इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्रीदत्त परिक्रमा
लेख-१२वा श्रीदत्त क्षेत्र १८ वे
दत्त भक्तांची पंढरी
श्रीक्षेत्र गाणगापूर
श्रीदत्त परिक्रमा ही लेखमाला प्रथमच मराठीमध्ये प्रसिद्ध होत आहे त्यामुळेच त्यास उदंड प्रतिसाद मिळतआहे. अनेक वाचकांचे मेसेज आणि फोन येत आहेत.यावरून ही लेखमाला असंख्य वाचकांच्या पसंतीस उतरली आहे हे लक्षांत येते.विशेष म्हणजे विदेशातील दत्त भक्तांकडूनही या मालिकेचे स्वागत होत आहे. आजवर आपण १७ दत्त स्थानांची माहिती जाणुन घेतली आज आपण दत्त भक्तांची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र गाणगापूरचा महिमा जाणून घेणार आहोत.
गाणगापूर हे क्षेत्र मनुष्य रूपी दत्तात्रेयाचा द्वितीय अवतार असलेले श्रीनृसिंहसरस्वती स्वामी यांनी आपल्या तेवीस वर्षाच्या प्रदिर्घ वास्त्वयासाठी का निवडले या घटनेमागे मोठा अर्थ आहे. भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमाच्या आसपासचा २ ते ३ मैलाचा परिसर विविध कारणांनी पवित्र झाला आहे. या ठिकाणी पौराणिक काळातील विभूतींनी तपश्चर्या करून, यज्ञ करून आणि काही काळ वास्तव्य करून हा प्रदेश परमपवित्र आणि मंगलमय केला आहे. या क्षेत्री माधुकरी मागण्याचे फार महत्त्व आहे. दत्त भक्तांची अशी भावना आहे की, आज ही दुपारी १२ वाजता श्री नृसिंह सरस्वती भिक्षा मागण्यास गाणगापूरला येतात. येथील मंदिरात स्वामींच्या निर्गुण पादुकांची स्थापना केलेली आहे. हे क्षेत्र दत्त संप्रदायामधे फार महत्त्वपूर्ण आहे.
श्रीनृसिंह सरस्वती यांचे तेवीस वर्षे वास्तव्य
श्रीक्षेत्र गाणगापुराला ‘दत्तभक्तांचे पंढरपूर’ म्हटले जाते. येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येतात. हे स्थान अत्यंत जाज्वल्य आहे. या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते. भगवान श्रीदत्तात्रेयांचे द्वितीयावतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल तेवीस वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या. ‘निर्गुण पादुका’च्या द्वारा इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे.
आज श्री क्षेत्र गाणगापुरला जेथे निर्गुण मठ आहे त्याच स्थानी श्री नृसिह सरस्वती निवासास होते. तेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत त्याच खाली एक तळघर आहे. त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत आज ती गुफा बंद केलेली आहे.
आजही इथे साक्षात दत्तदर्शन घडते
श्रीनृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्तभक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे. इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. पिशाच्च विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे. श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दत्तदर्शन घडते. तसे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळीही वास्तव्य करुन श्रीदत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवीत आहेत.
अतिभव्य महाद्वारे
श्रीनिर्गुण पादुका मंदिर (अथवा श्रीगुरूंचा मठ) हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे. या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून ती एखाद्या धाब्याच्या मोठ्या वाड्यासारखी आहे. मंदिराच्या पूर्वेस व पश्र्चिमेस दोन महाद्वारे आहेत. पश्र्चिम महाद्वारावर नगारखाना असून तो त्रिकाल पूजेच्या वेळी वाजविला जातो. नव्यानेच बांधण्यात आल्याने अतिभव्य महाद्वाराने पादुका मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे.
