इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना. म्हणूनच आजही बायका श्रावणाची अत्यंत आतुरतेने वाट पहात असतात. श्रावण महिन्यातील वेगवेगळे सणवार म्हणजे जणू मनमुराद जगण्याचा परवानाच. यंदा हा उत्साह द्विगुणित होणार आहे. कारण, यंदा श्रावण महिना दोन महिने असणार आहे. अर्थात, यंदा अधिक श्रावण आहे.
चार नव्हे आठ श्रावणी सोमवार
यंदा श्रावणात चार-पाच नव्हे तर आठ सोमवार असतील. श्रावणात इतर व्रत वैकल्यांना महत्त्व आहेच, पण श्रावणी सोमवार आणि शुक्रवार याचे महत्त्व फार आहे. श्रावण म्हणजे शिवभक्तीचा महिना. श्रावण महिन्यातील सोमवाराचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी शंकराची पूजा केली जाते, उपास केले जातात. पण यंदाच्या श्रावण महिन्याचं काही विशेष महत्त्व असणार आहे. यंदाचा श्रावणाचा कालावधी हा तब्बल ५९ दिवसांचा म्हणजे दोन महिन्यांचा असणार आहे. तसेच या वर्षीच्या श्रावण महिन्यात चार किंवा पाच नव्हे तर आठ सोमवार असतील. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते असे म्हणतात. यासोबतच व्यक्तीच्या मनोकामनाही पूर्ण होतात. भगवान शंकराला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे असे म्हणतात.
भगवान शंकरांसोबत विष्णुंचीही आराधना
श्रावण महिना १८ जुलै पासून सुरू होईल आणि १५ सप्टेंबरपर्यंत चालेल. म्हणजेच यावेळी एकूण ५९ दिवस भाविकांना भगवान शंकराची आराधना करण्याची संधी मिळणार आहे. १९ वर्षांनंतर हा योग घडल्याचे सांगितले जात आहे. या वेळी १८ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान मलमास असेल. म्हणजेच यावेळी श्रावणामध्ये भगवान शंकरासोबतच भगवान विष्णूचाही आशीर्वाद मिळणार आहे.
भगवान शंकरांना श्रावण प्रिय का?
श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते, असे सांगितले जाते. श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असते. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.
या असतील श्रावणी सोमवारच्या तारखा
श्रावणाचा पहिला सोमवार : १० जुलै
दुसरा सोमवार: १७ जुलै
तिसरा सोमवार: २४ जुलै
चौथा सोमवार: ३१ जुलै
पाचवा सोमवार: ७ ऑगस्ट
सहावा सोमवार: १४ ऑगस्ट
सातवा सोमवार: २१ ऑगस्ट
आठवा सोमवार: २८ ऑगस्ट