इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्रीदत्त परिक्रमा
लेख १६वा
श्री गजानन महाराजांची लिलाभूमी
|| श्री क्षेत्र शेगाव ||
श्रीदत्त परिक्रमेत आज आपण वऱ्हाडातील श्रीक्षेत्र शेगावचा महिमा जाणून घेणार आहोत. हे गाव प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा. श्री. देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले.
श्रीदत्त परिक्रमेत आज आपण वऱ्हाडातील शेगाव येथे जाणार आहोत. हे गाव प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ असे नाव रूढ झाले. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता २३ फेब्रुवारी १८७८ , श्री. देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.
“गण गण गणात बोते” हे अहर्नीश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे.
प. प. श्री गजानन महाराजांचे वास्तव्याने परम पावन झालेले श्री क्षेत्र शेगाव! रोज हजारो भक्त भारतातील कानाकोपऱ्यातून या क्षेत्री येतात व परम पावन समाधीचे दर्शन घेतात. सिद्ध स्थानी येऊन या अवलिया संताचरणी नतमस्तक होतात. आज शेगाव हे भाविकांचे माहेर झाले आहे. शेगावला गेल्यावर का्य काय पाहू असे भाविकांना होते. शेगाव मधील काही प्रमुख ठिकाण अशी, गजानन महाराज मंदिरातील भुयार : आज मुख्य मंदिराच्या तळघरात जिथे हरि पाटलांनी शीला ठेवली होती तिथे श्री गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. ह्या जागेला भुयार म्हणतात. भुयारात प्रवेश केल्यावर श्रींचे दर्शन घडते. भुयारात आतल्या बाजुनी आता संगमरवराच्या लादया बसविण्यात आल्या आहेत. १९०९ साली मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली. काळया दगडांनी बांधलेल्या या मंदिराची लांबी ४८ फुट व रुंदी ४२ फुट असून शिखराचा भाग ५१ फूट उंच आहे.
राम मंदिर :
श्रींचे दर्शन घेऊन भक्त भूयारातून तळमजल्यावर राम मंदिरात प्रवेश करतात. अशी रचना करण्या मागे एक विशिष्ट हेतू आहे. संताकडे गेल्यावर संत भक्तांना देवापर्यन्त पोहोचण्याचा मार्ग दाखवितात. म्हणून महाराजांचे दर्शन घेऊन भूयारातून बाहेर पडल्यावर भक्त रामाच्या दर्शनासाठी जातात. याच राम मंदिरात महाराजांचे पालखीतील चांदीचे दोन मुखवटे आहेत.
सभामंडप :
राम आणि हनुमान मंदिराला जोडणाऱ्या सभामंडपातील आतल्या भागात महिरपीच्या (कमान) वरच्या भागात महाराजांच्या पोथीतील विविध लीला चित्रबद्ध केल्या आहेत. या सभामंडपात सर्वत्र रेखीव कमानी आहेत. पूर्वीच्या दगडाच्या बांधकामावर रंग चढविल्याने त्या अधिक आकर्षक दिसतात.
समाधीग्रहण स्थळ व शयनगृह :
मुख्य मंदिराच्या आग्नेयेस महाराजांनी जेथे दिनांक ८ सप्टेंबर १९१० रोजी समाधी घेतली तेथे आज संगमरवरी पादुका आहेत. त्यापाठी विठ्ठलरुक्मिणीचे मंदिर असून त्या जागेला समाधीस्थळ म्हणतात. त्याला लागूनच महाराजांचे शयनगृह आहे. श्रींच्या वापरातील पलंग येथे ठेवला असून त्यावर दोन बाजूला लोड आहे आणि मध्यभागी श्रींचा फोटो आहे. समाधीग्रहण स्थळाच्या डाव्या बाजूला श्रींनी त्या काळी प्रज्वलीत केलेली धूनी आजही धगधगत असून शेजारीच श्रींनी वापरलेले चिमटे येथे ठेवलेले आहेत. एक सेवक धूनी अखंड तेवत ठेवतो.
पाठशाळा : मुख्य मंदिराच्या भोवती पटांगण आहे आणि त्याला चार बाजूंनी दगडी पाठशाळेने वेढलेले आहे. पाठशाळेला जागोजागी सुंदर कमानी आहेत. ह्याच पाठशाळेत आज विश्वस्त मंडळाची कचेरी, देणगी, आणि अभिषेक काउन्टर आणि सनई चौघडा वाजविण्याची जागा आहे.
शेगावला लोक गेले की प्रमुख समाधी मंदिर, पारायण गृह आणि आनंद सागर या ठिकाणीच ९०% लोक जातात. गजानन महाराजांसंबंधित आणखी ५ जागा शेगाव ला प्रमुख मंदिराच्या जवळच आहे याची बहुतेकांना कल्पना नसते. पोथीत किंवा गोष्टीरूपी पुस्तकात या ठिकाणांचा उल्लेख आढळतो.
१. मोटेंचं शिव मंदिर :
हे शंकर आणि विष्णू मंदिर आहे. याचा जीर्णोद्धार संस्थानाने केला आहे. या मंदिराचे महत्व म्हणजे; पोथीत उल्लेख आढळतो की, गजानन महाराजांनी घोड्याच्या पायात झोपून त्याला शांत केले, किर्तनकाराला समज दिली ती याच मंदिरात. आत गेल्यावरच महाराजांचा अप्रतिम मूळ फोटो, पादुका समोर दिसतात. शेजारी गाभाऱ्यात शिवपिंडी आणि बाजूला उजवीकडे विष्णू मूर्ती. मंदिरात मूळ मंदिराचा फोटो ही आहे. ‘शेगाव’चे मूळ नाव ‘शिवगाव’ होते ते याच ग्रामदैवत शिवमंदिरावरून पडले होते.