श्रीनिर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव, दक्षिणेस औदुंबर व त्या खाली गणपती, महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. पश्र्चिमेस अश्र्वत्थ वृक्ष आहे. वृक्षाभोवताली नागनाथ, मारुती व तुलशीवृंदावन आहे. मठात मंदिर सेवेकऱ्यांच्या अनुष्ठानासाठी एकूण तेरा ओवऱ्या आहेत. त्यांपैकी पाच पूर्वेस, सात उत्तरेस व एक पश्र्चिमेस आहे. मठाच्या दक्षिणभागी श्रीगुरुपादुकांचा गाभारा असून तो उत्तराभिमुख आहे. त्यासमोर प्रशस्त सभामंडप आहे. गाभाऱ्याला फक्त उजव्या हातालाच एक दरवाजा आहे.
विघ्नहर चिंतामणी
आत पश्र्चिमेकडील कोनाड्यात विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती वालुकामय असून ती स्वत: श्रीनृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेली आहे.
या गणेशासमोर दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा असून तो पश्र्चिमाभिमुख आहे. या दरवाज्यातून ओणव्याने आत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका दृष्टीस पडतो. या झरोक्यातून आत डोकावले म्हणजे समोर त्रैमूर्तींचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ असून पश्र्चिमाभिमुख आहे. या त्रिमूर्तीच्या आसनावरच श्रीगुरुंच्या ‘निर्गुण पादुका’ ठेवलेल्या आहेत. या पादुका सुट्या व चल असून खास वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. त्या अन्यत्र आढळणाऱ्या पादुकांप्रमाणे पावलांच्या आकाराच्या नसून तांबूस, काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत. त्या दिव्य शक्तीने भारलेल्या आहेत.
सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात
आपण आपल्या मनातील संकल्प ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो त्या वेळेस श्रीदत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरीत्या या पादुकांद्वारा करतात. दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण, निराकार असते. म्हणून या पादुकांना ‘निर्गुण पादुका’ म्हणतात. भक्तकल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य-दु:खे व अटळ संकटे निवारण झालेली आहेत. श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते, पारलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमीच गर्दी असते.
श्रीनृसिंह सरस्वतींची अनुष्ठान भूमी भीमा-अमरजा संगमावर असून हे स्थान गाणगापूरच्या नैऋत्येस साधारणत: ३ कि.मी.वर आहे. श्रीगुरू ज्या अश्र्वत्थ वृक्षाखाली अनुष्ठान करीत तो पडून गेल्यावर त्याच स्थळी हल्लीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. याच मंदिरात अश्र्वत्थवृक्षाखाली पादुका व लिंग यांची स्थापना केलेली आहे.
मुंबई-हैद्राबाद (व्हाया सोलापूर) किंवा मुंबई-बंगलोर या रेल्वे मार्गावर गाणगापूर रोड स्टेशन लागते. तिथे उतरून बस किंवा ऑटोने २० कि. मी. अंतरावर गाणगापूर या क्षेत्रास जाता येते. बसमार्गाने सोलापूर-गाणगापूर अशी थेट बस सेवा आहे. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत व भोजनासाठी अन्नछ्त्र मंडळात सोय होऊ शकते.
संपर्क: श्री दत्त संस्थान गाणगापूर श्रीक्षेत्र गाणगापूर, तालुका अफझलपूर,
जिल्हा कालबुर्गी, कर्नाटक राज्य. फोन- (०८४७२) २७४३३५, २७४७६८
श्री नृसिहसरस्वती देवस्थान श्रीक्षेत्र गाणगापूर, तालुका अफझलपूर, जिल्हा कालबुर्गी, कर्नाटक राज्य.
श्रीदत्त परिक्रमेत आज आपण दत्तभक्तांची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र गाणगापूरचे दर्शन घेतले. उद्या आपण जिथे स्वामी समर्थांनी अनंत लीला केल्या त्या श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे जावू या!
(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com/श्रीगुरुचरित्र)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Shree Datta Parikrama Gangapur Importance by Vijay Golesar