श्रीविष्णु पुराण
अंश-६ ( भाग-१)
असे असेल कलियुग!
श्रीविष्णु पुराणच्या मागच्या अंशात आपण भगवान श्रीकृष्णाचे चरित्र पहिले. आज पासून श्रीविष्णु पुराणाचा शेवटचा ६ वा अंश सुरु होतो आहे.
मैत्रेयांनी विचारले “महाराज आता मला कल्पान्ताच्या वेळी जो महालय होतो त्याचे साग्रसंगीत वर्णन करून सांगा.”
पराशर सांगू लागले – “तो संहार कसा असतो तेही ऐका. मानवांच्या एक महिना एवढी पितरांची एक दिवसरात्र असते. माणसांच्या (भूलोकांतील) एका वर्षाची एवढी देवांची एक दिवसरात्र असते. चार युगांची एक चौकडी व अशा दोन हजार चौकड्या म्हणजे ब्रह्मदेवाची एक दिवसरात्र होते. सत्य, त्रेता, द्वापार व कली या चारही युगांची एकूण काळ बारा हजार दिव्य (देवांची) वर्षे एवढा असतो.”
यांतील अगदी प्रारंभीचे कृतयुग आणि अंतिम प्रलयाच्या वेळचे कलियुग वगळता इतर सर्व युगांचे स्वरूप सारखेच असते.”
मैत्रेयांनी पुन्हा प्रश्न केला की, कलियुगांत धर्म शिल्लक उरत नाही. तर त्याचे वर्णन करावे.
पराशर म्हणाले – त्या कलीच्या स्वरूपाचे वर्णन मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. कलियुगांत मानवाचा स्वभाव धार्मिक नसतो. प्रत्येककर्म हे विधिनुसार न करता मनास मानेल तसे केले जाते.
कलियुगात जो बलवान असतो तोच सर्वत्र सत्ता बळकावून सप्ताधारी बनतो. त्याच्या कुळाच्या शुद्धतेची जरुरी नसते. तो कोणत्याही जातीची स्त्री विवाह करून घेतो. त्या वेळचे ब्राह्मण देखील यथातथा ‘दीक्षित’ बनतील आणि मनाच्या इच्छेनुसार विधिविधाने व धर्मकार्ये करतील. जो तो त्याला वाटेल तसा उपदेश करील व तेच शास्त्र म्हणून सर्वमान्य होईल.
भुतेखेते, स्मशानसंचारी अघोरी प्रेते यांची पूजा केली जाईल. धार्मिक आचार हे मनाला पटतील तसे करण्यात येतील.
कलियुगात जरासे द्रव्य मिळताच माणूस गर्वाने फुगून जाईल. स्त्रियांची केशभूषा ही महत्त्वाची ठरेल कारण अलंकार व भूषणे ही दुर्लभ होतील. दरिद्री नवऱ्याला सोडून स्त्रिया पैसेवाल्यांच्या नादी लागतील. माणूस जर चारित्र्यहीन असूनही धनसंपन्न असेल तर लोक त्याचेच नेतृत्व स्वीकारतील.
कलीमध्ये सर्वसाधारण माणसाचे सर्व आयुष्य नित्य गरजा भागविण्यातच खर्ची पडेल. बुद्धिमत्ता त्यातच गुंतून पडेल आणि सर्व संपत्ती उपभोग घेण्यामध्येच संपविली जाईल.
देखण्या पुरुषावर भाळून स्त्रिया स्वैराचारिणी बनतील, तसेच पुरुषही धन मिळवण्यासाठी वैध व अवैध मार्गाची पर्वा करणार नाहीत. गरजवंत अशा आप्ताने मदतीची याचना केली तरी कुणी एक छदामही देणार नाही. या युगात शूद्र ब्राह्मणांशी बरोबरी करू जातील आणि दुधाळ असे तोवर पशूंचे (गायी, म्हशी वगैरे) पालन करतील.
