अधिक मास विशेष लेखमाला
श्री विष्णु पुराण कथासार (अंश-१ भाग -२)
वराह अवतार व सृष्टीची पुनर्निर्मिती
जुन्या वैदिक वाङ्मयातून पुराण हा शब्द इतिहास अशा अर्थाने आलेला आहे. गौतमशास्त्रामध्ये पुराणांना धर्मशास्त्रीय ग्रंथ असे म्हटले आहे. महाभारत व पुराणात पुराणांची मुख्य अशी पाच लक्षणे सांगितली आहेत. ती अशी – १) सर्ग अर्थात सृष्टीची निर्मिती, २) प्रतिसर्ग अर्थात प्रत्येक प्रलयानंतरची पुननिर्मिती, ३) वंश अर्थात घराण्यांच्या परंपरा, ४) मन्वंतर म्हणजे मनू व त्यांचा विस्तार आणि ५) वंशानुचरित म्हणजे राजांची चरित्रे. यांतील पहिल्या अंशात सृष्टीची, देवांची आणि राक्षसांची उत्पत्ती कथन केली आहे शिवाय समुद्राचे मंथन केल्याची कथा आहे. आज आपण श्री विष्णु पुराण कथासार अंश-१ भाग -२ मध्ये पराशर मुनीनी सांगितलेली वराह अवतार आणि सृष्टीची पुनर्निर्मितिची कथा जाणून घेणार आहोत.
मैत्रेयांनी पराशर मुनींना विचारले की “प्रभू! या वाराह कल्पात सृष्टीची निर्मिती कोणत्या क्रमाने झाली?” तेव्हा पराशर मुनी सांगू लागले. ” ब्रह्मदेवाला (नारायणाला) जेव्हा झोपेमधून जाग आली तेव्हा त्याला सर्वत्र शून्ऱ्यावस्था दिसली. ‘नार’ अर्थात पाणी आणि ‘अयन’ म्हणजे निवासस्थान होय. म्हणूनच भगवंताला ‘नारायण’ (नार+अनय) असे म्हणतात तोच या त्रैलोक्याचा आदि व अत आहे. जागा होताक्षणी त्याला असे दिसले की, जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी आहे. पाण्याशिवाय काहीच नाही. मग त्याने जाणले की, पृथ्वी पाण्यात बुडालेली आहे.
तेव्हा त्याने पूर्वी जसे मत्स्य, कासव असे रूप घेतले होते तसे या वेळीही एका महावराहाचे रूप घेतले आणि त्या पाण्यात बुडी मारली. तो पाताळ लोकापाशी पोहोचला तेव्हा त्याला पहाताच पृथ्वीला फार आनंद झाला आणि ती नम्र होऊन भक्तीने त्याची स्तुती गाऊ लागली.
त्याला वारंवार नमस्कार करून अनेक प्रकारे त्याची स्तुती करून शेवटी तिने आपला उद्धार करण्याची विनवणी केली; मग त्या वराहाने सर्व आसमंताला दणाणून टाकणारी प्रचंड गर्जना केली आणि पृथ्वीला आपल्या मोठमोठ्या सुळ्यांवर उचलून घेऊन तो वेगाने पाण्यातून उसळी मारून पाण्यावर आला. त्याच्या त्या अतिप्रचंड वेगाने पाणी जनलोकांपर्यंत उसळले आणि तिथल्या सिद्धमहात्म्यांना त्या पाण्याने भिजवून काढले. तेव्हा त्या लोकांची फार धावपळ झाली.
तरी तशाही परिस्थितीत ते, महावराहाने शांत व्हावे म्हणून त्याची स्तुती करू लागले. ती स्तुती ऐकून प्रसन्न झालेल्या वराहस्वरूपी नारायणाने पृथ्वी अलगदपणे पाण्यावर ठेवून दिली. एखाद्या जहाजासारखी ती पाण्यावर तरंगत राहिली नंतर भगवंताने तिला समतल केली. पूर्वीसारखे तिच्यावर पुन्हा पर्वत रचले. सात बेटे (द्वीपकल्प) रचली. भूलोक (पृथ्वी), भुवर्लोक, स्वर्गलोक व महर्लोक असे एकाहून एक सूक्ष्म असे चार लोक निर्माण केले. नंतर रजोगुणांच्या योगाने आपल्याच एका अंशाने चार मुखांचे ब्रह्मदेवाचे रूप घेऊन संपूर्ण सृष्टीची पुन्हा उभारणी केली. हे सर्व करणारा तो (नारायण) फक्त प्रेरक आहे. प्रत्यक्ष कार्य घडते ते त्यांच्या अगणित अशा शक्तींकडून असे समजून घ्या. अहो महाबुद्धिमान मैत्रेय महाराज! प्रत्येक वस्तूच्या निर्मितीमागे मुख्य गोष्ट कारण व हेतू या दोनच असतात. बाकी सर्व घडामोडी या शक्तींकडून निसर्गक्रमानुसार योग्य वेळी आपोआप होत असतात.
