श्री गजानन महाराज प्रकटदिन विशेष
महाराजांची नाशिक, त्र्यंबक आणि कावनई भेट…
असा आहे इतिहास
शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ असे नाव रूढ झाले. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता २३ फेब्रुवारी १८७८.
श्री. देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. “गण गण गणात बोते” हे अहर्नीश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे.
प. प. श्री गजानन महाराजांचे वास्तव्याने परम पावन झालेले श्री क्षेत्र शेगाव! रोज हजारो भक्त भारतातील कानाकोपऱ्यातून या क्षेत्री येतात व परम पावन समाधीचे दर्शन घेतात. सिद्ध स्थानी येऊन या अवलिया संताचरणी नतमस्तक होतात. आज शेगाव हे भाविकांचे माहेर झाले आहे. शेगावला गेल्यावर काय काय पाहू असे भाविकांना होते. शेगाव प्रमाणेच अनेक गावांत गजानन महाराज जात असत.भक्तांच्या उद्धारासाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी गजानन महाराज सदैव सर्वत्र भ्रमण करीत असत. शेगावच्या आसपास असलेल्या अकोला,अकोट वगैरे गावांना तर ते मनांत येईल तेंव्हा जात असत.त्याच प्रमाणे नाशिक पंढरपुर,ओंकारेश्वर इत्यादि ठिकाणीही ते जात असत.दासगणु महाराजांनी ‘श्रीगजानन विजय’ या चरित्र ग्रंथात महाराजांच्या विविध ठिकाणच्या प्रवासाची विस्तारपूर्वक वर्णन केलेले आहे. गजानन महाराजांची श्रीरामावर विशेष भक्ती होती हे सर्व विदित आहे. त्यामुळे ते अनेक वेळा नाशिकला पंचवटीत येत असत. श्रीगजानन विजय ग्रंथात दासगणु महाराजांनी गजानन महाराजांच्या दोन वेळेच्या भेटींचे अतिशय सविस्तर वर्णन केले आहे.
गजानन महाराजांची त्र्यंबकेश्वर भेट
गजानन महाराजांचे कट्टर शिष्य भास्कर पाटील यांना पिसाळलेल्या कुत्र्याने दंश केल्या नंतरचा प्रसंग श्रीगजानन विजय गंथाच्या अकराव्या अध्यायात दिलेला आहे.यावेळी महाराज भास्कर पाटील यांना म्हणाले, ” आपण त्र्यंबकेश्वरी जाऊ.तेथे पातकांचा नाश करणारा त्र्यंबकराज आहे.सर्व पापांचे हरण करणारी गोदावरी नदी आहे.एवढेच नाही तर ज्याच्यावर एकापेक्षा एक प्रभावी औषधीवनस्पती आहेत असा ब्रह्मगिरी पर्वत देखील आहे, गहिनी नाथांच्या कृपेने आपण कुत्र्याच्या विषावर औषध करू या..”
भास्कर पाटलाची गजानन महाराजांवरअपारश्रद्धा होती.ते म्हणाले , ” महाराज मी अज्ञानी बालक आहे. तुम्ही सर्वज्ञानी आहात. तुम्हाला सर्व समजते .माझ्यासाठी योग्य असेल तेच तुम्ही कराल याची मला खात्री आहे.” तेंव्हा सर्व मंडळी त्र्यंबकेश्वरी आले.सोबत बाळाभाऊ आणि पितांबरही होते. त्यांनी त्र्यंबकेश्वरला आल्यावर कुशावर्तात स्नान केले. त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.गंगाद्वारला जावून गौतमी गंगेचे दर्शन घेतले निलांबिका देवीचे तसेच गहिनी नाथाचे दर्शन घेतले.
त्यानंतर सर्व मंडळी नाशिकला पंचवटीत आली. पंचवटीत काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी गोपाळदास महाराज धुनी लावून बसत असे.गोपाळदास महाराज हे गजानन महाराजांना पूजनीय मानत असत.गजानन महाराज आपल्या शिष्यांसह काळाराम मंदिरांत त्यांच्या दर्शनाला आले.त्यावेळी गोपाळदास महाराजांनी त्यांचा सत्कार केला.त्यांना नारळ, खडीसाखर, फुले अर्पण केली. तिथून पूर्व दरवाजाने मंडळींच्या घोळक्यासह महाराजांच्या मठात येऊन समोर पिंपळाच्या पारावर ते अर्धातास बसले.ते दोघं त्यावेळी एकमेकांशी काय बोलले ते कोणालाच समजले नाही. असे म्हणतात साधुच्या खुणासाधुच जाणतात.
राममंदिरांत गोपाळदास महाराजांना भेटल्यावर गजानन महाराज, भास्कर पाटील, बाळाभाऊ,पिताम्बर व सोबत असलेली इतर सर्व मंडळी नाशिक मध्ये धुमाळ वकिलाच्या घरी गेले. हल्ली जेथे म.गांधी रोड आणि मेनरोड एकमेकांना क्रॉस करतात त्या धुमाळ पॉइंट नावाच्या चौफुलीवर सध्या जेथे ‘सुरेख क्लॉथ स्टोअर्स’ आणि वरच्या मजल्यावर ‘नाशिक आश्रम लॉज’ आहे. तो पूर्वी धुमाळ वकिलाचा वाडा होता. त्याच ठिकाणी गजानन महाराज धुमाळ वकिलांना भेटायला येत असत. इ.स. १९१० पूर्वीच्या या भेटी होत्या. पुढे १९६०-७० ला धुमाळ वकिलांच्या वंशजानी तो वाडा विकला असे अभ्यासकांचे मत आहे. या ‘चौफुली’ ला नाशिक मनपाने ‘धुमाळ पॉइंट’ असे नाव दिले आहे. हा एकमेव पुरावा सध्या उपलब्ध आहे.