उपासमारीच्या भयाने जनता प्राण कंठाशी आणून पावसाची वाट पहात बसेल. अन्नाच्या अभावी कितीतरी भूकबळी पडतील. या युगात सुखसमाधान कुठेच दृष्टीस पडणार नाही. स्नान, भोजन, देवधर्म, पितृकार्य यांबाबतीत कसलाच निर्बंध नसेल.
या युगामध्ये स्त्रिया विषयलोलूप, ठेंगू बांध्याच्या, अन्नासाठी वखवखलेल्या असतील. त्या पुष्कळ संतती जन्मास घालतील. तशाच दुर्भागी असतील. त्या पतीला आणि वडिलधाऱ्यांना जुमानणार नाहीत. त्या आपमतलबी बोलण्यात पटाईत असतील. उत्तम कुळातील असल्या तरी चंगीभंगी पुरुषावर भाळतील व त्याच्या नादाला लागतील.
ब्रह्मचारी विद्यार्थी, प्रांपचिक लोक, वानप्रस्थाश्रमी व संन्यासी हे आश्रमधर्म पाळणार नाहीत.
कलियुगातील राजे (सरकार) आपल्या प्रजेचा सांभाळ न करता उलट प्रजेलाच लुटतील. जो धन व दौलत यांनी समृद्ध असेल तोच सत्ताधीश बनेल आणि शक्तिहीन गुलाम बनतील, वैश्यलोक व्यापार उदीम करण्याचे सोडून शूद्रांचे व्यवसाय पत्करतील. शूद्र संन्यासी बनतील व पाखंड पसरवतील. प्रजानन दुर्भिक्ष्य व सरकारचे कर यांना कंटाळून दुःखाने देश सोडून निघून जातील.
वेदमार्गाचा लोप होऊन पाखंडमताचा फैलाव होऊन अधर्म बोकाळेल आणि त्याचा परिणाम म्हणून प्रजा अल्पायुषी होईल. अपघाती बालमृत्यू व अकालमृत्यू यांचे प्रमाण वाढत जाईल.
पुढे पुढे ५-७ अथवा ९ वर्षांची मुलगी आणि ८-९ किंवा १० वर्षांचा मुलगा हे संतानोत्पत्ती करतील. वयाच्या १२व्या वर्षापासून केस पिकू लागतील आणि सरासरी जीवनमान २० वर्षांएवढे राहील. लोक बुद्धिहीन, बाह्य दिखाऊपणा करणारे परंतु मनाने मात्र कपटी असतील.
मैत्रेय महाराज! जेव्हा धर्माचा -हास झालेला दिसेल, पाखंडीपणा सर्वत्र बोकाळेल, सत्पुरुष कुठेच आढळणार नाहीत तेव्हा कलियुग आहे असे जाणावे. जेव्हा सज्जन व धार्मिक व्यक्ती अपयशी ठरतील, याज्ञिक व विद्वान यज्ञ, उपासना सोडून देतील आणि वेदचर्चेमध्ये निव्वळ उखाळ्या पाखाळ्या काढतील तेव्हा तो कलीचा प्रभाव आहे असे ओळखावे.
तेव्हा असे होईल की, जगाच्या उत्पन्नकर्त्याला कुणी मानणार नाहीत. उलट, लोक धर्ममार्गाची, देवांची, विप्रांची निंदाच करतील.
त्या समयी पावासचे प्रमाण अत्यल्प असेल. त्या कारणाने अन्नधान्य फार कमी पिकेल. फळे निःसत्त्व निपजतील. केवळ शोभेच्या वनस्पतींची लागवड केली जाईल. धान्यात कस असणार नाही. बकरीच्या दुधाचा वापर होऊ लागेल, वर्णसंकर होईल.
