मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एड्स कसा होतो किंवा एचआयव्हीचे संक्रमण कसे होते, याबद्दल समाजात आजही मोठ्या प्रमाणात अज्ञान आहे. दरवर्षी जनजागृतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविले जातात. त्यामुळे प्रयत्न सुरू आहेत. पण कुठलेही कारण नसताना दुसऱ्या कुणाच्या तांत्रिक चुकीमुळे एड्स झाला तर? धक्का बसला ना! असेच काहीसे झाले आहे. इंजेक्शनचा वापर चुकल्यामुळे शेकडो लोकांना अकारण एड्सचा त्रास सहन करावा लागत आहे.
खरंतर एड्सबद्दल सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली जाते. पण महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने दिलेली माहिती पुढे आली तेव्हा जनजागृतीची आवश्यकता वैद्यकीय क्षेत्रातही असल्याचे सिद्ध होते. एखाद्या रुग्णाला इंजेक्शन देताना नवे सिरींज आणि नवी सुई वापरली जाते. कारण दुसऱ्या कोणत्या पेशंटचे ते वापरता येत नाही. पण तशी चुक झाल्यामुळेच गेल्या सहा वर्षांमध्ये ५३९ लोकांना एड्स झाल्याची माहिती संस्थेने दिली आहे.
चुकीच्या इंजेकेशनमुळे धष्टपुष्ठ व्यक्तीला एड्सने ग्रासल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातही गेल्या आर्थिक वर्षात अर्थात २०२२-२३ मध्ये २६१ जणांना एड्सची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात एवढी काळजी घेण्याचे धडे मिळाले तरी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून किंवा डॉक्टरांकडून एवढी मोठी चुक कशी होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
असुरक्षित लैंगिक संबंधही कारणीभूत
एड्स होण्याची विविध कारणं आहेत. त्यात असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे एड्स होण्याची शक्यता सर्वाधिक असते. गेल्यावर्षी ९५ टक्के लोकांना याच कारणाने एड्स झाला आहे. हे महाराष्ट्रातील प्रमाण असून देशात ८६.२ टक्के लोकांना असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे एड्स झाल्याचे निष्पन्न झाले आहे. २.४ टक्के लोकांना आईमार्फत तर ०.०५ टक्के लोकांना बाधित रक्तामुळे तर ०.२ टक्के लोकांना चुकीच्या इंजेक्शनमुळे किंवा इतर वैद्यकीय उपकरणांच्या चुकीच्या वापरामुळे एड्स झाल्याचे पुढे आले आहे.
असा एड्स होत नाही
एचआयव्हीबाधित रुग्णाला स्पर्श केल्याने एड्स होत नाही, असे सांगणारी जाहिरात गेल्या कित्येक वर्षांपासून सरकार दूरचित्रवाहिनीवर दाखवत आहे. तरीही लोकांमध्ये एकप्रकारचे भय असतेच. एड्सबाधित व्यक्तीसोबत हस्तांदोलन केल्याने, गळाभेट घेतल्याने किंवा एड्स झालेल्या व्यक्तीला चावणारा डास आपल्याला चावल्यास तसेच एकच बाथरूम किंवा टॉयलेट वापरल्यासही एड्सचा प्रसार होत नाही.
Shocking Wrong Injection HIV Aids Infection