२. महाराजांचे प्रगट स्थळ :
बहुतेक जण शेगावला येऊन समाधी मंदिरातील दर्शन घेतात. पण पहिल्या अध्यायात गजानन महाराजांचे सर्व प्रथम दर्शन, भेट बंकटलालास होते त्याबद्दल वाचूनही बहुतेक लोक त्या जागी जात नाहीत वा ती जागा अजूनही गावात आहे याबद्दल अनभिज्ञ असतात. मोटेंच्या शिवमंदिरापासून मूळ रस्त्यावरून समोर जात उजवीकडे वळल्यावर सरळ गेल्यास किंवा कोणाला प्रकट स्थळाबद्दल विचारल्यास तो रस्ता दाखवू शकतो. थोड्याच अंतरावर ते प्रकट स्थळ येतं. एक मस्त बहरलेला भला मोठा वटवृक्ष इथे आहे. समोर प्रकट स्थळाची जागा आणि त्याबद्दल माहिती आहे. शेजारीच एक मोठा हॉल आहे ज्यात चित्ररूपी चरित्र मांडले आहे.
३. बंकटलालचा वाडा :
प्रकट स्थळापासून मूळ रस्त्यावर येऊन पुढे जाताना कोणाही गावकऱ्याला विचारल्यास तो ही जागा दाखवेल. इथे मूळ वाड्याच्या जागी एक सभागृह बांधले आहे. आत महाराजांचा फोटो, पादुका आणि बंकटलालच्या वडिलांची हातात तराजू घेतलेली प्रतिकृती आहे. पाचेक वर्षापर्यंत लागूनच पडक्या स्थितीतला जुना वाडाही होता.
४. हनुमान, शीतला माता मंदिर :
काही अंतरावरच हे मंदिर आहे. इथेच महाराजांनी, पाटील बंधूंनी त्यांना उसाने मारल्यावर त्यानी हाताने उस पिळून मुलांना रस पाजला होता. इथे या चवथ्या जागी पोचल्यावर काही पावलांवरच मंदिराचा मागचा भाग येतो. हे सुद्धा संस्थानाच्या अखत्यारीत असल्याने इथेही महाराजनचा फोटो, आणि सेवेकरी असतात. जुन्या मंदिराचा मूळ फोटो, येथील इतिहासाची माहिती दिली आहे.
५. जुने सुंदर शिवमंदिर :
प्रमुख मंदिराजवळील महाप्रसाद गृहाकडे जाताना एक जुने शिव मंदिर आहे. हेमाडपंथी नसलेले पण मोठ्या खांबांचे पुरातन आणि वेगळा ‘फील’ देणारे हे मंदिर आहे. याबद्दल फार कमी लोकांना माहिती असल्याने इथे नेहमी शांतता आणि शांती असते.
श्री क्षेत्र शेगाव येथे कसे पोहचाल :
जवळचे रेल्वे स्टेशन: शेगाव (मध्य रेल्वे) व जवळचे बस डेपो: शेगाव बस डेपो.
रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षा तळ आहे. प्रति व्यक्ती साठी १० रुपये घेतात. तसेच रिक्षा तळाजवळ उजव्या बाजूला १५ पावलावर संस्थेचे फ्री बस दर १५ ते ३० मिनिटांनी उपलब्ध देखील आहे. “भक्त निवास” या संस्थेच्या ठिकाणी रिक्षाने /बसने पोहोचल्यावर प्रथम भक्त निवास क्रमांक ५ या ठिकाणी जावून प्रथम रूम बुक करून घ्यावे रूम अत्यन्त सुंदर, स्वच्छ, निटनेटक्या आहे.
आनंद सागर नावाचे हे ठिकाण अतिशय सुंदर फिरण्याचे ठिकाण आहे. आरामात फिरल्यास ५ ते ७ तास लागतात. या ठिकाणी ठराविक अंतरावर चहा नास्ता साठी कॅन्टीन (माफक दरात) ची सोय देखील आहे. वरील ठिकाणी जाण्यासाठी संस्थेच्या फ्री बस ठराविक वेळे नुसार आहेत. संस्थानच्यावतीने विपुल निवास व्यवस्था उपलब्ध आहे.
संपर्क:
१) श्री मंदिर परिसर संकुल – 07265- 252699, 252018 / 9423840852
२) भक्त निवास संकुल – 9850850891 / 9422064318 / 9423144709
३) आनंद विहार संकुल – 07265- 252019 / 9657449496
४) आनंद सागर विसावा संकुल- 9657449495
५) पर्यायी निवास व्यवस्था – 9763743734 / 9881055023
श्रीदत्त परिक्रमेत आज आपण श्रीसंत गजानन महाराज यांची लिलाभूमी असलेल्या श्रीक्षेत्र शेगावचे दर्शन घेतले.उद्या आपण श्रीक्षेत्रअनसूया तीर्थ आणि श्रीक्षेत्र भालोद यांचे दर्शन घेऊ या!
(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com /श्रीगुरुचरित्र /संतकवी दासगणु रचित ‘श्रीगजानन विजय’)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Shree Datta Parikrama Shree Gajanan Maharaj Shegaon by Vijay Golesar
Religious Dattatreya