इंडिया दर्पण – श्रीदत्त परिक्रमा
लेख-९ – श्रीदत्त महिमा क्षेत्र १४ वे
दत्तावतार श्री माणिक प्रभू यांची लिलाभूमी श्रीक्षेत्र माणिकनगर
श्रीदत्त संप्रदायात अतिशय थोर संत विभूती होवून गेल्या आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका पाहिल्यावर मनुष्य नतमस्तक झाल्या शिवाय रहत नाही. श्रीदत्त परिक्रमेच्या निमित्ताने अशा थोर महात्म्यांच्या कार्याची माहिती होते. आज आपण ज्या दत्त क्षेत्राचा महिमा पाहणार आहोत त्या स्थानाचे नाव आहे श्रीक्षेत्र माणिक नगर सकलमत संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिध्दपुरुष श्री माणिक प्रभूजी यांची ही कर्मभूमी. हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की, ज्याठिकाणी आजही गादी परंपरा सुरु आहे. माणिकप्रभू संस्थान आध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सुध्दा अग्रेसर आहे. अंधशाळा, वेदपाठ शाळा, पब्लिक स्कूल, संगीत विद्यालय, संस्कृत पाठशाळा असे अनेक प्रकल्प यशस्वीपणे माणिकप्रभू संस्थान राबवित असून त्याद्वारे समाजातील तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचा सर्वांगिण विकास केला जातो. असं म्हणतात धर्माचा बाजार न झालेलं क्षेत्र पहायचे असेल तर माणिक नगरला जावे!!
श्री क्षेत्र माणिकनगर- प. पू. दत्तावतार माणिकप्रभू यांची लिलाभूमी
सोलापूर-हैद्राबाद बसमार्गावर हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून १ किमी अंतरावर माणिक नगर हे क्षेत्र आहे. कर्नाटक राज्यात हे क्षेत्र येते. सकलमत संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिध्दपुरुष श्री माणिक प्रभूजी यांची ही कर्मभुमी आहे.
माणिकप्रभू कोण होते?
श्री माणिकप्रभू हे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समकालीन दत्तावतारी सिद्धपुरुष होते. दत्त जयंतीच्या दिवशी बसव कल्य़ाण जवळील लाडवंती या गावी श्री माणिकप्रभूंचा जन्म झाला.
माणिकप्रभूंचे कार्य
माणिक प्रभूंच्या दत्तोपासनेच्या परंपरेला ‘सकलमत संप्रदाय’ असे नाव होते. नावावरूनच हे स्पष्ट आहे की, या संप्रदायात समन्वयाचा मोठा प्रयत्न झालेला आहे. या संप्रदायाचा असा सिद्धांत आहे की, जगातील सर्व धर्म व संप्रदाय हे त्यांच्या त्यांच्या अनुयायांना परमेश्वराची प्राप्ती करून देणारे आहेत. तेव्हा प्रत्येकाने अन्य संप्रदायांना विरोधी वा त्याज्य न मानता समन्वयाच्या उदार दृष्टीने त्यांतील सत्त्वांश ग्रहण करावा.
या संप्रदायाचे उपास्य श्रीचैतन्यदेव ( आत्मदेव – या विश्वात भरून उरलेले चैतन्यतत्त्व) हे आहे. या संप्रदायांत श्रीदत्तात्रेयाचे स्वरूप मधुमती नामक शक्तिसहित आराधिले जाते. ‘‘हा संप्रदाय अद्वैती व सर्वव्यापी असल्यामुळे अमक्याच एका देवतेचा मंत्र घेतला पाहिजे, असा आग्रह मुळीच नाही. कारण आपले सद्गुरूच नाना वेशांनी या जगात नटलेले आहेत, सर्व स्वरूपे त्यांचीच आहेत; म्हणून बाह्यत: भेद दिसला, तथापि वस्तुत: सर्व देवता एकरूपच आहेत,
श्री माणिक प्रभुंच्या लीला
श्री माणिक प्रभू यांनी माणिक नगर, बसवकल्य़ाण, बिदर या परिसरामध्ये अनेक अवतार लीला केल्या आहेत. त्यापैकी एक विशेष प्रसिद्ध लीला म्हणजे, ज्या प्रमाणे श्री नृसिंहसरस्वती स्वामी गाणगापूरला वास्तव्यास असतांना दिवाळीच्या दिवशी आपल्या अनेक शिष्यांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक शिष्याच्या घरी भोजनासाठी गेले आणि त्याच वेळी ते देह रूपाने गाणगापूरला सुध्दा होते; त्याचप्रमाणे श्री माणिक प्रभूजी बिदर जवळील झरणी नृसिंह येथे मुक्कामास असतांना त्यांच्या अनेक हिंदू-मुस्लिम भक्तांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक भक्ताच्या घरी भोजनास गेले आणि त्याच वेळी ते देहरूपाने झरणी येथे देह रूपाने गाढ निद्रा घेत होते. त्यांचे एक वैशिष्टय होते की, त्यांच्या दरवाज्यातून कधीही कुणीही विमुख गेले नाही. शिर्डीचे साईबाबा सुध्दा त्यांच्याकडे भिक्षेसाठी आले होते.
हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की, ज्याठिकाणी आजही गादी परंपरा सुरु आहे. माणिकप्रभू संस्थान आध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सुध्दा अग्रेसर आहे. अंधशाळा, वेदपाठ शाळा, पब्लिक स्कूल, संगीत विद्यालय, संस्कृत पाठशाळा असे अनेक प्रकल्प यशस्वीपणे माणिकप्रभू संस्थान राबवित असून त्याद्वारे समाजातील तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचा सर्वांगिण विकास केला जातो.
ऐश्र्वर्यसंपन्न माणिकनगर
नगरात प्रभू वास्तव्य करुन राहिले आणि एका नव्या दत्तपंथाची निर्मिती झाली. सकलसंप्रदायात हिंदू, मुसलमान, जैन, लिंगायत यांना स्थान मिळून दत्तभक्तीचा विस्तार झाला. अवधूत दत्तास ऐश्र्वर्याची जोड मिळाली. रामनवमी, गोकुळाष्टमी, गणेशचतुर्थी, दत्तजयंती इत्यादी उत्सव थाटाने होत राहिले. प्रभूंसाठी, दत्तासाठी झोपडी होती, तेथे आता नव्या इमारती दिसू लागल्या. व्यापारपेठ वाढली. भंडारखाना तयार झाला, पाण्याची व्यवस्था झाली; चौक्या, पहारे, शिपाई यांची शिस्त वाढली. गणेश, मारुती, सर्वेश्वर यांचे माहात्म्य दत्ताबरोबरच वाढीस लागले. प्रभूंच्या दरबाराचे ऐश्र्वर्य दृष्ट लागण्यासारखे वाढून माणिकनगर हे नवे केंद्र दत्तभक्तांना आकर्षित करून राहिले.
अनेक देवदेवतांनी समृद्ध श्रीप्रभूंचे मंदिर
माणिकनगरचे क्षेत्रमाहात्म्य भक्तांना पटत राहिले. काळभैरवरूपी कालाग्निरुद्र (मारुती), दंडपाणीसर्वेश्र्वर, काशिकारूपी महादेवी, निरालंब गुहेतील महालिंग, मधुमती व्यंकम्मादेवी, विरजा-गुरुगंगा संगमाचे मणिकर्णिका स्थान, कैलासमंडप, वीरभद्र, भुवनेश्र्वरी भवानी, संगमेश्र्वर, श्रीम्हाळसा, मार्तंडभैरव, श्रीचक्रेश (दादा महाराजांची समाधी), महामाया (श्रीबयांबा), अखंडेश्वर, श्रीविठ्ठल, श्रीनागनाथ, श्रीप्रभूंचे मंदिर अशा अनेक देवदेवतांनी हे स्थान समृद्ध बनले आहे.
संस्थानाची वैशिष्ट्ये
माणिकनगर या दत्तक्षेत्राची आपली एक वेगळी विशेषता आहे. कुठल्याही दत्तक्षेत्रांत न दिसणरी अनादि अविच्छिन्न अशी गुरुपरंपरा या क्षेत्राला लाभली आहे. आद्य श्रीप्रभूपासून विद्यमान श्री ज्ञानराज माणिकप्रभूपर्यंत सर्व आचार्यांनी भक्तांच्या हृदयांत ज्ञानज्योति प्रज्वलित करण्याचे आपले काम अत्यंत दक्षतेने केले आहे.
या क्षेत्राची दुसरी विशेषता म्हणजे इथे भगवान श्रीदत्तात्रेयांची उपासना ही शक्तिसहित आहे. मधुमती शक्तिसहित दत्तोपासना अन्यत्र कुठेही दिसत नाही. श्रीप्रभूची तपोभूमि असलेल्या या क्षेत्राचे पावित्र्य व शांतता अत्यंत काटेकोरपणे जोपासली गेली आहे. इतर क्षेत्रांसारखे धर्माचे बाजारीकरण या ठिकाणी नाही.
भोजनाची निःशुल्क सोय
इथली तिसरी विशेषता म्हणजे – अन्नदान. ‘नित्यान्नदान सेवा’ या योजनेखाली इथे येणाऱ्या हजारो भाविकांच्या दोन्ही वेळच्या भोजनाची निःशुल्क सोय श्रीसंस्थानामार्फत केली जाते. निरंतर २०० वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा अत्यंत निष्ठापूर्वक जपली गेली आहे. श्रीदत्तजयंती सारख्या मोठ्या उत्सव-महोत्सव प्रसंगी तर एक-एक लाख लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात.
विद्यादानाचे महत्वपूर्ण कार्य
अन्नदानासोबत विद्यादानाचे महत्वपूर्ण कार्यही श्रीसंस्थान करीत आहे. श्री माणिकप्रभु वेद व संस्कृत पाठशाळेत सुमारे ८० विद्यार्थी वेदाध्ययन करीत आहेत तसेच श्री माणिकप्रभु अंध पाठशाळा या संस्थेच्या माध्यमातून सुमारे १०० अंध व विकलांग मुलांच्या शिक्षणाची नि:शुल्क सोय केली जात आहे.
अनाथालय, शाळा
श्री माणिकप्रभु अनाथालय या संस्थेच्या माध्यमातून १०० गरीब व मागासवर्गीय अनाथ मुलांच्या भोजन, वसती व शिक्षणाची सर्व जबाबदारी श्रीसंस्थानने उचलली आहे. शिवाय सुदूर मेघालय या राज्यांत होत असलेल्या जबरी धर्मांतरास कंटाळलेल्या २५ गरीब मुलांना श्रीसंस्थाननी दत्तक घेऊन त्यांच्या भोजनशिक्षणाची सर्व व्यवस्था केली आहे.
माणिक पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सुमारे ४०० आवासी विद्यार्थी असून, अत्याधुनिक तंत्राप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची सोय केली गेली आहे. हे सर्व शैक्षणिक उपक्रम केवल भक्तजनांच्या उदार सहयोगाने चालविले जातात.
श्रीदत्तजयंती महोत्सव
मार्गशीर्ष शुक्ल एकादशी पासून पौर्णिमे पर्यंत साजरा होणारा श्रीदत्तजयंती महोत्सव हा येथील सर्वात मोठा उत्सव होय. भारताच्या सर्व भागांतून लाखो भाविक या उत्सवासाठी इथे जमतात. या प्रसंगी महापूजा, अन्नदान आदि कार्यक्रम अत्यंत वैभवाने साजरे केले जातात.
दुसरा महत्वाचा उत्सव म्हणजे वेदांत सप्ताह, हा उत्सव फाल्गुन मासांत होत असतो. या शिवाय श्रीराम नवमी, श्रावणमास, गणेशोत्सव, देवी नवरात्र व गुरुआराधनादि इतर अनेक लहान-मोठे उत्सव वेळोवेळी आयोजित केले जातात.
प्रेक्षणीय स्थळे
माणिकनगरांत श्रीप्रभूच्या भव्य अशा देवालयाव्यतिरिक्त अनेक प्रेक्षणीय स्थळे भाविकांना आकर्षित करतात. नौबतखाना, भंडारखाना, मुक्तिमंटप, मधुमती श्यामला मातेचे देवालय, महबूब सुबहानी चा दर्गा, गुरुगंगा-विरजा संगम आदि अनेक स्थळे पाहण्यासारखी आहेत.
विश्रामगृह व भक्तनिवास
इथे येणाऱ्या भाविकांसाठी ‘मार्तंड विलास’, ‘माणिक विहार’, ‘शंकर कृपा’ आदि अनेक लहान-मोठे विश्रामगृह व भक्तनिवासांची सोय श्रीसंस्थाननी केली आहे. या निवासांमध्ये अत्याधुनिक सुखसाधनांनी युक्त अनेक प्रकारच्या खोल्यांची व्यवस्था असून श्रीसंस्थानच्या कार्यालयाशी संपर्क साधून खोल्यांचे आरक्षण करता येते.
कसे जावे?
माणिकनगर हे उत्तर कर्नाटकातील बीदर जिल्ह्यांतील हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त १ कि.मी. अंतरावर आहे. सोलापुर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापुर पासून १४० कि.मी. व हैदराबाद पासून १६० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. गुलबर्गा-बीदर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून हुमानाबादसाठी (माणिकनगर साठी) नियमित बससेवा आहे. या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास असून दुपारी १ वाजता महाप्रसादाची सोय आहे.
संपर्क: श्री माणिकप्रभू संस्थान, माणिकनगर ता. हुमनाबाद जि. बिदर
मोबाईल ०९४४८१२८३८९
श्रीदत्त परिक्रमेत आज आपण प. पू. माणिक प्रभू यांची लिलाभूमी असलेल्या श्रीक्षेत्र माणिकनगरचे दर्शन घेतले.उद्या आपण भुयार आणि शेषदत्त पादुका असलेल्या श्रीक्षेत्र बसवकल्याण येथे जावू या!
(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com/श्रीगुरुचरित्र)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Shree Datta Parikrama Manik Prabhu Manik Nagar by Vijay Golesar
Dattatrey