सूक्ष्म व स्थूल सृष्टीची उभारणी
त्यावर मैत्रेयांनी पराशर मुनींना विनंती केली की, त्यांना या सृष्टीची निर्मिती क्रमवार कसकशी होत गेली ते सर्व ऐकावयाचे आहे, तरी ते सांगावे.
पराशर सांगू लागले – “आदिपुरुषाने या सृष्टीची रचना नऊ सर्गात केलेली आहे. पहिल्या प्रथम सर्व तमोगुण प्रधान गोष्टी उत्पन्न केल्या.त्यांत तम, मोह, महामोह, तमिस्त्र, व अंधतमित्र हे गुण निर्माण झाले. त्यांच्यातून वनस्पती, पर्वत वगैरे गोष्टी बनल्या परंतु त्यांच्यात जाणीव फार अल्प प्रमाणात होती. त्यामुळे त्या सर्व अचल होत्या.
असे पाहून मग त्याने आणखी एक सर्ग बनविला. त्या सर्गात तिर्यक् योनी अर्थात पशुपक्षी वगैरे जीव उत्पन्न झाले. तरीही त्यांच्यातही जाणिवेचा विकास मर्यादित होता. तेव्हा पुन्हा त्याने सात्त्विक सर्ग उत्पन्न केला. त्याचे नाव ‘देवसर्ग’ आहे. त्यांतील प्राणी भोगेच्छा असणारे असून त्यांच्यात जाणिवेचा विकास बऱ्यापैकी होता परंतु त्यांना कर्मस्वातंत्र्य नव्हते.
मग त्याने सत्त्व, रज व तम या तीन गुणांनी युक्त असा मनुष्यांचा सर्ग बनविला. एवढ्यापर्यंत प्रारंभापासून सात सर्ग झाले, ते असे – १. महतत्त्व, २. भूत सर्ग (पंच तन्मात्रा), ३. प्राकृत (वैकारिक सर्ग), ४. मुख्य सर्ग (वृक्षवेली, पर्वत), ५. तिर्यक् (पशुपक्षी), ६. देवसर्ग व ७. अवकि सर्ग (मानव जात).
याशिवाय आठवा अनुग्रह सर्ग (सत्त्वगुण आणि तमोगुणप्रधान) व नववा कौमारसर्ग (प्राकृत आणि वैकृत) असे हे नऊ प्रकारचे सर्ग आहेत.”
पराशर पुढे म्हणाले “सर्व जीव आपापल्या शुभाशुभ कर्मांनी जखडलेले असतात. प्रलयकाळी सर्व सृष्टी जरी लयाला गेली तरी कर्मसंस्कार उरतात. पुन्हा सृष्टी निर्माण होताना या संस्कारांनुसार उत्पत्ती होत जाते. ही त्या ब्रह्मदेवाची ‘संकल्पसृष्टी’ आहे.
पुढे त्याने स्वतःच्या शरीरातून विविध निर्मिती केली. ती अशी मांड्यांपासून राक्षस, मुखापासून देव, पाठीतून पितर, रजोगुणापासून मानव, रजोगुणातून भूक, कामेच्छा आणि यक्ष व राक्षस, मस्तकावरील केसांपासून सर्प, मधुर आवाजापासून गंधर्व आणि छातीपासून जनावरे उत्पन्न केली.
अंगावरच्या रोमावलीतून वनस्पती उत्पन्न केल्या. पुढे आपल्या चार मुखातून अनुक्रमाने गायत्री व ऋग्वेद, २ यजुर्वेद, ३ सामवेद व ४ अथर्ववेद यांना प्रकट केले.
मैत्रेय मुनी! अशातऱ्हेने ब्रह्मदेवाने स्वतःच्या शरीरापासून चारी खाणी व चारी बाणींनी युक्त अशी ही चराचर सृष्टी या कल्पाच्या आरंभी निर्माण केली. या सर्वांना आधार पूर्वीच्या कल्पांमधील कर्माकर्माच्या पूर्वसंस्कारांचा असतो. त्यानुसार प्रत्येक जीवाची प्रवृत्ती घडत जाते. त्यांत हिंसा-अहिंसा, प्रेम-द्वेष, मृदुता-कठोरता, धर्म-अधर्म, सत्य- मिथ्या अशा गोष्टींकडे त्या त्या जीवाची स्वाभाविक ओढ असते.
