इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्रीदत्त परिक्रमा भाग – ३
महात्म्य श्रीक्षेत्र नृसिंहवाडी आणि पैजारवाडीचे!
४) श्रीक्षेत्र नृसिंहवाडी – श्री दत्तात्रेयांची राजधानी
दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखले जाते. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे.
इ.स.१३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. १३८८ मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान १४२१ साली त्यांचा मुक्काम औंदुबर क्षेत्री होता, तर १४२२ मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या गावात होता. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर १४३४ मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान ठेवले.
नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेलं हे तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जातं. नृसिंहसरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केलं आहे. साधना, उपासना भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो. नदीतीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैलतीरावरील अमरेश्वर, कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा रात्रंदिवस राबता असतो.
या क्षेत्री असे जावे
हे क्षेत्र कोल्हापूर पासून पूर्वेस ५० कि. मी. अंतरावर आहे. सांगली या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २२ किमी. अंतरावर दक्षिणेस हे क्षेत्र आहे. सांगली बस स्थानकावरून या क्षेत्री जाण्यासाठी नियमित बस सेवा आहे. इथे निवासासाठी देवस्थानचे भक्त-निवास आहे. दुपारी १२ वाजता महाप्रसादाची सोय आहे. काही वर्षांपूर्वीच दत्तभक्त शरद उपाध्ये यांनी या ठिकाणी “वेदभवन” या वास्तुचे निर्माण केले आहे. ही वास्तु सुध्दा अवश्य पाहावी.
संपर्क: श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थान, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, ४१६१०४.
फ़ोन: (०२३२२) २७०००६, २७००६४, २७०५०१
५) श्री क्षेत्र पैजारवाडी – कासवाच्या आकाराचे चिले महाराजांचे अदभुत मंदिर!
अगदी अर्वाचीन काळात कोल्हापूर जवळ पैजारवाडी येथे एक अवतारी पुरूष होवून गेले. त्यांचे नाव परब्रह्म सद्गुरु चिलेमहाराज. ते दत्तात्रेयांचे अवतार होते अशी श्रद्धा आहे. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ रोजी पन्हाळा किल्याजवळील जेऊर यागावी झाला. त्यांच्या जिवित काळामध्ये त्यांनी असंख्य लीला चमत्कार केले. त्यांचे बाह्यवर्तन अत्यंत बुचकळ्यात टाकणारे होते. ते प्रसंगी मद्यपान करीत आणि मांसाहार ही करीत. पैजारवाडी येथील गराडे महाराजांच्या समाधीवर ते मदिरेचा अभिषेक करीत. समोरच्या व्यक्तीच्या मनातील भाव त्यांना लगेच ओळखून येत असे. त्यांचे शंकर महाराजांशी सख्य होते. जणू शंकर महाराजांचा ते अवतार होते. शंकरमहाराजांप्रमाणे त्यांचा अवतार रुद्रावतार होता. त्यांनी सांगितलेली अनेक भाकिते सत्य झाली आहेत. त्यांच्या भक्तांना त्यांनी अनेक संकटातून सोडविले आहे. अगदी मरण पावलेल्या व्यक्तींनाही त्यांनी जिवंत केले आहे. ते नेहमी मी दत्त आहे असे म्हणत असत.
पैजारवाडी येथिल त्यांच्या समाधीजवळ आता कासवाकृती भव्य मंदिर उभे राहिले आहे. तेथे अत्यंत दिव्य वातावरण आहे. तेथे गेल्यावर विलक्षण अनुभूती येतात. आजही श्रद्धाळू भक्तांना त्याची अनुभूती येते. त्यांचे जीवन कार्य पाहिल्यावर श्रीदत्तात्रेयांच्या सोळा अवतारापैकी “लीला विश्वंभर” या सहाव्या आणि “माया मुक्तावधूत” या दहाव्या आणि अकराव्या अवतारातील वर्णनाप्रमाणे त्यांचे कार्य होते याची खात्री पटते. पैजारवाडी हे आधुनिक काळातील एक विलक्षण दत्तक्षेत्र आहे. तिथे भक्तनिवास आणि भोजन या सुविधा उपलब्ध आहेत.
संपर्क
संपर्क : परमपुज्य सद्गुरु श्रीचिले महाराज समाधी मंदिर संस्थान, श्रीक्षेत्र पैजारवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ४१६२१३.
फोन: (०२३२८) २३१०६०, (०२३१) २६२८२८४ / २६२८३८४
बापूजी यादव मोबा. ९६२३५३५१२७
६) कोल्हापूरची श्री एकमुखी दत्तमुर्ती
कोल्हापूर शहरातील एकमुखी दत्त मंदिरातील दत्ताची मूर्ती १८ व्या शतकात बनवलेली असून नृसिंह सरस्वती महाराज, गाणगापूर; श्रीपाद वल्लभ महाराज आणि नंतर स्वामी समर्थ यांनी या मूर्तीची पूजा केली आहे. मूळ मूर्ती उत्तर भारतातील असून तिची प्रतिष्ठापना कुणी केली याची माहिती उपलब्ध नाही. पू. मौनी महाराजांनी (पाटगाव, जि. कोल्हापूर) मंदिराचा जीर्णोद्धार केला. शके १८८६ मध्ये श्री. पांडुरंग गोविंदराव भोसले आणि वर्ष १९९७-९८ मध्ये श्री. अमोल जाधव यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.
पूर्ण मूर्ती महादेव लिंगाच्या आकारात एकाच पाषाणात असून ५ फूट (पूर्ण पुरुष) अशी रचना आहे. मूर्ती पश्चिमाभिमुख असून उजव्या बाजूच्या एका हातात जपमाळ, दुसर्या हातात कमंडलू, तिसर्या हातात डमरू आणि डाव्या बाजूच्या एका हातात त्रिशूळ, दुसर्या हातात शंख अन् तिसर्या हातात योगदंड आहे. मूर्तीच्या मस्तकावर शिवपिंडी आहे. मूर्ती दगडी चबुतर्यावर उभी आहे. मंदिराबाहेरच समोर नंदीसह महादेव मंदिर आहे. या परिवारास मंदिर पंचायतन असे संबोधले जाते. श्रीविष्णु मंदिर, नरसिंह मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर, श्रीराम मंदिर. (एकमुखी) श्री दत्त मंदिर हे पूर्ण गुरुपीठ असून अवधूतस्वरूप आहे, असे मानले जाते. मंदिराच्या शेजारी दक्षिण बाजूस १ सहस्र वर्षापूर्वीचा पिंपळ वृक्ष आहे. वटवृक्ष हा दत्तमंदिराकडे झुकला आहे, तर पिंपळ वृक्ष हा दक्षिणेकडील हनुमान मंदिरावर झुकला असून त्याला पारंब्या नाहीत. पिंपळाला औदुंबराप्रमाणे फळे येतात.
श्रीदत्त परिक्रमेत आज आपण श्री दत्तात्रेयांची राजधानी असलेल्या नृसिंहवाडी, श्री चिले महाराजांची समाधी असलेले पैजारवाडी आणि कोल्हापुरचे श्री एकमुखी दत्त मंदिर या स्थळांचे दर्शन घेतले. उदया आपण पंत महाराज यांच्या बाळेकुंद्रीं येथे जाणार आहोत.
(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com व गुरुचरित्र)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मो. ९४२२७६५२२७
Shree Datta Parikrama Nrusinhawadi Paijarwadi Importance by Vijay Golesar
Shri Gurudev Dattatray