नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात गाजत असलेल्या श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याने जामीनासाठी अर्ज केला आहे. सद्यस्थितीत तो तिहार तुरुंगात आहे. आफताबच्या जामीनावर उद्या सुनावणी होत आहे. आफताबला जामीन मिळणार का याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
श्रद्धा वालकर हिच्या हत्याकांडानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. तो सध्या तिहारच्या कोठडीत असून आफताबची पॉलिग्राफ, नार्को चाचणी पूर्ण झाली. आता आफताबने जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आता उद्या सुनावणी होणार आहे.
आफताबने श्रद्धाची हत्या करीत तिच्या मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले. हे तुकडे त्याने मेहरोली परिसरातील जंगलात फेकले. पोलीस आरोप आफताब पुनावालाची कसून चौकशी करत आहेत. या पूर्वी आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाली आहे. त्यानंतर नार्को चाचणीही झाली आहे. दोन्ही चाचणीत सारखेच प्रश्न विचारण्यात आले. याद्वारे आफताबने नार्को चाचणीत दिलेल्या उत्तरांची तुलना पॉलीग्राफ चाचणीत दिलेल्या उत्तरांशी केली गेली.
दिल्लीच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात दोन आठवड्यापूर्वी आफताबची नार्को चाचणी करण्यात आली. यावेळी या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित अधिकारी, विशेषतज्ज्ञांचे पथकही उपस्थित होते. आफताबने अनेक प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत दिली आहेत. काही प्रश्नांची उत्तरे देण्यास आफताबला थोडा वेळ लागला. चाचणीवेळी त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी आफताब काही वेळ शांत राहिला. ज्यावेळी हे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्यात आले त्यावेळी आफताबने त्या प्रश्नांची उत्तरे दिली, असेही सांगण्यात येत आहे. आफताबने जामीन मिळावा, यासाठी दिल्लीतील साकेत न्यायालयात अर्ज केला आहे. त्याच्या जामीन अर्जावर उद्या म्हणजेच दि.१७ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
तिहार तुरूंगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब पॉलीग्राफ चाचणीतून आल्यानंतरही सामान्यपणे वागत आहे. कारागृहात त्याने मॅन्युअलनुसार दिलेले जेवण खाल्ले. आफताब कित्येक तास झोपला होता. रात्रभर तो आरामात झोपला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती. मात्र आता आफातबला जामीन मिळणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. कारण नुकताच पोलिसांना आफताब विरोधात आणखी एक सबळ पुरावा हाती लागला आहे. मेहरौलीच्या जंगलातून पोलिसांना सापडलेल्या अवशेषांची डीएनए चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत जंगलात सापडलेली हाडे, केस आणि रक्त यांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळला आहे. सीएफएसएलच्या अहवालात याची पुष्टी झाली आहे.
दरम्यान, माझ्या मुलीसोबत जे झाले, असे कोणासोबतही होऊ नये, अशी माझी अपेक्षा असल्याचे श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी म्हटले आहे. तसेच १८ वर्षांनंतरच्या स्वातंत्र्यावर बंदी आणण्याबाबत विचार करण्याची गरज असल्याची मागणीही त्यांनी केली आहे.
Shraddha Murder Case Suspected Aftab Poonwala Bail Plea
Delhi Police