इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्रीदत्त परिक्रमा
भाग १५ वा… श्रीदत्त स्थान महात्म्य २१वे
|| श्री क्षेत्र माहूर ||
श्री दत्त गुरुचे जन्म आणि निद्रास्थान
नांदेड जिल्ह्यातील माहुर हे क्षेत्र सद्गुरु दत्तात्रेयांचे अवतार स्थान आहे. हे क्षेत्रफार प्राचीन आहे. ह्या क्षेत्रास दत्तात्रेयांचे विश्रांतीस्थान सुध्दा म्हणतात. महासती अनुसयेच्या सत्व परिक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी संतुष्ट होऊन महासती अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या विनंतीस मान देऊन याच ठिकाणी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला. हा प्रसंग जिथे घडला त्या श्रीक्षेत्र माहुर या दत्त स्थानाचा महिमा आज आपण जाणून घेणार आहोत.
दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्म, मुक्त, आत्मा आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. दत्तात्रेयाच्या जन्माची एक आख्यायिका जगप्रसिद्ध आहे. एकदा ब्रह्मा,विष्णू आणि श्री महेश आपापल्या बायकांच्या सांगण्यानुसारअत्रि ऋषी यांची पत्नी अनसूया हिची पातिव्रत्य परीक्षा घेण्याचे ठरवतात. हे तिघेही त्यांच्या आश्रमात ऋषींचा वेष धारण करून भिक्षा मागण्यासाठी जातात आणि भिक्षा म्हणून स्तनपान करण्यासाठीचे मागणी करतात. परंतु माता अनसूया पतिव्रता नारी असल्यामुळे त्यांना निराश न करण्याचे वचन देऊन त्यांचे लहान बालकांत रूपांतर करते व स्तनपान करून त्यांना जेवू घालून झोपवते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे खरे रूप दाखवत वर मागण्यास सांगतात. अनसूया त्यांच्याकडे तुम्ही माझी बालके व्हावीत म्हणून वर मागते. तेव्हापासून ह्या तिघांचा एकत्रित संगम म्हणजे श्री दत्तात्रेय होय.
दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा
श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित असल्या तरी या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचे पुत्र व विष्णूंचा अवतार असल्याचा बोध होतो.
अत्री ऋषींनी पुत्र प्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा. तेव्हा तिन्ही देवांनी त्यांच्या विनंतीला मान दिला. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली. अत्री ऋषींनी एक रूपवती कन्या प्राप्तीची ही इच्छा दर्शवली. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली.
दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्री ऋषींनी सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्री ऋषींच्या या कामगिरीमुळे शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.
माहुर येथे दत्त जन्म
मराठवाड्यातील नांदेड जिल्हा, किनवट तालुका येथील माहुरगडावर श्रीदत्तात्रेय, श्रीरेणुका, अनसूया इत्यादींचा निवास असल्याने दत्तभक्तांना माहूरची ओढ नेहमीच असते. माहूरगड हा सह्याद्रीचा भाग असून येथे दत्तात्रेय निद्रेसाठी येतात असा समज आहे. . रेणुकाशिखरापासून तीन मैलांवर दत्तात्रेयांचे शिखर आहे. हे संस्थान गोसावी महंतांच्या ताब्यात होते. तूर्त तेथील व्यवस्था सरकार पाहते. येथील मंदिरात दत्ताच्या पादुका व महादेवाची पिंड आहे. दत्तस्थानापासून खालच्या बाजूस सर्वतीर्थ आहे. जवळच अमृतकुंड असून येथेच प्रथम परशुराम व दत्तात्रेय यांची भेट झाल्याचे सांगतात. दत्तशिखराच्या दक्षिणेस मैल-दीड मैलावर अनसूयेचे शिखर असून तेथे अत्री ऋषींचा आश्रम होता. दत्तात्रेय व अनसूया यांच्या मूर्ती या शिखरावर आहेत. दत्तात्रेयांच्या चरित्रातील अनेक सुरस कथा याच भागात घडल्याचे सांगतात.
