विजयवाडा (आंध्र प्रदेश) – असे म्हणतात की, या जगातून एकदा गेलेला माणूस परत येत नाही, परंतु एका महिलेला मात्र ‘आपुले मरण पाहिले मी डोळा!’ असा अनुभव आला. त्याचे झाले असे की, आंध्र प्रदेशातील एका महिलेचे निधन झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. परंतु आश्चर्य म्हणजे १५ दिवसानंतर ती महिला जिवंत घरी परत आली. हे सारे पाहून घरचे अचंबितच झाले.
कसे काय घडले हे
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातली ही आश्चर्यकारक घटना आहे. गिरीजम्मा या ७५ वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाल्याने तिच्यावर विजयवाडा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी गिरीजम्माच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर कुटुंबियांनी गिरीजम्मा यांचा मृतदेह शवागृहातून आणला आणि अंत्यसंस्कार केले, पण गिरीजाम्मा १५ दिवसांनी पुन्हा घरी पोहोचल्यावर सर्वजण उडालेच.
असा झाला गोंधळ
शवागृहातील गिरीजम्माचा मृतदेह ओळखण्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना सांगितले. त्यावेळी त्यांच्या पतीला गिरीजम्मासारखाच एक मृतदेह सापडला. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्रही जारी केले. कुटुंबियांनी मृतदेह घरी नेला आणि त्याच दिवशी अंतिम संस्कार केले. वास्तविक तो मृतदेह गिरीजम्माचा नव्हताच तर दुसऱ्याच महिलेचा होता. त्यानंतर गिरीजम्मा यांचा मुलगा रमेश यांचेही निधन झाले. त्यामुळे दोघांसाठी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती.
इकडे गिरीजम्मा रुग्णालयात उपचार घेऊन बरी झाली. त्यानंतर ती आपल्या घराकडे निघाली. कुटुंबातील कुणीही रूग्णालयाकडे फिरकले नाही. कारण परिवाराने तिला मृत समजून अंत्यसंस्कारही केले होते. परंतु गिरीजम्मा घरी परत येताच तिचे कुटुंबिय आणि शेजारची कुटुंबे प्रचंड चकित झाली. आनंद आणि दुःखाच्या सागरात सर्वजण बुडाले आणि सर्वांनाच रडू कोसळले. हा दैवी चमत्कारच असल्याची अनुभूती सगळ्यांना आली.
दरम्यान, गिरीजम्माला मृत घोषित कोणी केले आणि का केले, यात कोणाची चूक झाली. याचा शोध रुग्णालयाकडून घेतला जात आहे. मात्र, सध्या ही घटना देशभराच चर्चेची ठरत आहे.