विशेष लेखमाला
– श्रीदत्त परिक्रमा – भाग ७
प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान
श्रीक्षेत्र पीठापूरची अशी आहे महती
दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ यांना अग्रगण्य स्थान आहे. श्रीगुरू श्रीपाद श्रीवल्लभ यांना श्रीदत्तात्रेय यांचा प्रथम अवतार मानले जाते. त्यानंतर श्रीनृसिंहसरस्वती हे दुसरे तर तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मानला जातो. श्रीदत्त परिक्रमेच्या आजच्या भागात आपण श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र पीठापूर येथे जाणार आहोत.
श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान || श्री क्षेत्र पीठापूर ||
‘श्रीनृसिंह सरस्वती’ हे जरी ‘गुरुचरित्रा’चे नायक असले तरी त्यांचा पूर्वावतार म्हणून विख्यात असलेले ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ यांच्या चरित्रातील काही ठळक घटनाच सरस्वती गंगाधरांनी ‘गुरुचरित्रा’त सांगितल्या आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी ला झाला. गणेश चतुर्थीला झाला. कृष्ण-यजुर्वेद शाखा आपस्तंब सूत्र, भारव्दाज गोत्र भव ब्रह्मश्री घंडिकोटा अप्पालराज शर्मा आणि महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला. या अवताराची माहिती गुरुचरित्रात, पाच, आठ, नऊ व दहा या चार अध्यायात आलेली आहे. विशेष म्हणजे गुरुचरित्रात अन्यत्र कोठेही ‘श्रीपाद श्रीवल्लभां’ चा नामोल्लेखही नाही. ग्रंथकर्त्याचा हेतू प्रामुख्याने श्रीनृसिंह सरस्वतींच्याच अगम्य लीला वर्णन करण्याचा असल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांची माहिती ‘गुरुचरित्रा’त केवळ पूर्वपीठिका सांगण्यापुरतीच आलेली आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ
श्रीगुरुचरित्र’ या मराठी ग्रंथामध्ये त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. दत्तभक्त व सामान्य लोकांना कारंजा क्षेत्राचे श्रीनृसिंह सरस्वती आणि अक्कलकोट क्षेत्राचे श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे दोन अवातर चांगले माहीत आहेत. पण पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे. या पार्श्वभूमीवर श्रीपाद श्री वल्लभांच्या अलौकिक कार्याचा तसेच पीठापूरम या त्यांच्या जन्मक्षेत्रांचा थोडक्यात घेतलेला धांडोळा उद्बोधक आणि अनेकांच्या माहितीत नव्याने भर टाकणारा ठरेल अशी अपेक्षा आहे.
पिठापुरम येथे १६ तर कुरवपूर येथे १४ वर्षे अशा अवघ्या ३० वर्षांच्या कालावधीत अद्भूत असे लीलाचरित्र दाखवून त्यांनी इह-पर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले. त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भूत आहेत. पुढे जप, तप, ध्यान, तपस्या या सर्वांचे फल स्वत:ला न घेता सृष्टीला देत आपल्या भक्तांची आश्वीव्याप्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपोबळ सहस्त्रपटीने वाढविले. आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लीलांद्वारे जनता जनर्दानाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.
श्रीपाद श्रीवल्लभ यांनी केलेले चमत्कार
पाण्यावरून चालणे, व्यंग व्यक्तीस अव्यंगता प्राप्त होणे, उपस्थितांसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक राहणे, लांबच्या प्रवासातही दूध, दही, लोणी खराब न होता नीट राहणे, अंध व्यक्तीस दृष्टी प्राप्त होणे, मृत जीवास जीवनदान देणे अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण लीलांनी त्यांचे आयुष्य भरलेले दिसते.
या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत-सज्जनांचे संरक्षण, कर्ममार्गाचे आचरण, गर्वहरण, दृष्टांचे निर्दालन, अस्पृश्यता निवारण, सत्कर्माचे प्रचारण, भूदान व अन्नदानाचे महत्त्व, नामस्मरणाचा महिमा, भूत-पिशाच्च बाधांचे निर्मूलन आदि अनेक गोष्टींचा संदेश दिला.
आंध्र प्रदेशातील पीठापुरम येथे या दैवी बालका ने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आतच सकळ शास्त्रात विशेषत: वेदान्दात प्रावीण्य मिळविले. नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले.
