श्री नृसिंह सरस्वती जयंती
श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म पौष शुद्ध द्वितीया (1378) या दिवशी वर्धा जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील लाड कारंजा येथे झाला. अतिशय गरीब व धार्मिक कुटुंबातील माधव व अंबिकादेवी काळे हे त्यांचे आई-वडील होत. शाळीग्राम असे त्यांचे नाव ठेवण्यात आले. आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवन कार्याचा परिचय आपण पाहणार आहोत….

व्हॉटसअॅप – 9373913484
वयाच्या सातव्या वर्षी पर्यंत म्हणजे मौंजीबंधन होईपर्यंत शाळीग्राम फक्त ओंकाराचा उच्चार करीत असे. या प्रकारामुळे आई वडील चिंतातूर झाले होते. परंतु माझे मौंजीबंधन करा, असे लहानगा शाळीग्राम खुणेनेच सांगत असे. त्यानंतर मी बोलेल असे तो जणू सांगत असे. वयाच्या आठव्या वर्षी मौंजीबंधन झाल्यावर आठ वर्षांनी बोललेल्या शाळीग्रामने चारही वेद मुखोद्गत म्हणून दाखवले. या प्रकारामुळे आई-वडील पंचक्रोशीतील नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
एक दिव्य बालक आपल्या गावात जन्मास आले आहे, याची अनुभूती सर्वांना झाली होती. अनेक वर्षे श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान लाड कारंजा या दिव्या स्थळाची माहिती फारशी कुणाला नव्हती. परंतु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी येथील स्थान महात्म्य ओळखून लोकांना त्याची माहिती दिली. ब्रह्मानंद सरस्वती यांनी या ठिकाणी 1934 च्या सुमारास श्री गुरुमंदिर बांधले. आपणास संसारात रमायचे नसून ब्रह्मचर्य स्वीकारून तीर्थाटन करून वेद अभ्यास करायचा आहे असे ते सांगत.
भारतभरातील तीर्थक्षेत्री आपणास भेटी द्यायच्या आहेत, असा मानस व्यक्त करून लहानपणीच त्यांनी घराचा त्याग केला. पुढे काशीक्षेत्री जाऊन वेद तसेच उपनिषद अभ्यास व अखंड साधना केली. श्रीक्षेत्र काशी येथील महान व्यासंगी श्रीकृष्ण सरस्वती यांनी त्यांना शिष्यत्वाची दीक्षा देऊन श्री नृसिंह सरस्वती असे त्यांचे नामाभिधान केले. तिथून भारतभरातील कर्दळीवन श्रीशैल यासह सर्वच तीर्थक्षेत्री जाऊन चारही वेदांचा अभ्यास केला. श्री दत्त गुरूंच्या गाणगापूर, नरसोबावाडी येथे त्यांनी दोन तप निवास करून हजारो भक्तांसाठी विविध प्रकारचे सेवाकार्य केले. अनेक लोकोपयोगी कामे केली.
श्री दत्त अवतार व त्यांचे महात्म्य त्याचप्रमाणे धर्म, वेद त्याची महती जनसामान्यांमध्ये विषद केली. या काळामध्ये श्रीनरसिंह सरस्वती त्यांनी हजारो दुःखी, कष्टी गरजू लोकांना विविध प्रकारे मदत केली. संपूर्ण दक्षिण भारतातील तीर्थक्षेत्री राहून देखील त्यांनी वेद अभ्यास केला. शेवटी गाणगापूर नरसोबावाडी परिसर त्यांनी आपले कार्यक्षेत्र ठरवले. आपल्या कार्याची खूप प्रसिद्धी होत असल्याने लाखो भक्तगण त्यांच्या दर्शनास येत. असे आपल्या कार्याचे अवडंबर होऊ नये यासाठी आपल्या निवडक सात शिष्यांसह ते गंधर्व पूर्ण अर्थात गाणगापूर येथील भिमा अमरजा संगमावर आले.
आपण आपले अवतार कार्य इथून पुढच्या काळात गुप्त स्वरूपात करणार असल्याचे सर्व शिष्यांना त्यांनी सांगितले. इ स 1459 मध्ये आपण आता श्रीशैल येथे जात असल्याचे सांगून भिमा अमरजा संगमावर फुलांच्या आसनावर बसून येथील संगमावर त्यांनी आपले अवतार कार्य संपवले. त्यांच्या फुलाच्या असनांवरील फुले फक्त प्रवाहावर तरंगत राहिली. संपूर्ण जगभरात श्रीनरसिंह सरस्वतींचे लाखो भक्तगण आहेत. जन्मस्थान लाड कारंजा तसेच अवतार कार्यक्षेत्र गाणगापूर व नरसोबावाडी येथे मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्त केली जाते. लाखो दत्त भक्त नित्य पारायण करीत असलेले श्री गुरुचरित्र हा ग्रंथ हे श्री नृसिंह सरस्वतींचे जीवनचरित्र होय.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
(संकलन साधन श्री गुरुचरित्र)