अशाप्रकारे भेदाभेदयुक्त जग व त्याचे व्यवहार यांची निर्मिती भगवंताने त्यांच्या नामरूपासह कल्पाच्या सुरुवातीलाच निश्चित केलेली आहे. अशाप्रकारे हे जग वारंवार निर्माण होत असते, असे ध्यानी घ्या.”
सृष्टिची रचना आणि अन्नोत्पादन
मैत्रेय पुनः विचारते झाले – “हे गुरुदेव! मला सृष्टीची रचना कृपा करून अधिक विस्तारपूर्वक सांगावी.”
पराशर म्हणाले “बरे तर मग! तसेच वर्णन करतो. आरंभी ब्रह्मदेवाच्या मुखापासून सत्त्वगुणयुक्त प्रजा निर्माण झाली; मग त्याच्या छातीपासून रजोगुणी व तमोगुणी प्राणी जन्मले. अर्थात मुखापासून ब्राह्मण, छातीपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून क्षूद्र उत्पन्न झाले. ही व्यवस्था यज्ञकर्मे चालत रहावीत एवढ्याचसाठी केली गेली.
यज्ञामुळे देवगण तृप्त होऊन व जलवर्षाव करून प्रजेलाही तृप्त करतात. म्हणजेच यज्ञ हा सर्वांसाठी कल्याणकारी आहे. चारित्र्यवान व्यक्तीच यज्ञाचे यथार्थ अनुष्ठान करू शकतात. सत्ययुगात ही प्रजा स्वकर्मनिष्ठ व धर्मनिष्ठ असल्यामुळे पवित्र चित्ताने युक्त होती आणि म्हणून ते नित्य विष्णूच्या सान्निध्याचा अनुभव घेत असत.
पुढे मग त्रेतायुगात काळाच्या प्रभावामुळे प्रजा पापकृत्यांसाठी प्रवृत्त होत जाते, विकार वाढत जातात आणि प्रजा व परमात्मा दुरावत जातात. असे झाले तेव्हा ब्रह्मदेवाने पृथ्वीवर वाळवटे, पहाड, पाण्याची स्थाने, उंचसखल भागांची निर्मिती केली. माणसे घरे बांधून राहायला लागली मग मनुष्याने शेती, धान्योत्पादन, औषधे, वस्त्रे, वगैरे गोष्टी आत्मसात केल्या.
तेव्हापासून समाजातील लोक परस्परांना सहकार्य करीत जीवन जगू लागले तथापि नित्य यज्ञाचे अनुष्ठान हे सर्व दोषांचे निर्मूलन करणारे आहे. काळाच्या प्रभावामुळे दुर्बुद्धी उत्पन्न होते व त्यामुळे असे पापी लोक यज्ञ न करता उलट वेदविहित मार्गाची निंदा करीत सुटतात. असो!
तर सर्व प्राणी व त्यांच्या निर्वाहाची व्यवस्था जेव्हा लावून झाली तेव्हा प्रजापतीने चार वर्ण निर्माण केले व त्यांची कर्तव्ये ठरवून दिली. जे कर्मनिष्ठ ब्राह्मण असतील त्यांच्यासाठी पितृलोक, युद्धात मागे न हटणाऱ्या क्षत्रियांसाठी इंद्रलोक, कर्तव्यपालन करणाऱ्या वैश्यांना वायुलोक आणि सेवाधर्म पाळणाऱ्या शूद्रांना गंधर्वलोक अशी स्थाने वाटून दिली.
उर्ध्वरेता ८८००० मुनी व गुरुगृहनिवासी ब्रह्मचारी यांना एकच गती आहे. गृहस्थ लोकांना पितृलोक, वानप्रस्थी लोकांना सप्तर्षी लोक, संन्याशांसाठी ब्रह्मलोक आणि योग्यांसाठी आत्यंतिक मोक्ष अशी विभागणी आहे. ते स्थान मात्र फक्त योगीच पाहू शकतात. यां सृष्टीत चंद्र-सूर्यासह सर्वांना पुनरावृत्ती (वारंवार येणेजाणे) आहे. मात्र ॐ नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षरी मंत्राचे जे चिंतन करणारे आहेत त्यांना पुनरावृत्ती नाही.
एकाहून एक भयानक असे जे ८४ लक्ष नरक निर्माण केलेले आहेत, ते अशा लोकांसाठी आहेत की, जे वेदमार्गाची निंदा करतात, यज्ञांमध्ये विघ्ने आणतात, तसेच आपल्या विहित धर्माचा त्याग करून स्वैराचाराने वागतात!