समाजाची घडी नीट बसविली
कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला, असे मानले जाते. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लीम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना व्हावी, या उद्देशाने श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. त्या वेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. अशा वेळी इ.स. १३२० मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले.
श्रीदत्त संप्रदायाची जोमाने वाढ
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्रप्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. ‘श्रीपादराजं शरणं प्रपद्ये’ हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे.
असे आहे पिठापुरम येथील मंदिर
पिठापुरम येथील देखण्या मंदिरातील श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तींच्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटते. तेथे भक्तांना अभिषेक करता येतो. मंदिराच्या प्रांगणात औदुंबर वृक्ष असून तेथे दत्तांच्या पादुका आहेत. पीठापुरम या पवित्र तीर्थक्षेत्री अत्यंत प्राचीन असे कुक्कुटेश्वराचे दगडी मंदिर आहे. त्यासमोरच एक तलाव आहे.
श्री क्षेत्र पीठापूर
भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे. कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ आहे. हे गोदावरी जिह्यात आंध्र प्रदेशमध्ये सामालकोटाहून १२ कि.मी. दूर वसलेले एक अती लहानसे गाव आहे.
साधारणत सन १९८३ साली पू. रामस्वामी यांनी एक लहानशी जागा खरेदी केली व सन १९८५ साली त्या जागेमध्ये एक औदुंबराचे रोपटे लावले. तसेच सन १९८७ साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदीर म्हणजे महासंस्थानाची स्थापना केली व सन १९८८ साली २२ फेब्रुवारी रोजी श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजेच (श्री बापन्नार्युलुच्या घरी) श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना श्री. पू. रामस्वामींच्या हस्ते झाली. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्या अक्षर सत्य ग्रंथात श्रीपादांनी असे सांगितले आहे की जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदीर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली.
श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान
या मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभांची, श्री दत्तात्रेयांची व श्री नृसिंहसरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मुर्ती आहेत. या मुर्तींची स्थापना दिनांक ६/२/१९९२ ला झाली. तसेच मनमोहणारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका आहेत व बाजुलाच औदुंबराचे झाड आहे. त्याच्या बाजुलाच श्री दत्तात्रेयांची काळ्या रंगाची मुर्ती व श्रींच्या पादुका आहेत. तेथील दृश्य फार आनंदीदायक व शांतीदायक असे आहे.
मंदिरातील नित्यक्रम
हे मंदीर पहाटे ५.०० वाजता उघडते व साधारणत सात वाजल्यापासून सर्व विधींची सुरूवात केली जाते. दुपारी साधारणत एक ते चारच्या दरम्यान जाळीच्या दाराने मंदीर बंद केले जाते. संध्याकाळी सात वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या तीन प्रदक्षिणा या मंदीराभोवती केल्या जातात. आरती होऊन सर्व भक्तांना श्रीपादांच्या प्रसादाचे वाटप केले जाते. मंदीर लहान असल्यामुळे सध्यातरी राहण्याची व जेवण्याची सोय देवळाजवळच केली जाते. रात्री ९.०० वाजता मंदीर बंद होते.
श्रीपादांच्या तीथीप्रमाणे इथे बरेच उत्सव केले जातात. त्यापैकी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी जयंती ,श्री दत्तजयंती , श्री गुरूद्वादशी, श्री कृष्णाष्टमी ,श्री पू. वासूदेवानंद सरस्वती जयंती आणि गुरूपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. .
श्री दत्तात्रेयांचे तीन अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान व आद्यपीठ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान. येथे भक्तांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जातात. त्यापैकी नित्यसेवा, पालखी सेवा, बिल्वार्चना, तुळशीपत्र व ब्राह्मण भोजन इत्यादी.
पीठापुर हे पूर्व काळापासूनच सिध्द क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. या स्थानामध्ये एक तलाव असून तेथे रोज हजारो भाविक स्नान करतात. तसेच मृत पावलेल्या व्यक्तीचे पूर्ण श्रध्दाभावक पिंडदान केल्यास त्या आत्म्यास मुक्ती मिळते. या जागेलाच पादगया असे संबोधले जाते.