पुरुषाला सासू व सासरा हेच आदरणीय ठरतील. पत्नी व तिच्या माहेरचा गोतावळा हेच आप्त बनतील. लोक माय-बापाची किंमत ठेवणार नाहीत. उलट ‘जो तो कर्माप्रमाणे फळे भोगतो’ असे सांगून सुटका करून घेतील. ते वारंवार दुष्कर्मे करतील आणि परिणामतः दुःखे भोगतील,
परंतु कलीचे एक विशेष महत्त्व आहे. ते असे की, सत्ययुगात वगैरे फार कष्टाने तपश्चर्या करून जी सिद्धी मिळत असे ती या युगात अत्यंत अल्प अशा सदाचरणामुळे प्राप्त होते. “
स्त्रिया व शुद्र यांना श्रेष्ठत्व देणारे कलियुग!
पराशर म्हणतात “व्यासमहर्षीनी असे सांगून ठेवले आहे की केव्हातरी एकदा मुनिजनांच्या सभेत अशी चर्चा झाली की, कोणत्या काळी अल्प प्रयत्नांमुळे मोठा पुण्यलाभ होईल? आणि ते अल्प प्रयत्न कुणाला जमू शकतील?”
बऱ्याच उहापोहानंतर ते सगळे अंतिम निर्णय नक्की करण्यासाठी म्हणून व्यास महर्षीच्या आश्रमात गेले. तेव्हा व्यास आंघोळीसाठी गंगेवर गेले होते. म्हणून ते सगळेजण नदीच्या किनाऱ्यावर व्यासांची आंघोळ आटोपण्याची वाट पाहत बसले.
त्यावेळी पाण्यातून डोके वर काढून व्यास बोलले की, कलियुग हेच सर्वश्रेष्ठ आहे; मग पुन्हा पाण्यात डुबकी दिली व मान वर करून बोलले की त्यातसुद्धा शूद्र हे श्रेष्ठ आहेत नंतर पुन्हा पाण्यात डुबकी घेऊन आणि मान वर करून तिसऱ्यांदा बोलले की, खरोखर स्त्रिया धन्य आहेत. त्यांच्याखेरीज कुणीच धन्य नाही. “
नंतर व्यास आंघोळ आटोपून व आन्हिक पूर्ण करून येऊन आसनावर विराजमान झाले. त्या वेळी सर्व मुनिलोक आले आणि त्यांना वंदन करून बसले. तेव्हा व्यासमुनींनी त्यांना आगमनाचा हेतू विचारला असतां ते म्हणाले-
“आम्ही काही शंका निरससन करून घेण्यासाठी आलो आहोत. पण तत्पूर्वी एका गोष्टीचा खुलासा करावा अशी विनंती आहे. ती गोष्ट अशी की,
तुम्ही स्नानकरते वेळी म्हणाला होता की, कलियुग श्रेष्ठ आहे.त्यातही शुद्र हे श्रेष्ठ आहेत. त्या सर्वांपेक्षा स्त्रियाच खरोखर धन्य आहेत. आम्हाला यातील रहस्य जाणण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. तेव्हा कृपा करून त्याचा उलगडा करा. नंतर आमच्या शंका आम्ही विचारु.
असे ऐकल्यावर व्यासांनी स्मित हास्य केले व ते सांगू लागले
“अहो विप्रगण हो! मी जे कलियुग श्रेष्ठ आहे असे म्हणालो त्यामागचे कारण असे की, सत्ययुगातील दहा वर्षाच्या तपश्येने जे फळ मिळते, तेच फळात एकाच वर्षाच्या साधनेतून, द्वापारयुगात एका महिन्याच्या साधनेतून आणि कलियुगात एकाच दिवस व रात्रीच्या साधनेतून प्राप्त होते.
आणखी असे की, जे फळ सत्ययुगात ध्यानधारणा केल्याने प्राप्त होते. तेच त्रेतायुगात मोठमोठी अनुष्ठाने व यज्ञ करून मिळते. द्वापारात पूजन व अर्चन करून तेच फळ मिळते. तर कलीमध्ये केवळ नामसंकीर्तन केल्याने तेच फळ मिळत असते. कलियुगात थोड्याच कष्टांतून मोठे इच्छित प्राप्त होते. म्हणून मला कलियुग प्रिय आहे.
