त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने बोधचिन्ह व सामाजिक माध्यमांचे प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम नाथांचे संजिवन समाधीस्थान व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे न ठेवता नाशिक येथील कालिदास कलामंदिर नाट्यगृह येथे ठेवल्याने त्र्यंबककर व भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याचा जाब कोण विचारणार असा सवाल आहे ? मात्र सोशल मिडीयावरुन अनेकांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानवर नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्यात आल्यानंतर या नवनिर्वाचीत विश्वस्त मंडळाच्या कारकीर्दीतील हा पहिलाच कार्यक्रम असतांना त्याचे आयोजन त्र्यंबकेश्वर येथे न करता नाशिक येथे करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर नगरीत संतापाची लाट पसरली असून याचे पडसाद त्र्यंबकेश्वरमधील समाज माध्यमांवर उमटले. संस्थानच्यावतीने बोधचिन्ह, फेसबुक पेज, इंस्ट्राग्राम पेज, युट्यूब चॅनेल, वेबसाईट, ब्लॉग व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा बुधवार ४ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५-०० वा. महाकवी कालिदास कला मंदिर, नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याबाबतची बातमी व पत्रिका एका न्यूज पोर्टलवरुन प्रसिद्ध झाली, सदर कार्यक्रमा बाबत त्र्यंबककरांना माहिती नाही, विश्वासात घेतले नाही व कार्यक्रमाचे आयोजनही नाशिक येथे करण्यात आल्याने याबद्दल त्र्यंबकमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी संस्थानला नवीन विश्वस्त मंडळ लाभले असून धर्मादाय नावाच्या यंत्रणेने ज्या मुलाखती घेतल्या त्यातून त्र्यंबकमधून एकही व्यक्ती विश्वस्तपदासाठी पात्र ठरली नाही असे समोर आले. पदसिद्ध विश्वस्त वगळता इतर सर्व विश्वस्त हे त्र्यंबकबाहेरील असल्याने आधीच नाराजी असतांना नव्या विश्वस्तांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिलाच कार्यक्रम त्र्यंबकेश्वर ऐवजी नाशिक येथे पार पाडल्याने त्र्यंबककरांच्या संतापात भर पडली आहे.
नाथांच्या दर्शनापासून भाविक वंचित
नाथांचा भक्त हा सर्वसामान्य वारकरी, नाथांच्या दर्शनासाठी दिंड्यांच्या माध्यमातून शेकडो किलोमिटरचा पायी प्रवास करुन आल्यावर नाथांच्या चरण पादुकांवर माथा टेकला की कृतकृत्य होवुन जिवन धन्य झाल्याचे तो समजतो. यात्रेमध्ये दर्शनला गर्दी होत असल्याने बरेचसे भाविक यात्रेआधी येउन दर्शन घेतात. मात्र गेले चार दिवसांपासून नाथांच्या गर्भगृहामध्ये लावलेले ग्रेनाईट काढून दगडी फरशी लावण्याचे काम सुरु असल्याने गर्भगृह भावकांच्या दर्शनासाठी बंद आहे. अजूनही तीन दिवस काम चालणार असल्याचे समजते. त्यामुळे आठवडाभर भाविकांना उंबर्या पासूनच मुखदर्शन घ्यावे लागणार आहे. जसे त्र्यबकेश्वर मंदिर संस्थानने प्रसिध्दी माध्यमांद्वारे दिं ७ जाने. ते १२ जाने. मंदिर बंद दर्शन बंद राहण्याची माहिती भाविकांना दिली होती तशी कोणतीही सुचना श्री निवृत्तीनाथ मंदिर संस्थानने प्रसिध्द केली नाही. भाविक जेव्हा दर्शनासाठी जातो त्यावेळी गर्भगृहाच्या दरवाजावर लावलेली सुचना त्याला बघायला मिळते. त्यामुळे अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली.