नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाणार्या भाविकांसाठी १० जादा बसेस सोडण्याचा निर्णय सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. कोरोनानंतर आता सर्व निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे यंदा सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. त्यामुळे यंदा श्रावणात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर याठिकाणी देखील भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच श्रावण महिन्यात सोमवारला विशेष महत्त्व असल्यामुळे सोमवारी विशेष गर्दी असणार आहे. त्यामुळे भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सिटीलिंकच्या वतीने पहिल्या, दुसर्या व चौथ्या सोमवारी दररोजच्या २२ बसेस व्यतिरिक्त १० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी त्र्यंबकेश्वरसाठी असलेल्या नियमित बसेस बरोबरच या अतिरिक्त १० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी या जादा बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.
Shravan Nashik Trimbakeshvar City Bus Extra Service Citilinc