अनसूया पहाडावर अत्रिऋषींच्या पादुका
दत्तशिखर व अनसूयाशिखर येथून भोवतालचा प्रदेश फारच रमणीय दिसतो. दत्तशिखरावरही अनसूया, विठ्ठलरखुमाई यांच्या मूर्ती आहेत. दत्तमंदिराबाहेर लक्ष्मीनारायण व धुनीधर दत्त अशी दोन मंदिरे आहेत. धुनीतील दत्ताचे भस्म प्रासादिक मानले जाते. दरवाज्यासमोर पश्र्चिमेस उजव्या सोंडेचा गणपती आहे. जवळच कामाक्षीचे लहानसे मंदिर आहे. आसपास गोसावी महंतांच्या अनेक समाध्या आहेत. अनसूया पहाडावर अनसूया व दत्तात्रेय यांच्या मूर्तीखेरीज अत्रिऋषींच्या पादुका आहेत.
देवदेवेश्र्वर दत्तस्थान
माहुर गावालगतच पायथ्याशी महानुभवांच्या ताब्यात असलेले सुप्रसिद्ध देवदेवेश्र्वर हे दत्तस्थान आहे. रेणुका व दत्तात्रेय यांच्या आज्ञेने एकदा ब्रह्मदेव क्षीरसमुद्रावर गेले आणि त्यांनी विष्णूला माहूरात आणले. विष्णूंनी येताना आवळीचे झाड बरोबर आणले. विष्णू दत्तात्रेयांच्या आश्रमात आल्यावर परशुरामाने रेणुकेच्या सांगण्यावरून विष्णूच्या पोटात शिरून शंकराची प्रार्थना केली. परशुराम दत्तात्रेयांच्या आश्रमात जगाचे रक्षण करण्यासाठी म्हणून तीन देवांच्या रूपाने राहू लागला. हाच देवदेवेश्र्वर म्हणून प्रसिद्धीस आला.
पिशाच्चबाधा दूर होते
दत्तात्रेयांचेही मन येथे रमले व ते आवळीच्या झाडाखाली ध्यानधारणा करू लागले. पिंगलनाग नावाचे ऋषीही या ठिकाणी दत्तात्रेयांच्या कृपेने महादेवाच्या रूपात राहिले. देवदेवेश्र्वर याप्रमाणे महादेव व विष्णू यांचे स्थान असून महानुभाव दत्तप्रभूंच्या रूपात या स्थानास महत्त्व देतात. रोज सायंकाळची आरती येथे पाहण्यासारखी असते. दत्तप्रभूंना आळविताना अनेकांच्या अंगातील पिशाच्चबाधा दूर होते असे म्हणतात. देवदेवेश्र्वराच्या खालच्या बाजूस पद्मतीर्थ आहे. शंखतीर्थ, बद्रितीर्थ अशी काही स्थाने येथून जवळच आहेत.
माहूरगडावरील किल्ल्यात एक ब्रह्मतीर्थ असून त्यास विंझाळे म्हणतात. याच गडावर महाकालिकेचीही मूर्ती आहे. जम नावाच्या एका रजपूत राजाने हा किल्ला सहाव्या शतकात बांधला असल्याचे सांगतात. याचे स्मारक म्हणून ‘जमठाकरी’ नावाच्या एक सण नागपंचमीसारखा आषाढ शु. पंचमीस साजरा करतात.
पांडवतीर्थ
किल्ल्यात गौतम झरा आहे. माहुरच्या वायव्य दिशेस पहाडात कोरलेले पांडवलेणे आहे. तेथील तीर्थास पांडवतीर्थ म्हणतात. रेणुकाशिखरापासून चार मैलांवर कैलासटेकडी आहे. येथे एक शिवलिंग आहे. रेणुकेपासून अर्ध्या मैलावर औदुंबर झरा आहे. अत्रिकुंड, चरणतीर्थ, आत्मबोधतीर्थ, कमंडलुतीर्थ, कज्जलतीर्थ, मूलझरी, रामतीर्थ अशी आणखीही काही पवित्र स्थाने माहुरगडावर आहेत. जमदग्नीच्या खोरीत सूर्यतीर्थ, चंद्रतीर्थ, पापमोचन केदा, मुद्गलेश्र्वर, ऋणमोचन, काशी, प्रयाग, कपिला, भान, परशू, गदा, रामगया इत्यादी नावांची क्षेत्रे आहेत.याच माहुरगडावर दासोपंत, साधुमहाराज, विष्णुदास इत्यादींना दत्तप्रभूंचा साक्षात्कार झाला.
