ऋतुराज श्रावण महात्म्य
पंडित दिनेश पंत
मराठी महिन्यातील सर्वात पवित्र म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे. यंदा ९ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यात मुख्यतः भगवान शंकर व पार्वती यांच्या पूजनाचे महत्व सांगितले आहे. रिमझिम पडणारा पाऊस त्यात मध्येच पडणारे ऊन, हिरवागार झालेला निसर्ग असे निसर्गरम्य वातावरण या काळात असते. बालकवींनी श्रावणाचे वर्णन “श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे” अशा सुंदर शब्दात केले आहे. श्रावणामध्ये भाविक विविध प्रकारची व्रते करतात.
श्रावण सोमवारचे व्रत
यंदा श्रावणामध्ये पाच सोमवार आहेत. या सोमवारी भगवान शंकराचे दर्शन यास विशेष महत्त्व असते. काही भाविक पाचही सोमवार उपवास करतात.
मंगळागौरी पूजन
नूतन विवाह झालेल्या सुवासिनींचे पूजन करतात. यंदा चार मंगळवार आहेत. नूतन विवाह झालेल्या सुवासिनी भगवान शंकर पार्वती यांची पूजा आणि उपवास मंगळवारी करतात. रात्री मंगळागौरीचा जागर, उखाणे, मंगळागौरीचे खेळ, झोके, भेंड्या, गाणी असा भरगच्च कार्यक्रम असतो.
संपूर्ण श्रावण महिनाभर काही भक्त विविध प्रकारच्या धार्मिक ग्रंथांचे पारायण करतात. त्यामुळे मुख्यतः रामायण, नवनाथ त्याचप्रमाणे भगवान शंकरासंबंधी शिवलीलामृत, महारुद्र, लघुरुद्र, रुद्राभिषेक अशी आराधना करतात. संपूर्ण श्रावण महिना पवित्र मानला गेला असल्याने बहुसंख्य भाविक महिनाभर उपवास करतात. नित्य देवदर्शन करतात. या महिन्यात नियमित सूर्यपूजन, पायात चप्पल न घालणे, मौन पाळणे, कांदा, लसूण, वर्ज्य करणे एक वेळ उपवास करणे, दाढी वाढवणे, नित्य भजन करणे, दानधर्म करणे, प्राणिमात्रांना अन्नदान करणे, नदी स्नान करणे असे अनेक प्रकारचे धार्मिक व्रत करतात.
शिवामूठ वाहणे
श्रावणामध्ये सोमवारी भगवान शंकरांना विविध प्रकारचे धान्य अर्पण केले जाते. त्याला शिवामूठ म्हणतात. यंदा चार सोमवार आहेत. पहिल्या सोमवारी तांदुळाची शिवामूठ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव या धान्यांची शिवामूठ अर्पण करावी.
यंदा श्रावण महिन्यात १३ ऑगस्ट रोजी नागपंचमी, २२ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन, ३० ऑगस्ट रोजी कृष्णाष्टमी अर्थात श्रीकृष्ण जयंती, ३१ ऑगस्ट रोजी गोपाळकाला, दहीहंडी असे सर्व सण वार या महिन्यात साजरे केले जातात. श्रावण महिन्यातील सर्वच दिवस महत्वाचे मानले गेल्याने या महिन्यात सर्व प्रकारची शुभ कार्ये केली जातात. श्रावणापासूनच पुढे सर्व प्रकारच्या सणांची सुरुवात होते.
रिमझिम पाऊस, मध्येच पडणाऱ्या ऊनपाळ्या, हिरवागार झालेला निसर्ग या वातावरणाचे वर्णन शब्दबद्ध करण्याचा मोह अनेक हिंदी, मराठी गाण्यात दिसतो. त्यामध्ये ‘सावन का महीना पवन करे शोर’, ‘आया सावन झुमके’, ‘कुछ कहता है ये सावन’, ‘छाई बरखा बहार’, ‘पतझड सावन बसंत बहार’, ‘सावन के झुले पडे’, ‘रिमझिम गिरे सावन’, ‘सावन को आने दो’, ‘रिमझिम के गीत सावन गाये’, ‘मेरे नैना सावन भादो’, ‘लगी आज सावन की फिर वो झडी है’, अशी एक ना अनेक अजरामर गाणी आपण आजही ऐकतो. तर मराठी मध्ये ‘श्रावणात घननिळा बरसला’, ‘ये रे घना ये रे घना’, ‘घन ओथंबून येती’, ‘गारवा’, ‘अधीर मन झाले’, ‘चिंब पावसानं रानं झालं’, ‘झुंजुर मुंजुर पाऊस’ ही गाणी देखील आपल्या मनात गुणगुणतात.
अशा या निसर्गरम्य श्रावण महिन्याच्या आपणा सर्वांना शुभेच्छा