स्थान माहात्म्य
त्रेतायुगात भारद्वाज ऋषींनी पिठापूरात सवित्रकाठकचयन यज्ञ केला. काशी निवासाचे फळ पिठापूर निवासामध्ये आहे. ज्याला पिठापूर निवासाची इच्छा आहे त्यालाच ही संधी मिळते. पीठापुरला खास पौराणिक महत्त्व आहे. कुक्कुटेश्वर मंदिरासमोर १२१ Χ १२१ फूटाचा पक्का तलाव आहे. येथे पिंडदान केल्यास आत्म्यास मुक्ती मिळते. मंदिराचे आवारात मागील भागात चार हात, तीन शिरे असलेले आश्चर्यकारक स्वयंभू श्रीदत्त मंदिर आहे. तेथे एक महाशक्ती-पीठ आहे. हा परिसर ‘पुरुहुत्तिका’ म्हणून प्रसिद्ध आहे. याच परिसरात कालाग्नीशमन दत्तमंदिर आहे. काळ्या पाषाणातील दत्तमूर्ती अत्यंत तेजस्वी व जागृत भासते. हे दत्तमंदिर श्रीपाद श्रीवल्लभांच्या काळापासून असल्याचे सांगितले जाते. ह्या परिसरातील स्पंदने श्रीपाद श्रीवल्लभांच्या अस्तित्त्वाची ग्वाही देतात.
श्रीपाद श्रीवल्लभांचे निवासस्थान अत्यंत पवित्र व शांत आहे. येथे अभिषेक लघुरुद्र करुन आपणास सेवा अर्पण करता येते. सायंकाळी ७ वाजता पालखी सेवा असते. स्नान करुन सोवळे घालून आपणास पादूकांच्या पालखीत प्रत्यक्ष सहभागी होता येते. संस्थान तर्फे भोजन व चहाची मोफत व्यवस्था आहे. स्थान अत्यंत प्रसन्न व पवित्र आहे.
पीठापूरला कसे जावे?
पीठापूर हे आंध्र प्रदेशात आहे. मुंबई-भुवनेश्र्वर कोणार्क एक्सप्रेसने सामलकोट जंक्शन येथे उतरावे. (अंदाजे अंतर १३०० कि.मी) पीठापूर हे रेल्वे स्टेशन आहे. परंतु पॅसेंजर अथवा हैद्राबाद, सिकंदराबाद येथून सुटणाऱ्या काही गाड्या येथे थांबतात. जवळचे रेल्वे स्टेशन काकीनाडा, व थोडे लांबचे विशाखापट्टणम रेल्वे स्टेशन आहे. सामलकोट येथे उतरल्यानंतर ऑटोरिक्षा करावी व श्रीपादश्रीवल्लभ महासंस्थान (वेणूगोपाळ मार्ग) येथे जावे. सामलकोट ते पीठापूर फक्त १२ कि.मी आहे. वाहन व्यवस्था भरपूर आहे.
पीठापूर रेल्वे स्टेशनपासून मंदिर ५ मिनिटाच्या अंतरावर आहे. महासंस्थान येथे आधी फोन केल्यास आणि हिंदी, इंग्रजी भाषेतून येण्याबाबत कळवल्यास तेथे राहायला खोल्या मिळतात. पीठापूर येथील श्रीपाद- श्रीवल्लभ जन्म-स्थानात आरती, अभिषेक, रात्री पालखी सोहळा होतो. दोन्ही वेळा मोफत प्रसादाची सोय आहे. कुक्कुटेश्वर मंदिर, कुंती माधव मंदिर, काकीनाडा समुद्र किनारा, अन्नावरम् (सत्यनारायण मंदिर) जवळच राजमहेंद्री जिथे गोदावरी नदीबंगालच्या उपसागराला मिळते ही सर्व ठिकाणं भेट देण्यासाठी योग्य आहेत.
संपर्क: श्रीपाद-श्रीवल्लभ महासंस्थान,श्रीक्षेत्र पिठापुर जि. पूर्व गोदावरी, आंध्रप्रदेश – ५३३४५०,
फोन – (०८८६९) २५०३००, २५२३०० , २५०९०० मोबाईल ०८८६९२५०३००/ ०९३४७७९७८७८
श्रीदत्त परिक्रमेत आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जन्मस्थान असलेल्या श्रीक्षेत्र पिठापुरचे दर्शन घेतले.उद्या आपण श्रीमाणिकप्रभू यांच्या कर्मभूमीत माणिकनगर येथे जावू या!
(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com /श्रीगुरुचरित्र)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Shree Datta Parikrama Shree Vallabh Pithapur by Vijay Golesar
Religious Dattatray