अंश-६ ( भाग-४)
केशिध्वजाने खाण्डिक्याला दिली
ब्रह्मयोगाची साधना!
केशिध्वज खाण्डिक्याला म्हणाला- “हे पहा! क्षत्रियांना राज्याहून जास्त प्रिय काहीही नसते. मग तू माझे राज्यच का बरे मागितले नाहीस?”
खाण्डिक्याने उत्तर दिले – “केशिध्वजा! ते कारणही तुला सांगतो, अरे राज्याची हाव मूर्खाला असते. क्षत्रियांचा धर्म म्हणजे प्रजेचे संरक्षण व पालन करणे आणि राज्याचे जे विरोधी असतील त्यांचा धर्मयुद्धात वध करणे हा आहे.
मी दुर्बळ असल्यामुळे तू माझे राज्य जिंकून घेतलेस पण त्यामुळे मी दोषी ठरत नाही. जरी राजाचे कर्तव्य हे अविद्या असले तरी जाणूनबुजून ते सोडले तर तो दोष ठरतो. एवढ्याचसाठी मी राज्य मागितले नाही; कारण मला कर्मचक्रात पुन्हा गुंतावयाचे नाही.”
खाण्डिक्याचे असे उत्तर ऐकून केशिध्वजाने त्याचे अभिनंदन केले. तो म्हणाला, “मी जो राज्यकारभार करतो आणि अनेकानेक यज्ञ करतो त्याचे कारण एवढेच आहे की, मला अविद्या म्हणजेच प्रवृत्तीमागनि मृत्यूला जिंकावयाचे आहे. तू मात्र विवेकसंपन्न बनला आहेस म्हणून धन्य आहेस. आता अविद्येचे स्वरूप तुला स्पष्ट करून सांगतो.
अविद्या दोन प्रकारची आहे. त्यातला पहिला प्रकार म्हणजे अनात्म गोष्टींना आत्मरूप मानणे व दूसरा प्रकार म्हणजे जे आपले नाही ते आपले समजणे. अज्ञानी जीव पाच भौतिक देहाविषयी ममत्व बाळगतो पण या पाच तत्वांहून आत्मा हा निराळा आहे तर मग शहाणा माणूस देहाला आत्मा मानील काय?
आणखी असे पाहा की, देह हा विनाशी आहे. तरीही प्रत्येकजण देहसुखाची साधने गोळा करून व नातलगांच्या ममतेने कर्मे करीत रहातो. पण देह काही आत्मा नव्हे म्हणून सर्व कर्म बंधनकारक (जन्म व मृत्यू यांस) होतात. माती व पाणी यांच्या मिश्रणातून जसे घर उभे राहते तसेच हा देह जड अन्न व पाणी यांनी पोसला जातो.
मग असे सांग की, यांत आत्म्याला काय मिळते? त्यामुळे जीव लाखो जन्म घेत प्रापंचिक भोग भोगीत वासनात गुंतला जातो. जेव्हा ज्ञानरूपी गरम पाण्याने ती वासनारूपी धूळ धुतली जाते तेव्हा मोह नाहीसा होऊन जिवाचे कष्ट संपतात.
मग त्याचे चित्त स्थिर होते व त्याला निर्वाणपद प्राप्त होते. निर्वाण हे आत्म्याचेच स्वरूप आहे. इतर जो खटाटोप आपण पाहतो तो सगळा उपद्व्याप प्रकृतीचा अर्थात शक्तीचा असतो. शक्तीमुळेच मूळचा अतिपवित्र असा आत्मा अहंकारी होऊन क्रियाशील बनतो परंतु तो खरोखर मूळचा निर्लिप्त आहे.
असे हे अविद्येचे बीज आहे. ते बीज व कर्मे नष्ट करण्यासाठी योग हाच एकमेव उपाय आहे. त्याखेरीज दुसरा कोणताही नाही.”