सृष्टीचा आणखी विस्तार
त्यानंतर प्रजापतीने पुन्हा ध्यान केले असता त्याच्या देहापासून सर्वत्र प्रजा उत्पन्न झाली परंतु त्या प्रजेची वाढ काही होईना; मग त्याने नऊ मानसपुत्र उत्पन्न केले. त्यांची नावे भृगु, पुलस्ती, पुलह, ऋतू, अंगिरा, मरीचि, दक्ष, अत्रि व वसिष्ठ अशी आहेत.
प्रजापतीने पुन्हा नऊ कन्या उत्पन्न केल्या. त्यांची नावे ख्याति, भूति, संभूति, क्षमा, प्रीती, सन्नति, ऊर्जा, अनसूया व प्रसूति अशी असून त्यांचे विवाह मानसपुत्रांशी लावून दिले; मग तिथून पुढे नर-नारी देहसंबंधातून प्रजोत्पत्ती होऊ लागली व सृष्टी वाढत चालली परंतु ब्रह्मदेवाचे अगोदरचे पुत्र सनक, सनंदन, सनत्कुमार व सनातन असे जे होते ते परम विरक्त असल्यामुळे ते प्रपंचात गुंतले नाहीत.
असे पाहून ब्रह्मदेवाला क्रोध आला व त्यातून सूर्याप्रमाणे तेजस्वी असा रुद्र जन्मला. तो अर्धा पुरुष व अर्धा स्त्री होता. तेव्हा ब्रह्माने आज्ञा केली की, देहाचे दोन स्वतंत्र भाग कर. तेव्हा रुद्राने स्त्री व पुरुष असे दोन देह केले. त्यापैकी नरदेहाचे पुन्हा अकरा विभाग केले व स्त्री देहाचे उग्र,सौम्य, गौर, श्यामा असे कितीतरी भाग केले.
त्यानंतर ब्रह्मदेवाने प्रजेचे पालन व्हावे या हेतूने प्रथम ‘स्वायंभुव’ निर्माण केला. त्याचा विवाह शतरूपा नावाच्या स्त्रीशी झाला. त्यांना प्रियव्रत आणि उत्तानपाद असे दोन मुलगे झाले. त्याचप्रमाणे प्रसूति व आकूति अशा दोन कन्या झाल्या. प्रसूतिचा विवाह दक्ष याच्याशी आणि आकृतिचा विवाह रुचिबरोबर झाला. रुचि व आकृति यांना यज्ञ व दक्षिणा अशी जुळी मुले झाली. त्यांना बारा मुलगे झाले ते याम नावाचे देव झाले.
दक्ष व प्रसूति यांना चोवीस कन्या झाल्या. त्यांतील तेरा जणींचा विवाह धर्माशी झाला व बाकी अकरा जणींचे विवाह पुढीलप्रमाणे झाले – ख्याति व भृगू, सती-शिव, संभूति-मरीचि, स्मृति अंगिरा, प्रीति पुलस्त्य, क्षमा-पुलह, संनति-ऋतू, अनसूया-अत्रि, ऊर्जा-वसिष्ठ, स्वाहा-अग्नि व स्वधा-पितर.
पुढे या जोडप्यांपासून संतती उत्पन्न होत गेली. त्यात काम, दर्प, नियम, संतोष, लोभ, श्रुत, दंड, नय, विनय, बोध, व्यवसाय, क्षेम, सुख व यश ही आहे. याशिवाय अधर्म व हिंसा यांना अनृत व निकृति ही दोन मुले व त्यांना भय आणि नरक अशी संतती झाली. पुढे व्याधि, जरा, शोक, तृष्णा, क्रोध असा त्यांचा विस्तार होत गेला. हे मुनिवर्य! जगताचे व्यवहार ‘दक्ष’ बगैरे जे प्रजापती आहेत ते चालवीत असतात. मनू व त्यांच्या वंशातील राजे हे जगताची नित्य स्थिती कायम ठेवतात.
प्रलय एकंदरीत चार आहेत. ते असे- १. नैमित्तिक, २. प्राकृतिक, ३. आत्यंतिक व ४. नित्य यांपैकी नैमित्तिक प्रलय होतो तेव्हा ब्रह्मदेव झोपी जातो. प्राकृतिक प्रलयांत ब्रह्मांड प्रकृतीमध्ये विलीन होते. जेव्हा योगी ज्ञानमार्गाने परमात्म्यात विरून जातो, तो आत्यंतिक प्रलय असतो व क्षणोक्षणी जी झीज होत असते तो नित्यप्रलय असे जाणा, अशा तऱ्हेने श्रीविष्णू सर्वांच्या देहात राहून आपल्या वैष्णवी शक्तीच्या योगाने जगाची घडामोड करीत असतो. जो या शक्तीला ओलांडून जातो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो.
(श्री विष्णु पुराण कथासार क्रमश:)
सादरकर्ते : विजय गोळेसर (मोबा. ९४२२७६५२२७)