आता रुद्रांविषयी सांगतो –
ब्राह्मणांना धार्मिक निर्बंध फार आहेत. त्यामध्ये आधी ब्रह्मचर्य व्रत, वेदाध्ययन, नंतर स्वधर्मानुसार उपजीविका चालविणे हे मुख्य निर्बंध ! त्याशिवाय व्यर्थ उपदेश न करणे, आहारशुद्धी व कर्मशुद्धी जर नसेल तर ते भ्रष्ट होतात, म्हणून त्यांना फार जागरूक रहावे लागते.
साधे खाणेपिणे सुद्धा नियमित ठेवावे लागते. तसे ते जीवनात सर्वच बाबतीत परतंत्र असून अत्यंत खडतर नियम पाळून राहतात तेव्हा कुठे त्यांना अंती दिव्यलोक प्राप्त होतो.
परंतु अशा ब्राह्मणांची फक्त जिवाभावाने सेवा सुश्रूषा केली तरी शूद्राला तीच गती लाभते, शिवाय शूद्रांना आचाराचे फारसे नियमही नसतात,
आता स्त्रिया श्रेष्ठ का? ते ऐका
पुरुषांना त्यांच्या वैध कमाईतून सत्पात्री दान करून शिवाय यज्ञ करावे लागतात, ही कमाई प्राप्त करण्यासाठी व सांभाळण्यासाठी असतातच. ती कमाई जर दुरुपयोग करण्यात वापरली तरी त्याची वाईट फळे ठेवलेलीच असतात,
इतक्या खटाटोपानंतर पुरुषाला पुण्यलोकाची प्राप्ती होत असते परंतु स्त्रियांनी काया, बाचा व मनःपूर्वक फक्त एकनिष्ठेने पतीची सेवा केली तरी तेवढ्यानेच त्यांना पतीप्रमाणे पुण्यलोक मिळतो म्हणूनच मी ‘स्त्रियां धन्य आहेत’ असे म्हणालो,
तर मी माझ्या उद्गारांचा खुलासा केला आहे. आता तुमच्या ज्या शंका घेऊन इथे आला आहात त्यासुद्धा विनासंकोच विचारा. मी त्यांचे तुम्हाला खुलासेवार स्पष्टीकरण देईन.” तेव्हा सर्व मुनिजन म्हणाले की, व्यासांच्या सांगण्यातून त्यांच्या प्रशांची उत्तरे मिळालीच आहेत.
त्यावर हसून व्यास बोलले की, त्या मुनींच्या शंका त्यांनी अंतदृष्टीने आधीच जाणल्या होत्या म्हणून कलियुगात कोण धन्य आहेत, ते बोलून दाखवले. जे काया-वाचा-मनाने निर्मळ असतात त्यांना जराशा प्रयत्नांनी धर्मप्राप्ती होते. शूद्रांना महात्म्यांची सेवा केल्याने व स्त्रियांना पतीची सेवा केल्याने धर्माची प्राप्ती होत असते. हे फक्त कलियुगातच शक्य आहे. इतर तिन्ही युगांत त्यासाठी फार कष्ट करावे लागतात.
हे मुनी हो! मी तुम्ही काही विचारण्यापूर्वीच जे तुमचे प्रश्न होते त्यांची उत्तरे दिली आहेत.”
पराशर शेवटी म्हणाले की, मैत्रेय महाराज! मी तुम्हाला कलीचे रहस्य सांगितले. आता प्रलय कोणकोणते असतात तेही सांगतो.”
श्रीविष्णु पुराण अंश-६ ( भाग-१) क्रमश:
संकलन व सादरकर्ते : विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७