मग खाण्डिक्याने प्रश्न केला की “तू खरोखर योग्यांमध्ये श्रेष्ठ आहेस आणि निमिवंशातील एकमेव योगरहस्य तूच जाणतोस. तेव्हा योग म्हणजे काय? व तो कसा असतो? ते मला समजावून दे.”
त्यावर केशिध्वज सांगू लागला –
मनुष्याची बंधने व मुक्ती यांचे मूळ कारण त्याचे मन हेच आहे. विषयांचे चिंतन करीत राहिल्यामुळे ते बंधनकारक होते. तसेच जर मन निर्विषय बनले तर तेच मन मोक्षदायक होते म्हणून विवेकाने चित्ताला आवर घालून परमात्मचिंतन करीत जावे असे करीत गेल्यावर जसा एखादा लोहचुंबक लोखंडाला खेचून घेतो तसा परमेश्वर चिंतन करणाऱ्या मुनीला आकर्षून घेतो.
मनाची संपूर्ण गती ब्रह्माशी एकरूप होणे म्हणजेच योग होय. असा साधकच योगी असतो. जर दुर्दैवाने साधना करताना काही विघ्न ओढवले व देहान्त झाला तरी पुढच्या जन्मात तीच साधना करून तो मुक्त होतो. मात्र त्याने यम-नियमांचे पालन केले पाहिजे.
त्यासाठी प्रथम आसन सिद्ध करून मग पुढची साधना करावी. प्रथम प्राणवायूवर ताबा मिळविणे म्हणजेच ‘प्राणायाम’ होय. तो सबीज व निर्बीज अशा दोन्ही प्रकारचा असतो. त्यामुळे इंद्रिये वश होतात, तो ताब्यात आल्याशिवाय पुढे प्रगती होत नसते. नंतर चित्ताला शुभ आश्रयात स्थिर करावे.”
त्यावर खाण्डिक्याने विचारले की, चित्ताचा शुभ आश्रय कोणता?
केशिध्वजाने उत्तर दिले की ‘ब्रह्म’ हा चित्ताचा शुभ आश्रय आहे. तो सविकारी व अविकारी अशा दोन्ही तऱ्हेचा आहे. जोवर कर्माचा पूर्णपणे निचरा होत नाही तोवर ब्रह्म आणि सृष्टी यांच्यात भेदभाव दिसणारच. जेव्हा भेदभाव समूळ गळून पडतो तेव्हा मूळच्या सत्ताधारी ब्रह्माचा अनुभव येतो. ते परमात्मा विष्णूचे खरे रूप आहे. तसा तो खरोखरी रूपहीनच आहे.
पण हा सुरुवातीला त्या शुद्ध अवस्थेचे चिंतन करता येत नाही. म्हणून आरंभी श्रीहरिच्या स्थूल रूपाचे चिंतन करीत जावे. हिरण्यगर्भ, वासुदेव, प्रजापती, मरुद्रण, वसू, अकरा रूद्र, बारा आदित्य, तारे, ग्रहमंडळ, गंधर्व, यक्ष, राक्षस, दैत्य, दानव, मानव, पशुपक्षी, यांच्यासहीत पर्वत, समुद्र, नद्या, वृक्षवेली, अशी संपूर्ण जीवसष्ठी, पंचतन्मात्रा, पंचमहाभूते अशी सजीव आणि निर्जीव चराचर सृष्टी हे सर्वच त्या परमात्म्याचे अवयव आहेत अशी धारणा करावी, हे ब्रह्मांड भगवान विष्णूचे साकार रूप आहे.
विष्णूजी जी एक शक्ती आहे ती ‘परमाया’ आहे. तशीच आणखी एक शक्ती ‘अपरा माया’ ती ‘क्षेत्रज्ञ’ नावाची असून कर्म नावाची तिसरी शक्ती ‘अविद्या’ आहे. तिने क्षेत्रज्ञ शक्तीला झाकून ठेवली आहे पण खरे पाहिले तर तीच या प्रपंचाला मूळ कारणीभूत आहे. तिचा प्रभाव जड वस्तूत अल्प प्रमाणात असतो.
नंतर एकापेक्षा एक असा तो प्रभाव वृक्ष, पर्वत, सर्प, पक्षी यांच्यात अधिक प्रमाणात आढळतो. पुढे जनावरे, मानवजात, नाग, गंधर्च, यश वगैरे देवयोनीमध्ये वाढता असतो. इंद्रामध्ये तो जास्त असून त्याच्यापेक्षा जास्त प्रजापतीमध्ये व सर्वांत जास्त हिरण्यगर्भात आहे. अशाप्रकारे सर्व काही परमेश्वराचेच रूप आहे.
आता ब्रह्माचे आणखी एक ‘विष्णू’ नावाचे निराकार रूप (अवस्था) आहे. योगी त्याचेच ध्यान करतात. ज्ञानी त्याला ‘सत्’ असे म्हणतात, त्यामध्ये सर्व शक्ती सामावलेल्या असून ते रूप विश्वरूपाहून गूढ आहे. ते सर्व विश्वाची उभारणी करते. आत्मशुद्धी व्हावी यासाठी साधकांनी त्याचे चिंतन करीत जावे. त्यामुळे साधकाची सर्व प्रकारची पापे नाहीशी होतात.
भगवान श्रीविष्णू हा तीन भावनांहून अलिप्त असून तोच शुद्ध असा चित्ताला आधार आहे. इतर सर्व आधार हे अशुद्ध आहेत. चित्त कोणत्या ना कोणत्या आधाराने स्थिर करणे म्हणजेच ‘धारणा’ होय. धारणा ही आधाराविना साधत नसते म्हणून भगवंताचे ध्यान कसे करावे ते ऐक
त्या भगवंताचे नेत्र कमळाच्या पाकळीसारखे असून गाल व मस्तक सुशोभित आहे. कानात मकरकुंडले आहेत. मान शंखाकृती आहे. छातीवर वत्सलांच्छन चिन्ह आहे. नाभी गंभीर असून पोटावर तीन वलये आहेत. चार किंवा आठ हात असून तो समचरण आहे. पावले अति सुकुमार आहेत. कमरेला पीतांबर आहे.
सर्व प्रकारची आभूषणे व शस्त्रे यांनी युक्त असा तो आहे. असे ध्यान करण्याचा सतत सराव करीत जावा, असे रूप चित्तात अखंडपणे स्थिर झाले की, धारणा सिद्ध झाली असे समजावे.
त्यानंतर त्याच्या आभूषणे व शस्त्रे नसलेल्या शांत स्वरूपाचे चिंतन करावे. ते साधले की, मग त्या साकार रूपामागच्या निराकाराचे ध्यान करावे.
हे खाण्डिक्या! तुला मी योगमार्गाचे सविस्तर विवरण करून सांगितले आहे. आता तुझ्यासाठी मी अजून काय करावे ते सांग.’
त्यावर खाण्डिक्य म्हणाला “अरे! तू माझे फार मोठे कार्य केले आहेस. आता तू परत माघारी जाऊ शकतोस.
पराशर म्हणाले – “मुनिवर्य! नंतर त्या खाण्डिक्याने केशिध्वजाची गुरुभावनेने पूजा केली. राजा निघून गेल्यानंतर खाण्डिक्याने आपला सर्व परिवार पुत्राच्या हाती सोपविला आणि योगसाधनेसाठी दूर अत्यंत निबिड ठिकाणी तो निघून गेला. तिथे तो साधना करून परम गतीस गेला.
तिकडे केशिध्वजाने कर्मयोगाचे आचरण करीत राहून त्रितापांतून मुक्ती देणारी सिद्धी मिळविली.”
श्रीविष्णु पुराण अंश-६ भाग-४ (क्रमश:)
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७
Shree Vishnu Puran Keshidhwaj Khandikya Brahmayog by Vijay Golesar