नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीतील छतरपूर भागातील मुंबईतील तरुणी श्रद्धा वॉकर प्रकरणात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आफताबने साकेत कोर्टात न्यायाधीशांसमोर आपला गुन्हा कबूल केला. आरोपी आफताबने न्यायाधिशांना सांगितले आहे की, आपण जे काही केले ते क्षणार्धात होते, म्हणजेच काहीही विचार न करता रागाच्या भरात केले.
आफताबच्या म्हणण्यानुसार, त्याने रागाच्या भरात त्याची गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरची हत्या केली. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आणि आरोपी आफताबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्लीच्या साकेत कोर्टात हजर करण्यात आले होते. आफताबच्या पोलिस कोठडीत आणखी ४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आफताबने दिल्लीच्या साकेत न्यायालयात सांगितले की, तो तपासात सहकार्य करत आहे आणि त्याला ही घटना आठवण्यात अडचण येत आहे. आफताब पूनावाला याने श्रद्धा वालकरची हत्या केल्याची कबुली दिली आहे आणि रागातूनच हा गुन्हा केल्याचे सांगितले आहे. आफताबने गुरूग्राममध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकल्याची कबुलीही कोर्टात दिल्याचे सांगितले जात आहे.
आफताबच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केल्यानंतर दिल्ली पोलिस आता त्याची पॉलीग्राफ चाचणी करणार आहेत. त्यानंतर नार्को चाचणी करावी लागणार आहे. सोमवारी नार्को चाचणी होऊ शकली नाही. यापूर्वी गुरुवारी न्यायालयाने दिल्ली पोलिसांना २२ नोव्हेंबरपर्यंत आफताबची नार्को चाचणी करण्याचे आदेश दिले होते. हत्येमध्ये वापरलेले शस्त्र, श्रद्धाची कवटी, कपडे आणि फोन याबाबत आफताबने अद्याप दिल्ली पोलिसांना माहिती दिलेली नाही. महरौली जंगलातून आतापर्यंत पोलिसांनी काही हाडे जप्त केली आहेत, जी डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आली आहेत.
दिल्ली पोलिसांनी श्रद्धा हत्याकांडाचा १५ नोव्हेंबरला खुलासा केला होता. याप्रकरणी त्याचा लिव्ह इन पार्टनर आफताब याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, आफताबने पोलिसांना सांगितले की त्याने १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे ३५ तुकडे करून दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले.
Shraddha Murder Case Court Accused Aftab
Crime Delhi