महाराज कावनाई येथे आले
गजानन महाराजांच्या दुसर्या नाशिक भेटीचे वर्णन एकोणीसाव्या अध्यायात आले आहे. इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे गजानन महाराज रामचंद्र गोविंद निमोणकर नावाच्या व्यक्तीला भेटले. निमोणकर ओव्हरसियर होते त्यांना योगाभ्यास शिकण्याची तीव्र इच्छा होती. अनेक साधु संतांना त्यांनी याबाबतीत विचारले होते पण कुणीही त्यांना योगाभ्यास शिकविला नाही.गजानन महाराजांनी मात्र कावनई येथे निमोणकर यांना षोडशाक्षरी मंत्र आणि लाल रंगाचा लहानसा दगड नर्मदेतील गोटा गणेश म्हणून दिला होता असे वर्णन दासगणु महाराजांनी केले आहे.
त्याच निमोणकरांना गजानन महाराज पंचवटीत गोदावरीच्या काठी भेटले. हल्ली जेथे यशवंतराव महाराज पटांगण आहे तेथे ही भेट झाली. निमोणकर महाराजांना म्हणाले, “महाराज आपण माझ्यावर रागावले आहात का? त्या दिवशी तुम्ही माझ्याशी एकही शब्द बोलले नाही. मला काही मार्गदर्शन केले नाही.” तेंव्हा गजानन महाराजांनी त्यांना धुमाळ वकिलांच्या घरी येवून भेटण्यास सांगितले आणि स्वत: तिथून जणु अदृश्य झाले. गजानन महाराज खूपवेगाने चालत असत.
गोदावरीचा चढ चढून निमोणकर धुमाळ वकिलाच्या वाड्यात आले. तेंव्हा त्यांना गजानन महाराज ओसरीवर बसलेले दिसले. नंतर कावनई पासून आजच्या भेटी पर्यंत काय काय घडले ते निमोणकरांनी धुमाळ वकिलांना सांगितले. सर्व ऐकल्यावर धुमाळ वकिलानी निमोणकरांना नीट खुलासेवर समजावून सांगितले. पुढे महाराजांनी दिलेल्या षोडाक्षरी मंत्राच्या जपाने महाराजानी दिलेल्या तांबड्या रंगाच्या खडयासमोर साधना केल्यावर निमोणकर यांना योगाभ्यास येवू लागला. हा प्रसंग नाशिक जिल्ह्यातच घडलेला आहे.
नाशिक मधील श्रीगजानन महाराज मंदिरं
गजानन महाराज अनेक वेळा नाशिकला आले होते. सिंहस्थात त्यांचा अनेक दिवस त्र्यंबक,कावनई आणि नाशिक येथे मुक्काम असे. कदाचित त्यामुळेच नाशिक येथे श्रीगजानन महाराजांची अनेक मंदिरं आहेत.
त्र्यंबकेश्वर येथे जवाहर रोडवर श्री गजानन महाराजांचे अगदी शांत, निवांत जणु दुसरे शेगावच असलेले संस्थान आहे. या ठिकाणी गजानन महाराजांचे भव्य व देखणे मंदिर आहे.या मंदिरांत श्रीगजानन विजय ग्रंथाचे सामुहिक व वैयक्तिक पारायण करता येते.शेगाव प्रमाणेच येथेही मोठ्या संख्येने भक्त निवास असून भाविकांना निवास आणि भोजन सुविधा उपलब्ध आहे.
त्र्यंबकेश्वर प्रमाणेच इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे ही गजानन महाराज संस्थान आहे.
नाशिक शहरात इंदिरा नगर येथे ‘गजानन महाराज भक्त प्रतिष्ठान’ आणि ‘श्री गजानन महाराज देवस्थान सेवा ट्रस्ट’ ही दोन गजानन महाराजांची मंदिरं आहेत. सिडकोत अंबड लिंक रोडवर ॐ शिव श्री संत गजानन महाराज मंदिर, नशिकरोड़येथे मोटवानी रोडवर श्री गजानन महाराज देवस्थान.सातपुर कॉलनीत श्री गजानन महाराज मंदिर आहेत.त्याच प्रमाणे जय भवानी रोड देवलाली गाव, किशोर सूर्यवंशी मार्ग मखमलाबाद, श्रमिक नगर, शिवाजी नगर सातपुर, वैद्यनगर द्वारका,राणेनगर, नरहरी नगर, प्रशांत नगर पाथर्डीफाटा अशी एकुण १८ गजानन महाराज मंदिरं आहेत. श्रीगजानन महाराज प्रकट दिना निमित्त या सर्व मंदिरांत भजन कीर्तन परायण महाप्रसाद आदींचे आयोजन करण्यात आले आहेत.
– विजय गोळेसर
मोबाईल ९४२२७६५२२७
Shree Gajanan Maharaj Nashik, Trimbak Kavanai Visit History