अतिशय प्राचीन अशा या क्षेत्री असलेल्या ‘दत्तशिखरा’वर श्रीदत्तात्रेयांचा वास आहे. माहूर गावापासून चार-पाच कि. मी. अंतरावर असलेल्या दत्तशिखरावरील मूळ मंदिर १०-१२ फूट एवढय़ाच लांबीरुंदीचे आहे.
दत्तात्रेयाचे शयनस्थान
मूळ मंदिराची बांधणी संवत १२९७ मध्ये महंत मुकुंदभारती यांनी केली. येथे आपणांस एकमुखी दत्ताची मूर्ती पाहावयास मिळते. येथे ‘भारती’ परंपरेतील गोसाव्यांचा नित्य वावर आहे. दत्तस्थानापासून मलभर अंतरावर सती अनुसयेचे मंदिर आहे. येथून जवळच अत्री ऋषींच्या पादुका व आश्रम आहे. येथील दत्तमंदिराच्या प्रशस्त आवारात दत्तपादुका, शिविलग आदी स्थापित आहेत. श्रीदत्तात्रेय हे संचारी दैवत आहे. दत्तात्रेयाचा आश्रम सिंहाचळाजवळ प्रयागवनात आहे. तो स्वेच्छाविहारी अर्थात संचारी असल्याने माहूर, पांचाळेश्वर, कोल्हापूर ही त्याची विहारस्थाने आहेत. यांतील माहूर हे पुरातन दत्तक्षेत्र दत्तात्रेयाचे शयनस्थान समजले जाते. तो पांचाळेश्वरी स्नान करतो आणि कोल्हापुरी भिक्षाटन करतो, अशी श्रद्धा रूढ आहे. मात्र दिवसाची अखेर अर्थात निद्रास्थानासाठी मात्र तो मातापूर ‘माहूर’ येथे सती अनुसयेच्या वात्सल्यभरल्या कुशीत येतो. दत्तमहाराजांसारखे सर्वश्रेष्ठ दैवतही अखेर आईच्या ओढीने या दत्तशिखरावर येते हीच या क्षेत्राबद्दलची अपूर्वाई आहे.
या क्षेत्री असे जावे
हे स्थान नांदेड जिल्ह्यात येते. नांदेड पासून ११० किमी अंतरावर माहूर हे क्षेत्र आहे. पुण्या-मुंबई कडील भक्तांसाठी औरंगाबाद, जालना, मेहकर, वाशीम, पुसद, माहूर अशीसरळ बससेवा आहे. नांदेड हे मनमाड-हैदराबाद मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे. या ठिकाणी निवासासाठी भक्तनिवास आहे.
संपर्क: श्रीदत्त संस्थान शिखर , श्रीक्षेत्र माहुर जिल्हा नांदेड
प.पू.महंत मधुसुदन भारती महाराज ; चिंतामणि भारती मोबा.८९२८९२०२०२
उज्वल भोपी व्यवस्थापक मोबा. ९४२१७५८५००/ यशवंत जाधव माहुर ९६७३५७१०६३
श्रीदत्त परिक्रमेत आज आपण श्री दत्त गुरुचे जन्म आणि निद्रस्थान असलेल्या श्रीक्षेत्र माहुर या दत्तस्थानाचा महिमा पहिला आहे .उद्या आपण दात्तात्रेयांचा दुसरा अवतार असलेल्या नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेल्या श्रीक्षेत्र कारंजा येथे जावू या!
(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com /श्रीगुरुचरित्र ; छायाचित्र सौजन्य विकिपीडिया)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Shree Datta Parikrama Mahur Place by Vijay Golesar
Dattatreya Nanded Religious